माउलींच्या रथाप्रमाणे विठ्ठलाच्या रथाची आरास

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 28 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव यंदा लक्षवेधी ठरणार आहे. आषाढी वारीला आळंदीत ज्ञानेश्वर माउलींचा रथ फुलांनी सजवणारे विष्णू आवटे हे विठोबाचा रथ फुलांनी सजवणार आहेत. तसेच माउलींच्या रथासमोरील रांगोळीसाठी प्रसिद्ध असलेल्या व गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या रांगोळीकार राजश्री जुन्नरकर रांगोळी साकारणार आहेत.

रत्नागिरी - येथील ऐतिहासिक विठ्ठल मंदिरात कार्तिकी एकादशीचा उत्सव यंदा लक्षवेधी ठरणार आहे. आषाढी वारीला आळंदीत ज्ञानेश्वर माउलींचा रथ फुलांनी सजवणारे विष्णू आवटे हे विठोबाचा रथ फुलांनी सजवणार आहेत. तसेच माउलींच्या रथासमोरील रांगोळीसाठी प्रसिद्ध असलेल्या व गिनीज बुकमध्ये नोंद झालेल्या रांगोळीकार राजश्री जुन्नरकर रांगोळी साकारणार आहेत. विठ्ठल मंदिरापासून गवळी वाड्यापर्यंतचा परिसर त्यांच्या रांगोळीने सजणार आहे.

प्रतिपंढरपूर समजले जाणाऱ्या या मंदिराला सुमारे ४०० वर्षांचा इतिहास आहे. दरवर्षी वारीला जाणारे मंडळाचे कार्यकर्ते राजा केळकर यांच्या ओळखीतून आवटे व जुन्नरकर येथे येणार आहेत. ज्ञानेश्वर माउलींच्या रथाची आरास करणारे विष्णू आवटे व राजश्री जुन्नरकर यांनी येथे रांगोळी काढावी, अशी मंडळाची इच्छा होती. दोघांशीही बोलल्यानंतर ते यायला तयार झाले आहेत. कलेच्या माध्यमातून पांडुरंगाची सेवा करण्याचे त्यांनी मान्य केले असून त्यांचा देवस्थानतर्फे सत्कार करण्यात येणार आहे, अशी माहिती विठ्ठल-रखुमाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते तथा नगरसेवक राजू तोडणकर यांनी दिली.

श्री. आवटे यांनी केलेली पुष्प सजावट सर्वांनाच भावणारी असते. आगळ्या-वेगळ्या प्रकारे होणारी ही सजावट रत्नागिरीकरांना नक्कीच आवडेल व लक्षवेधी ठरेल. त्यामुळे विठोबाचा रथसुद्धा आणखी खुलून दिसेल. तसेच रांगोळीकार राजश्री जुन्नरकर ही एकादशीला भव्य रांगोळी साकारणार आहे. त्यांनी सहा तासांत ११ किमी लांब रांगोळी साकारण्याचा विक्रम केला आहे. या विक्रमाची नोंद गिनीज बुकात झाली आहे.

येत्या २ नोव्हेंबरला श्रींची पालखी दुपारी १ वाजता नगर प्रदक्षिणेसाठी बाहेर पडेल. ५ नोव्हेंबरला काकडा आरतीने उत्सवाची सांगता होईल. मंदिरात वर्षभर काकड आरती होते; मात्र कोजागिरी ते त्रिपुरारी पौर्णिमा या कालावधीतील ही आरती फार प्रसिद्ध आहे. या उत्सवासाठी श्री विठ्ठल मंदिर संस्था व विठ्ठल रखुमाई मित्रमंडळाचे कार्यकर्ते जय्यत तयारी करत आहेत.

नगरसेवक फाळकेंच्या हस्ते महापूजा
येत्या ३० ऑक्‍टोबरला पहाटे २ वाजता महापूजेने कार्तिकी एकादशीच्या उत्सवाला प्रारंभ होणार आहे. नगरसेवक रोशन फाळके यांच्या हस्ते विठ्ठल रखुमाईची महापूजा होणार आहे. त्यानंतर काकडा आरती आणि दिवसभर विविध भजनी मंडळांची भजने होईल. रात्री १२ वाजता श्री विठ्ठलाचा रथ बाहेर पडणार आहे.

 

Web Title: ratnagiri news Kartik Ekadashi Fest