कोकणात ‘राष्ट्रवादी’च्या काहींकडून भाजपचा प्रचार?

मुझफ्फर खान
रविवार, 10 जून 2018

चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार मैदानात असताना ‘राष्ट्रवादी’चे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार करीत आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या अधिकृत उमेदवाराला जिल्ह्यातून कमी मतदान होण्याची शक्‍यता आहे.

चिपळूण - कोकण पदवीधर मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेसचा अधिकृत उमेदवार मैदानात असताना ‘राष्ट्रवादी’चे काही कार्यकर्ते भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराचा उघडपणे प्रचार करीत आहेत. त्यामुळे ‘राष्ट्रवादी’च्या अधिकृत उमेदवाराला जिल्ह्यातून कमी मतदान होण्याची शक्‍यता आहे.

आघाडी सरकारच्या काळात निरंजन डावखरे ‘राष्ट्रवादी’च्या उमेदवारीवर निवडून आले होते. आता राज्यात भाजपची सत्ता आहे. भाजपकडून उमेदवारी घेतल्यास विजय सोपा होईल, या हेतूने डावखरे यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश मिळविला. भाजपलाही आर्थिकदृष्ट्या सक्षम उमेदवार हवा होता. त्यामुळे डावखरे यांचे भाजपने स्वागत केले. त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी डावखरे यांना गद्दार ठरवून त्यांची पक्षातून सहा वर्षांसाठी हकालपट्टी केली. पक्षाने गद्दार ठरविलेल्या डावखरे यांच्या प्रचारासाठी रत्नागिरी जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’चे स्थानिक कार्यकर्ते काम करीत असल्याने आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. 

विधान परिषदेच्या कोकण स्थानिक स्वराज्य मतदारसंघाच्या निवडणुकीत भाजपने शिवसेनेला धडा शिकविण्यासाठी ‘राष्ट्रवादी’ला मदत केली होती. त्याची परतफेड करण्यासाठी ‘राष्ट्रवादी’चे काही पदाधिकारी भाजपला सहकार्य करीत असल्याची चर्चा जिल्ह्यात सुरू झाली आहे. डावखरे यांच्याशी असलेले पूर्वीचे संबंध जपण्यासाठी काहीजण त्यांना मदत करीत आहेत. 

जिल्ह्यातील ‘राष्ट्रवादी’चे एकही मत बाहेर जाणार नाही. आम्ही सर्व उमेदवार नजीब मुल्ला यांच्यासाठीच काम करीत आहोत. पक्षाध्यक्ष शरद पवार यांच्या शब्दाबाहेर कार्यकर्ते जाणार नाहीत. दोन दिवसांत जिल्ह्यातील प्रचाराची दिशा ठरेल. पक्षविरोधी प्रचाराचा हा केवळ अप्‌प्रचार आहे. त्यात तथ्य नाही. विरोधी काम करणाऱ्यांवर पक्ष कारवाई करेल.
- जमीर मुल्लाजी, 

   जिल्हाध्यक्ष, राष्ट्रवादी वक्ता सेल

Web Title: Ratnagiri News Konkan Graduate Constituency Election