काव्य प्रतिभा फुलविणारे केशवसुतांचे घर भग्नावस्थेत

काव्य प्रतिभा फुलविणारे केशवसुतांचे घर भग्नावस्थेत

दापोली - चातुवर्ण्य व्यवस्थेचा पगडा असणाऱ्या काळात ‘ब्राह्मण नाही, हिंदूही नाही, ना मी एक पंथाचा’ तेच पतित की, जे आखडती प्रदेश साकल्याचा’, अशी वैचारिक क्रांतीची काव्यसुमने लिहिणाऱ्या कृष्णाजी केशव दामले ऊर्फ कवी केशवसुत यांचे वळणे (ता. दापोली) येथील घर भग्नावस्थेत पडले आहे.

केशवसुतांना ज्या ठिकाणी काव्य संपदा स्फुरली, त्या वळणे गावात केशवसुतांची स्मृती कायम राहण्यासाठी या घराची दुरुस्ती करून त्याचे जतन करावे, अशी येथील ग्रामस्थांची इच्छा आहे.

विषय आणि अभिव्यक्ती या सर्वार्थाने आधुनिक कवितेचे जनक ठरलेल्या कवी केशवसुतांचे दापोली तालुक्‍यात दाभोळ मार्गावर वळणे हे गाव आहे. केशवसुतांच्या काव्य प्रतिभेची खरी सुरवात याच वळणे गावातून झाली. केशवसुतांचे जन्मगाव रत्नागिरी तालुक्‍यातील मालगुंड असले तरी दापोली येथील वळणे येथे काहीकाळ त्यांचे वास्तव्य होते. निसर्गरम्य वळणे गावातून शांतपणे वाहणारी नदी, तेथील केवड्याचे बन, नारळी, पोफळी, आंबा, काजू आणि विविध प्रकारच्या झाडांनी नटलेल्या रम्य परिसराने केशवसुतांच्या मनातील काव्य प्रतिभा जागृत होऊन कवितांनी आकार घेतला. या काव्यांचा सुगंध सर्वदूर दरवळला. केशवसुतांचे वास्तव्य असलेले वळणे गावातील घर भग्नावस्थेत पडले असून सद्यस्थितीमध्ये घराच्या पडलेल्या भिंती व घराचे जोत्याच्या बांधकामाचे अवशेषच फक्त शिल्लक राहिले आहेत. वळणे येथील केशवसुतांच्या घराच्या दुरुस्तीबाबत कवी मधू मंगेश कर्णिक महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक महामंडळाचे अध्यक्ष असताना यासाठी प्रयत्न केले होते. मात्र योग्य प्रतिसाद न मिळाल्याने आजच्या घडीला फक्त आठवणीच शिल्लक राहिल्या आहेत.

दापोलीमध्ये येणाऱ्या साहित्यप्रेमी पर्यटकांना आद्य कवी केशवसुत यांचे वळणे गावी असलेल्या घरी जाऊन ते पाहण्याची इच्छा असते. मात्र, आज तेथे दुर्दैवाने ते घर जमीनदोस्त झाल्यामुळे केशवसुत यांच्या घरी जाऊ इच्छिणाऱ्या पर्यटकांची घोर निराशा होते.
- प्रशांत परांजपे,
केंद्रीय कार्यवाह, कोमसाप.

मालगुंड या केशवसुतांच्या जन्मगावी कोकण मराठी साहित्य परिषदेच्या प्रयत्नाने कवी केशवसुतांची स्मृती चिरंतन ठेवण्यासाठी आणि नवोदित साहित्यिकांना प्रोत्साहन मिळण्यासाठी एक वेगळेपण असलेले स्मारक उभारले आहे. मराठी साहित्य अजरामर केलेल्या तुतारीकार केशवसुतांच्या स्मृती जपण्यासाठी वळणे येथील भग्नावस्थेत असलेले केशवसुतांचे घर दुरुस्त करून स्मारक उभारल्यास साहित्यप्रेमी पर्यटकांना एक नवे दालन खुले होईल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com