रत्नागिरी जिल्ह्यातील पाच धबधबे संवेदनशील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 29 जून 2018

रत्नागिरी - उक्षी, निवळी, रानपाट, मालघर आणि सवतकडा येथील धबधबे आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पर्यटकांना धोक्‍याच्या सूचना देणारे फलक लावावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून त्या-त्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत.

रत्नागिरी - उक्षी, निवळी, रानपाट, मालघर आणि सवतकडा येथील धबधबे आपत्ती व्यवस्थापनच्या दृष्टीने संवेदनशील आहेत. त्याठिकाणी पर्यटकांना धोक्‍याच्या सूचना देणारे फलक लावावेत, अशा सूचना जिल्हा प्रशासनाकडून त्या-त्या पंचायत समिती गटविकास अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. कार्यवाही न झाल्यास भविष्यात अनुचित प्रकार घडल्यास त्याला संबंधितांवर ठपका ठेवला जाणार आहे.

जिल्ह्यात समाधानकारक पाऊस पडत असल्यामुळे जिल्ह्यातील अनेक धबधबे प्रवाहित झाले आहेत. शांत आणि निसर्गाच्या सान्निध्यातील हे धबधबे पर्यटक व स्थानिक नागरिकांच्या श्रमपरिहाराबरोबर मौजमजेचे ठिकाण बनली आहेत. सुटीच्या दिवशी वर्षास्नानाचा आनंद घेण्यासाठी तरुण-तरुणींची गर्दी होते. 

बेभान झालेल्या तरुणाईकडून अतिउत्साहाच्या भरात अनुचित प्रकार घडतात. त्याचबरोबर सेल्फी काढण्याच्या गडबडीत दुर्घटनाही घडत आहेत. हा उत्साह पर्यटकांच्या जीवावर बेततो. 
या प्रकारांना आळा घालण्यासाठी जिल्हा प्रशासनही सतर्क झाले आहे. धबधबे, धरणे यांचा सर्व्हे आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेकडून करण्यात आला. धोकादायक किंवा आपत्तीच्या दृष्टीने संवेदनशील ठिकाणे निवडून तेथे कराव्या लागणाऱ्या उपाययोजनांविषयी सूचनाही देण्यात आल्या आहेत.

उक्षी, निवळी, रानपाट (रत्नागिरी), मालघर, सवतकडा (चिपळूण) येथील धबधब्यांवर पर्यटकांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. हे धबधबे अडचणीच्या ठिकाणी असल्याने तेथे अनुचित प्रकारही घडू शकतो. 

हे लक्षात घेऊन धबधब्यांवर सुरक्षेची माहिती देणारे फलकही लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. ते फलक लावण्याची जबाबदारी त्या-त्या ग्रामपंचायतींची आहे. त्याची अंमलबजावणी झाली की नाही यावर पंचायत समिती गटविकास अधिकारी लक्ष ठेवणार आहेत. या ठिकाणांवर कायमस्वरूपी जीवरक्षक नेमण्याच्या हालचाली सुरू आहेत.

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी आवाहन
सेल्फी काढताना स्वतःची काळजी घ्यावी, गैरवर्तन करू नये, प्लास्टिक बॉटल किंवा कचरा टाकू नये, पर्यटकांनी मौल्यवान वस्तू, दागिने, पैसे सुरक्षित ठेवावेत, वाहने व्यवस्थित पार्क करावीत, अनुचित प्रकार वा अपघात घडल्यास त्वरित पोलिसांशी संपर्क करावा, अशा प्रकारचे आवाहन त्या फलकाद्वारे करावयाचे आहे.

Web Title: Ratnagiri News Five sensitive waterfall in district