‘प्रीतिसंगम’तील सांगीतिक मूल्य कमी पडत असल्‍याचा दावा 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 सप्टेंबर 2017

रत्नागिरी - आचार्य अत्रे यांच्यासारख्या सिद्धहस्त नाटककाराच्या लेखणीतून उतरलेले आणि सांगीतिकदृष्ट्याही गाजलेले सं. प्रीतिसंगम आधुनिक परीक्षकांच्या पसंतीस पडत नाही. या नाटकातील सांगीतिक मूल्य कमी पडते, असा शासकीय परीक्षकांचा दावा आहे. त्यामुळे यापेक्षा उच्च सांगीतिक मूल्ये असलेल्या नाटकांची यादी द्या, ती नाटके सादर करू, अशी मागणी करणाऱ्या खल्वायन संस्थेला यादी देण्यात टोलवण्यात आले आहे. त्यामुळे आजवर चार नाटकांना प्रथम क्रमांक मिळवलेल्या या संस्थेने एकूणच कारभाराविषयी नाराजी व्यक्त केली आहे.

महाराष्ट्र शासनाच्या संगीत राज्य नाट्य स्पर्धेत सादर करण्यासाठी खल्वायनने यादी मागवून चार महिने झाले तरी सांस्कृतिक कार्य संचालनालयाकडून यादी न मिळाल्याने जानेवारी २०१८ च्या स्पर्धेत भाग घेण्यासाठी संस्थेकडे अवधीच राहणार नाही.

५६ व्या हौशी संगीत नाट्य स्पर्धेत खल्वायनने सं. प्रीतिसंगम सादर केले. संगीत नाटकांच्या दर्जाबाबत प्रश्‍न उपस्थित झाला. त्यामुळे खल्वायनने माहितीच्या अधिकारात परीक्षकांच्या निर्णयाची माहिती मागविली. परीक्षकांनी हे नाटक गद्य दिग्दर्शन, कलाकार अभिनय, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा, प्रकाश योजना, ट्रीक सिन्स उत्कृष्ट असल्याचे नमूद केले. मात्र, सांगीतिक मूल्यात कमी पडले, असे म्हटले आहे. त्यामुळे अत्रेंच्या पदांना संगीत दिग्दर्शक पद्मश्री वसंत देसाई यांनी पाडलेले पैलूही डावेच ठरतात, असे मत मनोहर जोशी यांनी व्यक्त केले.

संत सखू व अंबादास यांच्या जीवनावरील ‘प्रीतिसंगम’मध्ये भक्तीरस असल्याने भजनी ठेका, ताल वापरला केला आहे. त्यामुळे भजनी तालाचा अभंगाचाच तोचतोचपणा जाणवतो व सांगीतिक कस या दृष्टीने नाटक तुलनेने कमी पडल्याचे परीक्षकांनी लिहिले.

प्रीतिसंगममधील काही गीतांच्या चाली उपलब्ध नसल्याने विठूचा गजर, घेई माझे वाचे, आमुची पंढरी आदी पदांना खल्वायनच्या संगीत दिग्दर्शकांनी संगीत दिले. आणखी एका भजनांचे प्राबल्य असलेले नाटक सांगीतिक कस मूल्याने गुणांकनात मागे पडल्याची टिप्पणी परीक्षकांनी केल्याने अशी नाटके करावीत की करू नये, असा प्रश्‍न निर्माण झाल्याचे खल्वायनचे म्हणणे आहे. 

शासन, परीक्षकांवर आक्षेप घेण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र दर्जेदार संगीतमूल्य असलेल्या नाटकांचे सादरीकरण अन्य संस्थांकडून व्हावे व सर्वांचाच वेळ, पैसा वाचावा, ही आमची यामागची भूमिका आहे. निकाल आम्हाला मान्य नाही; तो चुकीचा आहे अशी आमची कुरकुर नाही. यानिमित्ताने सांगीतिक मूल्यांवर चर्चा व्हावी.
- मनोहर जोशी

Web Title: ratnagiri news konkan