रत्नागिरीत शिवसेनेकडे ९७ ग्रामपंचायती

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवले; मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर व चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवल्यामुळे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला फटका बसला असून काँग्रेसला लांजा, मंडणगडमध्ये खातेही उघडता आलेले नाही.

रत्नागिरी - ग्रामपंचायत निवडणुकीत पुन्हा एकदा शिवसेनेने भगवा फडकविण्यात यश मिळवले; मात्र सेनेच्या बालेकिल्ल्यात रत्नागिरी, गुहागर, संगमेश्‍वर व चिपळूण तालुक्‍यात भाजपनेही काही ग्रामपंचायतीत कमळ फुलवल्यामुळे आशादायक चित्र निर्माण झाले आहे. उत्तर रत्नागिरीत राष्ट्रवादीला फटका बसला असून काँग्रेसला लांजा, मंडणगडमध्ये खातेही उघडता आलेले नाही.

जिल्हा परिषद ग्रामपंचायतींच्या निवडणुकीची मतमोजणी मंगळवारी शांततेत पार पडली. दुपारी १ वाजेपर्यंत संपूर्ण जिल्ह्याचे चित्र स्पष्ट झाले. १५४ ग्रामपंचायतींसाठी मतदान झाले होते. सुमारे ९७ ग्रामपंचायतींवर शिवसेनेने दावा केला आहे. खेडपासून ते अगदी राजापूरपर्यंत सर्वच तालुक्‍यात सेनेच्या उमेदवारांनी मजल मारली. उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्‍यांमध्ये राष्ट्रवादीने जोरकस प्रयत्न केले होते; परंतु त्यात यश आले नाही. खेड, दापोलीत पर्यावरणमंत्री रामदास कदम यांचा मुलगा योगेश याने चांगलेच यश मिळविले. तेथे दहा ग्रामपंचायतींवर सेनेचा भगवा फडकला. मंडणगडात तेरापैकी दहा ठिकाणी सेनेचे सरपंच बसले. उर्वरित ग्रामपंचायती गाव पॅनेलच्या खात्यात आहेत.

रत्नागिरी तालुक्‍यातील २९ पैकी २३ ग्रामपंचायतींवर भगवा फडकला, तर सहा ठिकाणी कमळ फुलल्याचा दावा भाजपने केला. तसेच २४४ पैकी १९३ सदस्यांच्या जागांवर शिवसेनेने, ५१ जागांवर भाजपने दावा केला. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला एकही ग्रामपंचायत ताब्यात घेता आलेली नाही. खेडमध्ये अपेक्षेप्रमाणे शिवसेनेकडे सात ग्रामपंचायती आल्या. राष्ट्रवादीकडे तीन ग्रामपंचायती आल्या आहेत. राजापूर २५ पैकी १७ शिवसेना, १ राष्ट्रवादी, १ काँग्रेस, ६ गाव पॅनेल, भाजपला एकही जागा मिळाली नाही. 

संगमेश्‍वरात ३५ पैकी १३ ग्रामपंचायती शिवसेनेकडे आहेत. या तालुक्‍यात भाजपने चांगलीच मुसंडी मारली आहे. बारा सरपंचपदांवर दावा केला आहे; मात्र १० ठिकाणी गाव पॅनेलची सत्ता आहे. चिपळूण तालुक्‍यातील महत्त्वाच्या ग्रामपंचायती शिवसेनेने गमाविल्यामुळे १९ पैकी किती ग्रामपंचायतींवर सेनेचे वर्चस्व आहे हे सांगणेही नेत्यांनी टाळले.

राष्ट्रवादीकडून ४ ग्रामपंचायतींवर वर्चस्व आहे. लांजा तालुक्‍यात १९ पैकी १५ शिवसेनेला मिळाल्या असून काँग्रेस ३ आणि गाव पॅनेलकडे १ ग्रामपंचायत आहे. लांजा-राजापूर मतदारसंघात काँग्रेस, राष्ट्रवादीला जागा मिळविता आली; पण भाजपला खाते खोलता आलेले नाही. राष्ट्रवादीच्या बालेकिल्ला असलेल्या गुहागरमध्येही भाजपने ३ ग्रामपंचायती पटकावून चांगलाच दणका दिला. तेथे सेनेनेही २ ग्रामपंचायती राखल्या असून राष्ट्रवादीकडे २ ग्रामपंचायती आहेत.

 

Web Title: ratnagiri news Grampanchayat Election result