विद्यापीठाच्या भोंगळ कारभारामुळे तरुण शेतीकडे

सचिन माळी
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

बीएस्सी झालेला राहुल रवींद्र साळवी आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेल्या अमर राजाराम पिचुर्ले या दोन तरुणांनी अडीच एकरमध्ये कलिंगड, माट, घेवडा, दुधी, भेंडी याची शेती फुलवली आहे.

मंडणगड - उशिरा निकाल लागल्यामुळे पुढील शिक्षणासाठी प्रवेश न मिळालेल्या दोन तरुणांनी नाउमेद न होता अंगमेहनतीकडे मोर्चा वळवून कलिंगडाची शेती केली आहे.

बीएस्सी झालेला राहुल रवींद्र साळवी आणि केमिकल इंजिनिअरिंगमध्ये डिप्लोमा केलेल्या अमर राजाराम पिचुर्ले या दोन तरुणांनी अडीच एकरमध्ये कलिंगड, माट, घेवडा, दुधी, भेंडी याची शेती फुलवली आहे. या लागवडीत त्यांनी ३५०० रोपे काढली आहेत. त्यामुळे एप्रिलअखेर त्यातून टनावारी कलिंगडे मिळण्याची त्यांची अपेक्षा आहे.

पुढील शिक्षणासाठी प्रवेश न मिळाल्याने घरी बसून राहण्यापेक्षा कलिंगड लागवडीतून उत्पादन घेण्याचे ठरवले. पहिलाच प्रयोग असल्यामुळे येणारा अनुभव महत्त्वाचा असेल.
- राहुल साळवी

गावाच्या माथ्यावर धरण असल्यामुळे गावाला पाणी टंचाईच्या झळा जाणवत नाहीत. मुबलक पाणी असूनही त्याचा शेतीसाठी वापर केला जात नव्हता. मात्र मागील काही वर्षांपासून येथील तरुण शेतकरी आधुनिक शेतीकडे वळला आहे. राहुल व अमर या दोघांनी एकत्र येऊन शेतीची कास धरली. त्यासाठी त्यांना घरच्यांचे प्रोत्साहन व पाठबळ मिळाले आहे. त्यांनी बाणकोट-पंढरपूर या राष्ट्रीय महामार्गाशेजारी असणाऱ्या वडिलोपार्जित जमिनीत विविध प्रकारची पालेभाजी व फळभाजीची जानेवारीच्या सुरवातीला लागवड केली. ट्रॅक्‍टरने जमीन नांगरली. त्यात बियाणे पेरले. मोकाट जनावरांपासून रक्षण करण्यासाठी रोपे बाहेर येण्याच्या कालावधीत संपूर्ण जागेला नैसर्गिक करवंदीच्या जाळीचे संरक्षक कुंपण घातले.

मला शेतीची आवड आहे. मुंबई जाऊन नोकरी करण्यापेक्षा येथील उपलब्धतेनुसार विविध प्रकारची लागवड करण्याचा मानस आहे. त्यासाठी वडिलांचे प्रोत्साहन महत्त्वाचे ठरले.
- अमर पिचुर्ले

धरणाच्या कालव्यातून व जवळच असणाऱ्या विहिरीतून रोपांना पाणीपुरवठा ते करतात. रोपांची विशेष काळजी घेतली जाते. सरडे, कीटक, उंदीर यांच्यापासून त्यांचे संरक्षण करण्यासाठी दोघेही दिवस रात्र शेतातच असतात. शेतीचा अनुभव असणारे त्यांचे काका सुभाष पवार यांचे मार्गदर्शन त्यांना मिळत आहे. प्रामुख्याने सेंद्रिय खतांचा वापर ते करतात. सुट्टीच्या दिवशी मित्र, कुटुंबातील सदस्य त्यांना मदत करतात. दिवसाच्या कामाचे वेळापत्रक दोघांनीही ठरवून घेतले आहे. जवळच राष्ट्रीय महामार्ग असल्यामुळे तेथे स्टॉल उभारून शेतमालाची विक्री करणार आहेत. त्यामुळे वाहतूक खर्च वाचेल. प्रयोग म्हणून केलेली कलिंगडाची यशस्वी लागवड आगामी काळात त्यांना आधुनिक शेतीकडे वळण्यास प्रेरित करणारी ठरेल.

 

Web Title: Ratnagiri News Late Result of University exam affects students