मासेच मिळत नसल्याने हर्णे बंदरात मच्छिमारांचे आंदोलन

कृष्णकांत साळगांवकर
मंगळवार, 9 जानेवारी 2018

केंद्र सरकारने तांत्रिक मासेमारीला बंदी केली आहे. मात्र, शासनाचा आदेश धाब्यावर बसवून प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने ही मासेमारी सुरू आहे. त्यामुळे पांरपारिक मच्छिमारांना मासेच मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

हर्णे -  रत्नागिरी जिल्ह्यात समुद्रातील पाण्यात प्रखर प्रकाश असलेले एलईडी लाईट सोडून तांत्रिक मासेमारी केली जात आहे. केंद्र सरकारने तांत्रिक मासेमारीला बंदी केली आहे. मात्र, शासनाचा आदेश धाब्यावर बसवून प्रशासकीय अधिकाऱ्यांना हाताशी धरून संगनमताने ही मासेमारी सुरू आहे. त्यामुळे पांरपारिक मच्छिमारांना मासेच मिळत नसल्याने त्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.

हर्णे बंदरात पारंपारिक मच्छिमारांचे आंदोलन सुरु आहे. दापोली - मंडणगड - गुहागर या तीन तालुक्याच्या संघर्ष समितीने तांत्रिक मच्छिमारीमुळे आपल्यावर उपासमारीची वेळ आली आहे. असा आरोप केला आहे. भविष्यात हा प्रकार थांबला नाही, तर समस्त मच्छिमार बांधव कायदा हातात घेऊन, समुद्रात आंदोलन करतील असा इशाराही त्यांनी दिला आहे. दापोली राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संजय कदम यांनी या आंदोलनाला पाठिंबा दिला आहे.

समुद्रात पर्ससिनेट मासेमारी, फास्टर बोट मासेमारी, आता एलईडी लाईट फोकस मारून मासेमारी सुरू आहे. याचा परिणाम समुद्रातील बीजोत्पादनावर होत असून, समुद्रातील मत्स्यसाठे कमी होऊ लागले आहेत. त्यामुळे पारंपारिक बोटींना  मासे मिळेनासे झाले आहेत. या तांत्रिक  मासेमारीमुळे पारंपारिक मासेमारी व्यवसाय संकटात आला आहे. यासाठी हर्णे बंदरात मच्छिमारांनीे आंदोलन सुरु केले आहे.

पर्ससिननेट मच्छीमारांचेही निवेदन

शासनाच्या बदलणाऱ्या धोरणांमुळे मासेमारी उद्योग धोक्‍यात आला आहे. मच्छीमार कर्जाच्या विळख्यात सापडले आहेत. याकडे सहानुभूतीपूर्वक पाहावे आणि सहकार्य करावे, अशी मागणी रत्नागिरी तालुका पर्ससिन नेट मच्छीमार मालक असोसिएशनने जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे. एलईडी लाईट मासेमारीची परवानगी असल्याने आम्ही लाखो रुपये खर्च करून ती व्यवस्था केली; परंतु त्यावरही आता बंदी आली आहे. त्यामुळे पुन्हा आमचे लाखोंचे नुकसान होणार आहे. १२ नॉटिकल मैला बाहेर व्ही. टी. एस मच्छीमार बोटींना मासेमारीची परवानगी आहे. परंतु या अंतरात जाळ्यामध्ये मासळी मिळू शकणार नाही. 

Web Title: Ratnagiri news fisherman agitation in Harne Port