कोकणातील घाटरस्त्याच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर 

मुझफ्फर खान
मंगळवार, 31 जुलै 2018

अरूंद रस्ते, धोकादायक पूल आणि अवघड व नागमोडी वळणांतून प्रवास सुरू आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे अपघातामुळे समोर आले. 

चिपळूण - बस आंबेनळी घाटातील दरीमध्ये कोसळून झालेल्या दुर्घटनेत 30 कर्मचारी मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेमुळे दोन वर्षांपूर्वी महाडजवळ घडलेल्या सावित्री पूल दुर्घटनेच्या आठवणी जाग्या झाल्या. या बस दुर्घटनेनंतर घाटमार्गाच्या सुरक्षिततेचा मुद्दा ऐरणीवर आला. अरूंद रस्ते, धोकादायक पूल आणि अवघड व नागमोडी वळणांतून प्रवास सुरू आहे. घाटरस्त्याचे रुंदीकरण, सुरक्षेसाठी आवश्यक उपाययोजनांकडे सरकारचे दुर्लक्ष झाल्याचे अपघातामुळे समोर आले. 

मागील दहा वर्षात मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाने शेकडो बळी घेतले. यातील सर्वाधिक अपघात धोकादायक पुलावर आणि घाट रस्त्यावरील वळणावर झाले. घाटातील दरीत वाहने कोसळून प्रवाशांचे बळी गेले. 31 जुलै 2016 ला सावित्री पूल दुर्घटना आणि खेडच्या जगबुडी नदीवरील पुलावरून कोसळलेली बस हे दोन अपघात भयानक होते. भाजप सरकारने 2017 पर्यंत महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचे आश्‍वासन दिले होते. 2018 मधील सहा महिने झाले तरी चौपदरीकरणाचे निम्मे कामही झालेले नाही. राष्ट्रीय महामार्गाची खड्यांमुळे चाळण झाली आहे.

धोकादायक खड्यांमुळे हा मार्ग प्रवाशांच्या जीवावर बेतला आहे. महामार्गाच्या सुरक्षिततेकडे शासन गांभीर्याने पाहत नसल्याचे दिसते आहे. वाहनांच्या अपघातांसह या मार्गावर दरडी कोसळण्याच्या घटना घडतात, त्यामुळे हा मार्ग वाहतुकीसाठी बंद ठेवला जातो. सुरक्षेच्या उपाययोजनांच्या अभावामुळे या मार्गावर प्रवाशांना आपला जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. गणेशोत्सव काळातही हा धोका कायम राहणार आहे. 

शनिवारी घडलेल्या बस दुर्घटनेनंतर मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गाच्या रुंदीकरणासाठी वा सुरक्षिततेसाठी शासनाने जलदगतीने चालना द्यावी. म्हणजे भविष्यातील हानी टाळता येईल. 

- विलास महाडिक, पेढे 

 

Web Title: Ratnagiri News Konkan Security issue of Ghat Road