राजापुरात 170 दिवसांत प्रकटली गंगामाई 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 6 डिसेंबर 2017

राजापूर - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आज येथे सकाळी सातच्या सुमारास शहरानजीकच्या उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. येथील चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगास्थान या ठिकाणी जोरदारपणे गंगा प्रवाहित झाली आहे.

राजापूर - भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या गंगामाईचे आज येथे सकाळी सातच्या सुमारास शहरानजीकच्या उन्हाळे तीर्थक्षेत्री आगमन झाले. येथील चौदा कुंडांसह काशीकुंड आणि मूळ गंगास्थान या ठिकाणी जोरदारपणे गंगा प्रवाहित झाली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये ओखी वादळामुळे हवामानामध्ये बदल झालेले असून सोसाट्याचा वाराही सुटलेला आहे. त्यातच आज पहाटे अवकाळी पावसाने तालुक्‍यात हजेरी लावली. या परिस्थितीत गंगामाईचे आगमन झाल्याची सुवार्ता मिळाल्याने भाविक आनंदित झाले. 

गंगामाईचे 7 मे रोजी आगमन झाले होते. 43 दिवस तिचे वास्तव्य होते. त्यानंतर 19 जूनला गंगामाईचे निर्गमन झाले. त्यानंतर पुन्हा 170 दिवसांतच ती प्रकटली आहे. उन्हाळेचे पोलिसपाटील प्रकाश पुजारे, अमोल पवार, मंगेश तिर्लोटकर, विद्याधर गुरव हे गंगा परिसरामध्ये गेले असता त्यांना गंगा आल्याचे लक्षात आले. त्यांनी ती माहिती साऱ्यांना सांगितल्यावर गंगा देवस्थानचे पदाधिकारीही गंगास्थानी आले. गेल्या काही वर्षापासून गंगामाईचे आगमन लहरी ठरले आहे. त्यामुळे आज सकाळी गंगामाईचे आगमन झाल्याची माहिती मिळताच सुरवातीला अनेकांना अफवाच वाटली. अनेकांनी गंगामाईच्या दर्शनासाठी गंगातीर्थक्षेत्री धाव घेतली. शाळकरी मुलांनीही गंगास्थानी भेट देऊन दर्शन घेतले. अनेक शाळांना आज सुटी असल्याने त्यांची सुटीही सत्कारणी लागली. गंगा चांगली प्रवाहित आहे. सर्व कुंडांमध्ये पाण्याचे प्रमाणही वाढले आहे. गायमुखही प्रवाहित आहे. 

गंगेचे याआधीचे आगमन व वास्तव्य 
मार्च, 1985 (68 दिवस), जून, 1885(17 दिवस), डिसेंबर, 1886 (45 दिवस), ऑक्‍टोंबर, 1989(18 दिवस), डिसेंबर, 1890 (45 दिवस), ऑगस्ट, 1893 (16 दिवस), जुलै,1895 (18दिवस), जून, 1897 (22 दिवस), एप्रिल, 1899 (45 दिवस), मार्च, 1901 (45 दिवस), एप्रिल, 1902 (52दिवस), एप्रिल, 1905 (66 दिवस), सप्टेंबर, 1908 (51 दिवस), मार्च, 1910 (51 दिवस), मे, 1913 (36 दिवस), जून,1915 (29 दिवस), सप्टेंबर,1918 (53दिवस), त्यानंतर 18 वर्षाचा खंड, जुलै, 1936(12 दिवस), जून, 1938 (27 दिवस), एप्रिल, 1942 (45 दिवस), ऑक्‍टोंबर, 1945 (33 दिवस), मार्च, 1948 (39 दिवस), मार्च, 1950 (53 दिवस), जानेवारी, 1952 (27 दिवस), जुलै, 1955 (48 दिवस), 5 मे,1957 (41 दिवस), 8 मार्च,1960(61 दिवस), 23 जानेवारी, 1963 (48 दिवस), 7 मार्च, 1965 (50 दिवस), 8 मार्च, 1967 (71 दिवस), 2 मार्च,1970 (72 दिवस), 2 जानेवारी, 1973 (59 दिवस) 28 डिसेंबर,1974 (64 दिवस), 22 फेब्रुवारी,1977 (83 दिवस), 30 डिसेंबर,1979(68 दिवस), 4 जून,1981(18 दिवस), 5 जून,1983(21 दिवस), 4 मे,1985(45 दिवस), 17 मार्च, 1987(69 दिवस), 3 एप्रिल,1990(59 दिवस),30 मार्च,1993(75 दिवस), 10 जून,1995(61 दिवस), 25 एप्रिल,1998(62 दिवस), 26 जानेवारी, 2001 (98 दिवस), 9 एप्रिल, 2003 (29 दिवस), 20 डिसेंबर,2004(63 दिवस), 13 मे,2007 (70 दिवस), 28 मे, 2009 (70 दिवस), 10 फेब्रुवारी, 2011 (116 दिवस), 11 एप्रिल, 2012, 23 जून, 2013, 23 जुलै,2014, 27 जुलै, 2015, 31 ऑगस्ट, 016, 7 मे, 017, 6 डिसेंबर, 017 

गरम पाण्याच्या झऱ्याचा प्रवाह जैसे थे 
हवामानामध्ये बदल होऊन भूकंप वा भूगर्भामध्ये काही उलथा-पालथ झाल्यास गंगातीर्थक्षेत्रापासून काही अंतरावर असलेल्या आणि अर्जुना नदीच्या काठावरील उन्हाळे येथील गरम पाण्याच्या प्रवाहामध्ये काही बदल झाल्याचे अनेक वेळा अनुभवण्यास मिळाले आहे. काहीवेळा त्या ठिकाणी गढूळ पाणी वाहत असल्याचे निदर्शनास आले आहे. मात्र आज गरम पाण्याच्या झऱ्याच्या प्रवाहामध्ये कोणताही बदल झालेला नाही. 

आगमन, वास्तव्यातील बदल आश्‍चर्यकारक 

विज्ञानालाही कोडे न उमगलेली व भाविकांचे श्रद्धास्थान राजापूरच्या प्रसिद्ध गंगामाईचे उन्हाळे तीर्थक्षेत्री साधारणपणे दर तीन वर्षानी आगमन होते. तीन महिन्यांच्या वास्तव्यानंतर तिचे निर्गमन होते. मात्र, गेली सहा वर्षे सातत्याने गंगामाईचे तीर्थक्षेत्री वार्षिक आगमन होत आहे. गंगामाईचे आगमन आणि निर्गमन याची उकल करणे साऱ्यांनाच आव्हान ठरले आहे. तिच्या वास्तव्यामधील स्थित्यंतरही आश्‍चर्यकारक ठरते आहे. 
दर तीन वर्षांनी येऊन साधारण तीन दिवस ते 347 दिवस गंगामाईचे वास्तव्य राहिले आहे. सलग 37 वर्षे प्रतिवर्षी येणारी गंगा काहीवेळा अनेक वर्ष लुप्तही झाली होती.

गंगेच्या आगमनकाळात भरून वाहणाऱ्या चौदा कुंडांमध्ये तिच्या वास्तव्याव्यतिरिक्तच्या काळात पाण्याचा टिपूसही नसतो. अर्जुना नदीच्या पात्रापासून काही अंतरावर उंच टेकडीसारख्या भागामध्ये पाताळातून अवचितपणे प्रगटणाऱ्या आणि अवचितपणे निर्गमित होणाऱ्या गंगामाईचे कोडे अद्यापही कोणाला सुटलेले नाही. त्यामुळे चमत्काराचे गूढ तिच्याभोवती आहे. 1801 ते 1837 अशी सलग 37 वर्षे दरवर्षी गंगा येत होती. त्यानंतरच्या काळामध्ये सर्वसाधारणपणे तीन वर्षानंतर तिचे आगमन होत होते. 2011 पासून गेली सहा वर्षे प्रतिवर्षी तिची हजेरी लागली आहे.

सगळीकडे दुष्काळ असताना गंगामाईचे सर्वसाधारणपणे आगमन होते. 2009 पूर्वीच्या गंगामाईच्या वास्तव्याचा विचार करता सरासरी अडीच-तीन महिने तिचे वास्तव्य राहिले आहे. त्यानंतरचे तिचे वास्तव्य शंभर दिवसांहून अधिक आहे. गेल्या काही वर्षांपासून सातत्याने पावसाळ्यात तिचे आगमन होते. आज पावसाळी वातावरणात तिचे आगमन झाले, मात्र हंगामात नव्हे. गेल्या काही दिवसांमध्ये हवामानामध्ये कमालीचा बदल झालेला असताना अचानक गंगामाईचे झालेले आगमन साऱ्यांना कोड्यात टाकणारे आहे. गंगामाईचे आगमन, निर्गमन आणि वास्तव्य याबाबत फारसा कोणी अभ्यास केलेला दिसत नाही. 

गंगेच्या आगमन आणि निर्गमनाबाबतचे कोडे अद्यापही उलगडलेले नाही. गेली सहा वर्षे सातत्याने दरवर्षी गंगेचे आगमन झाले. नेमके असे कसे घडते याचे अंदाज बांधणे सद्यस्थितीमध्ये अशक्‍यप्राय गोष्ट आहे. म्हणून ही निसर्गाची किमया आणि गंगामाईचा चमत्कारच म्हणावा लागेल. 
- मंदार सप्रे, 
अध्यक्ष- गंगा देवस्थान 

Web Title: Ratnagiri News Ganga in Rajapur