गुहागरला राष्ट्रवादीची नजर उमेदवार निवडीवर

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 मार्च 2018

गुहागर - नगरपंचायतीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुहागरमध्ये राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार भास्कर जाधव उमेदवारी कधी जाहीर करतात, याकडे लक्ष ठेवून आहेत. कुणबी समाज संघटना आणि भाजप यांच्या शहर विकास आघाडीबाबतची बोलणी नव्याने सुरू झाली आहेत. 

गुहागर - नगरपंचायतीसाठी आचारसंहिता लागू झाल्यानंतर गुहागरमध्ये राजकीय पक्षांच्या हालचालींना वेग आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते आमदार भास्कर जाधव उमेदवारी कधी जाहीर करतात, याकडे लक्ष ठेवून आहेत. कुणबी समाज संघटना आणि भाजप यांच्या शहर विकास आघाडीबाबतची बोलणी नव्याने सुरू झाली आहेत. 
शिवसेनाही भाजपच्या हालचालींवर लक्ष ठेवून आहे. त्यामुळे पुढील काही दिवसात भाजप, शिवसेना आणि कुणबी समाजाची एकत्र आघाडी नगरपंचायतीच्या रणसंग्रामात उतरेल, अशी चिन्हे आहेत.

गुहागर नगरपंचायतीच्या निवडणुकीमध्ये फार मोठी उलथापालथ होणार असे सध्याचे चित्र आहे. आमदार भास्कर जाधव यांच्या नेतृत्वाखाली शहरातील राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते निवडणुकीला सामोरे जाणार आहेत. तालुकाध्यक्ष विनायक मुळे यांच्यासह शहर आणि तालुक्‍यातील काही कार्यकर्त्यांची उमेदवार निवडीसाठी समिती बनविण्यात आली होती. या समितीने शहरातील विविध गटांच्या भेटी घेऊन प्रत्येक प्रभागात दोन ते तीन उमेदवारांची निश्‍चिती केली आहे. यापैकी कोणता उमेदवार निश्‍चित करायचा याचा अंतिम निर्णय आमदार भास्कर जाधव घेणार आहेत. काही प्रभागातील इच्छुक उमेदवारांनी आपली उमेदवारी निश्‍चित समजून प्रचाराला सुरवात केली आहे. 

प्रभाग रचनेनंतर काही काळ कुणबी समाज पुरस्कृत शहर विकास आघाडीचे गणित कोलमडले होते. माजी आमदार डॉ. विनय नातू, जिल्हा सरचिटणीस प्रशांत शिरगांवकर, जिल्हा चिटणीस श्रीकांत महाजन, पंचायत समिती सदस्या सौ. स्मिता धामणस्कर, तालुकाध्यक्ष सुरेश सावंत आणि तालुका सरचिटणीस नीलेश सुर्वे यांच्या कमिटीने शहरातील भाजप कार्यकर्त्यांच्या गाठी भेटी घेतल्या. त्यामध्ये कुणबी समाज संघटनेला सोबत घेऊन निवडणूका लढविल्यास नगरपंचायत ताब्यात येऊ शकते असा निष्कर्ष निघाला. त्यामुळे भाजपच्या या कमिटीने विविध स्तरावरून कुणबी समाजातील मंडळींशी बोलणी सुरू केली. ही बोलणी यशस्वी होताना दिसत आहेत. शिवसेनादेखील या आघाडीत सामील होण्याची चिन्हे आहेत. आचारसंहिता लागल्याने, निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्याने आघाडीच्या घडामोडींना वेग आला आहे. गुहागर नगरपंचायतीचा नगराध्यक्ष थेट जनतेमधून निवडून द्यायचा आहे. त्यामुळे संपूर्ण शहराची पसंती ठरेल असा चेहरा कोणता याचा शोध सर्वच राजकीय पक्ष घेत आहेत.

Web Title: Ratnagiri News Guhagar Nagar Panchayat Election