फ्लोटिंग ड्रेझर करणार मिरकरवाड्याची गाळातून मुक्ती

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 नोव्हेंबर 2017

रत्नागिरी -  मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे भेडसावणारा गाळाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. टप्पा दोनच्या कामामध्ये गाळ काढण्याचे सुमारे २ कोटी ५० लाखांचे काम अंतर्भूत आहे. त्यासाठी नुकताच फ्लोटिंग ड्रेझर मिरकरवाडा बंदरात दाखल झाला आहे. जेटीला लागणाऱ्या नौकांना समुद्रात जाण्यासाठी गाळ काढून चॅनल तयार करून देण्याची मच्छीमारांनी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे.

रत्नागिरी -  मिरकरवाडा बंदरातील वर्षानुवर्षे भेडसावणारा गाळाचा प्रश्‍न कायमस्वरूपी सुटणार आहे. टप्पा दोनच्या कामामध्ये गाळ काढण्याचे सुमारे २ कोटी ५० लाखांचे काम अंतर्भूत आहे. त्यासाठी नुकताच फ्लोटिंग ड्रेझर मिरकरवाडा बंदरात दाखल झाला आहे. जेटीला लागणाऱ्या नौकांना समुद्रात जाण्यासाठी गाळ काढून चॅनल तयार करून देण्याची मच्छीमारांनी अनेक दिवसांपासूनची मागणी आहे. काम सुरू होणार असल्याने मच्छीमारांनी समाधान व्यक्त केले. जेटीमधून बाहेर निघण्यासाठी आता मच्छीमारांना भरतीची वाट पाहावी लागणार नाही. 

दरवर्षी मिरकरवाडा जेटीमध्ये गाळ साचून नौका नांगरण्याचा प्रश्‍न निर्माण होतो. ओहोटीवेळी नौका गाळात रुततात. भरती आल्यानंतरच त्या बाहेर काढता येतात. याचा पूर्ण अभ्यास सात वर्षांपूर्वी बंगलोरच्या संस्थेने करून त्यावर उपाय काढणारा आराखडा तयार केला. दुसऱ्या टप्प्याला सुमारे ७४ कोटीच रुपये मंजूर झाले. त्यामध्ये दोन ब्रेकवॉटर वॉल, गाळ काढण्यासर जेटीवरील पायाभूत आणि मूलभूत गरजांचा समावेश आहे.

जुना बंधारा ४९० मीटरचा आहे. त्यात १५० मीटर वाढविण्याचे काम सुरू आहे. दुसरा नवीन बंधारा ६७५ मीटरचा आहे. या दोन्ही बंधाऱ्यांचे काम अंतिम टप्प्यात आहे. यावर सुमारे ५२ कोटी रुपये खर्च झाले आहेत. मुख्य प्रश्‍न राहिला आहे तो मिरकरवाडा जेटीतील गाळाचा. दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करूनही गाळाचा प्रश्‍न सुटत नाही. मच्छीमारानी अनेक वेळा मत्स्य विभाग, मिरकरवाडा प्राधिकरण आणि मेरीटाईम बोर्डाकडे मागणी केली होती. याचा विचार करून मुंबईहून फ्लोटिंगचा ड्रेझर मिरकरवाडा बंदरात दाखल झाला आहे.

ड्रेझर जोडण्याचे काम प्रगतिपथावर आहे. दोन ते चार दिवसांमध्ये गाळ काढण्यास सुरुवात होणार आहे. मिरकरवाडा बंदरातून मच्छीमारी नौका बाहेर काढताना खूप कसरत करावी लागते. भरतीची वाट पाहूनच नौका बाहेर काढाव्या लागतात. या ड्रेझरमुळे गाळ काढून चायनल तयार झाल्यास मच्छीमारांचा प्रश्‍न सुटेल, अशी माहिती आणि समाधान मच्छीमार फजलानी यांनी व्यक्त केले. 

मिरकरवाडा टप्पा दोनमध्ये गाळ काढण्याच्या अडीच कोटीच्या कामाचा समावेश आहे. त्यासाठी मुंबईहून नुकताच ड्रेझर आला आहे. लवकरच त्याचे काम सुरू होईल.
- संजय उघलमुगले, बंदर अधिकारी, रत्नागिरी

 

Web Title: Ratnagiri News Floating Drazier to remove mud from Mirkarwada