गणपतीपुळ्यात बुडताना चार तरुणांना वाचवले 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 23 ऑक्टोबर 2017

गणपतीपुळे -  या तीर्थक्षेत्री आज सायंकाळी चारच्या सुमारास चार बुडणाऱ्या युवकांना सुरक्षा रक्षकांनी वाचवले. आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी वारंवार पर्यटक आंघोळीला वा पोहायला उतरून जीव धोक्‍यात घालतात, असे निदर्शनास आले होते. मात्र आज रत्नागिरीतीलच चार युवक बुडता बुडता वाचले. 

गणपतीपुळे -  या तीर्थक्षेत्री आज सायंकाळी चारच्या सुमारास चार बुडणाऱ्या युवकांना सुरक्षा रक्षकांनी वाचवले. आठवडाभरात घडलेली ही दुसरी घटना आहे. याआधी वारंवार पर्यटक आंघोळीला वा पोहायला उतरून जीव धोक्‍यात घालतात, असे निदर्शनास आले होते. मात्र आज रत्नागिरीतीलच चार युवक बुडता बुडता वाचले. 

जुबेर राई (वय 19), सैजादा राई (वय 16), शरद गायकवाड (वय 19), आकाश जोगदंड (वय 22) असे वाचवलेल्या युवकांचे नाव आहे. एरवी घाटमाथा वा पुणे-मुंबईहून आलेले पर्यटक समुद्रस्नानाचा मोह न आवरल्याने समुद्रात उतरतात. धोक्‍याचा इशारा देऊनही ते खोलवर जातात. मात्र आज ही आपत्ती रत्नागिरीतील तरुणांनावर ओढवली.

उपरोक्त चौघेजण रत्नागिरीतून येथे आले. समुद्रात ते उतरले. तेथे मोठे चाळ पडले आहे. तो भाग डेंजर झोन म्हणून घोषितही केला आहे. आज हे चौघे समुद्रात उतरले तेव्हा ग्रामपंचायत जीवरक्षक रोहित चव्हाण व उमेश महादे यांनी या ठिकाणी समुद्रस्नानाला जाऊ नका, असे त्यांना बजावले, अशी माहिती पोलिसांनी दिली. मात्र त्यांचे न ऐकता चारहीजण समुद्रात उतरले. ओहोटी असल्याने आत ओढले गेले व फसले.

चौपाटीवर गस्त घालणाऱ्या जीवरक्षकांनी ते पाहिले. रोहित चव्हाण याने टिंग बोय व दोरी घेऊन वाचवण्यासाठी समुद्रात उडी घेतली. उमेश महादे दोरीने सहकार्य करत होता. चार युवक एकदम बुडत असल्याचे पाहून चौपाटीवरील मोरया वॉटर स्पोर्टस्‌चे मालक व कर्मचारी यांनी सहकार्य केले. मोरया वॉटर स्पोर्टस्‌, एएसआय व्ही. के. बनप, कॉन्स्टेबल सरगर, सागोलकर आदींनी मेहनत घेतली. 

चार दिवस गणपतीपुळे परिसरात पर्यटकांची मोठी गर्दी आहे. पर्यटक स्थानिकांच्या सूचनांचे पालन न करता समुद्रात उतरतात आणि जीवरक्षकांना स्वतःचा जीव धोक्‍यात घेऊन त्यांना वाचवण्याची वेळ येते. चार दिवसांतील ही दुसरी घटना आहे. पर्यटकांनी थोडा संयम बाळगणे आवश्‍यक आहे. 
- महेश ठावरे, सरपंच 
 

Web Title: Ratnagiri news Four youths were rescued in Ganapatipule