सेना नेत्यांनी जमिनी विकूच कशा दिल्या? - जयंत पाटील

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 7 मे 2018

रत्नागिरी -  नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना कोकणी माणसाला फसवत आहे, असा आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मालगुंड येथे केला.शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी जमिनी विकूच कशा दिल्या, असा सवालही त्यांनी केला.    

रत्नागिरी -  नाणार रिफायनरी प्रकल्पाबाबत शिवसेना कोकणी माणसाला फसवत आहे, असा आरोप शेकापचे आमदार जयंत पाटील यांनी मालगुंड येथे केला.शिवसेनेच्या आमदार, खासदारांनी जमिनी विकूच कशा दिल्या, असा सवालही त्यांनी केला.         

मालगुंड येथे झालेल्या कार्यक्रमानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. ते म्हणाले, सेनेने भूमिका स्पष्ट आणि ठाम ठेवली पाहिजे. उद्योगमंत्र्यांनी हा ठराव सभागृहात मांडला तेव्हा आम्ही उपस्थित होतो. सभागृहात एक भूमिका आणि बाहेर एक भूमिका अशा प्रकारे फसवणूक करू नये. या प्रकल्प परिसरात शिवसेनेचे खासदार, आमदार आहेत. त्यामुळे प्रकल्पाला जागा देण्यापासून परावृत्त करण्याची जबाबदारी शिवसेनेची आहे. ज्या जमीनमालकांनी आपल्या जमिनी दिल्लीच्या, मुंबईच्या भांडवलदारांना विकल्या त्यापासून मन वळविण्याची नैतिक जबाबदारी शिवसेनेची होती. 

शेतकऱ्यांना दडपून, त्यांच्यावर अन्याय करून कोणताही प्रकल्प होऊ नये, अशी भूमिका शेकापची आहे. पण मुख्यमंत्र्यांचे मन वळविण्याची जबाबदारी सेनेची आहे. शेकाप जनतेसोबत आहे, गरज पडल्यास आम्ही नाणारला भेट देऊ. कोकणी माणसं भोळी आहेत, त्यांना कोणीही फसवतं.रायगडमध्ये आम्ही विकलेल्या जमिनी परत घेतल्या. आज रत्नागिरीत वेगळी परिस्थिती आहे. उद्धव ठाकरे, तुमचेच मंत्री आणि विरोधही तुम्हीच करता हे गणित मला कळलेलं आहे. ही कोकणी माणसाची फसवणूक आहे. 

निवडणुका एकत्र लढवून वर्चस्व 
रायगडमध्ये गेल्या तीन वर्षांतील सर्व निवडणुका एकत्र लढवून वर्चस्व राखले. रायगडमध्ये आम्हाला बहुमत आहे. राणेंनीही भूमिका स्पष्ट केली, त्यामुळे आमचा विजय निश्‍चित आहे. सुनील तटकरे यांचा तिन्ही जिल्ह्यांत संपर्क आहे. त्यामुळेच अनिकेत तटकरे यांना संधी मिळाली.

Web Title: Ratnagiri News Jayant Patil comment