भक्ष्याच्या शोधार्थ बिबट्यांचे माणसांवर वाढते हल्ले

संदेश सप्रे
शनिवार, 30 डिसेंबर 2017

देवरूख - एकामागोमाग एक सापडणारे बिबटे आणि भक्ष्य म्हणून बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा मानवीवस्तीत होणारा वावर वाढला आहे

देवरूख - एकामागोमाग एक सापडणारे बिबटे आणि भक्ष्य म्हणून बिबट्यांकडून पाळीव प्राण्यांवर हल्ला करण्यासाठी त्यांचा मानवीवस्तीत होणारा वावर वाढला आहे. याहीपेक्षा भयप्रद गोष्ट म्हणजे घराशेजारी वा गोठ्यात भक्ष्यासाठी आले असताना त्यांनी माणसांवर केलेले हल्ले तसेच वाटेवर दुचाकीस्वारांवर घातलेली उडी या बाबी गेल्या वर्षभरातील सर्वात चिंताजनक ठरल्या. त्याचबरोबर फासकीत अडकून बिबट्यांचे मृत्यू वारंवार होत आहेत.

२०१० पासूनची आकडेवारी पाहिल्यास आजपर्यंत रत्नागिरी जिल्ह्यात ३७ बिबट्यांना प्राण गमवावा लागला आहे. यात फासकीत अडकणाऱ्या बिबट्यांची संख्या सर्वाधिक ठरली आहे. जिल्हाभरात गेल्या ७ वर्षांत नैसर्गिकरीत्या १६ बिबट्यांचा मृत्यू झाला तर रस्ता - रेल्वे अपघातात ७ बिबट्यांना जीव गमवावा लागला. जिल्हाभरात आतापर्यंत शिकारीत ३ बिबटे मारले गेल्याचीही नोंद आहे.

फासकीत गुरफटून ८ ठार
आजपर्यंत जिल्ह्यात विविध भागांत २३ ठिकाणी बिबटे फासकीत अडकले. त्यात गुरफटून ८ बिबट्यांचा मृत्यू झाला तर जखमी झालेल्या १५ बिबट्यांवर औषधोपचार करून त्यांना सुखरूप जंगलात सोडून देण्यात आले. आत्तापर्यंत १७ ठिकाणी बिबटे विहिरीत पडले. यावर्षी सर्वाधिक बिबटे विहिरीत पडले. यात ४ बिबट्यांना जीव गमवावा लागला तर १३ बिबटे सुखरूप बाहेर काढण्यात आले. रत्नागिरी जिल्ह्यात २६ वनरक्षक, तर १० वनपाल आणि ३ वनपरिक्षेत्र अधिकारी आहेत. या सर्वांमार्फत बिबटे आढळल्याची घटना घडल्यावर तत्काळ जाऊन त्यांना सुखरूप सोडविण्याची कार्यवाही केली जाते. 

सरत्या वर्षात तालुक्‍यात पाच ठिकाणी बिबटे सापडले. यामध्ये पहिला बिबट्या जुलै महिन्यात आंबा घाटातील एका वळणात सापडला. त्याला पकडून सुखरूप जंगलात सोडण्यात आले. यानंतर ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यात साखरपा-गुरववाडीत फासकीत अडकलेल्या बिबट्याला सुखरूप सोडविण्यात वन विभागाला यश आले होते. २३ ऑगस्टला निवेखुर्द येथील ग्रामस्थ सीताराम सोनू लाडे यांच्या शेणखईत बिबट्या मृतावस्थेत सापडला.

सप्टेंबरमध्ये मारळला एका घराशेजारी जखमी अवस्थेतील बिबट्या सापडला मात्र उपचार होण्यापूर्वीच तो मृत्यूमुखी पडला. सप्टेंबरमध्येच तालुक्‍यातील उजगाव सुतारवाडीत विहिरीत पडलेल्या बिबट्याला सुखरूप बाहेर काढून अधिवासात सोडण्यात आले. त्यापाठोपाठ ऑक्‍टोबरमध्ये ताम्हाने गायकरवाडीतील एका अरुंद विहिरीत पडलेल्या बिबट्याला २४ तासांनंतर सुखरूप बाहेर काढण्यात आले. 

बिबट्या सापडण्याबरोबरीनेच बिबट्यांकडून माणसांवर हल्ले होण्याचे प्रकारही सरत्या वर्षात वाढीस लागले आहेत. ऑक्‍टोबर महिन्यात तालुक्‍यातील काटवली येथे एका घरात घुसलेल्या बिबट्याने दोघांना जखमी केले. याच महिन्यात साखरपा येथे कुत्र्याच्या पाठलागावर आलेला बिबट्या घरात शिरला आणि दोघांना गंभीर जखमी करून पसार झाला. डिसेंबर महिन्यात घाटीवळे येथे बिबट्याने दुचाकीस्वारावर झडप घातली. चारच दिवसापूर्वी तांबेडी गवळवाडीत घरात घुसलेल्या बिबट्याने एका वृद्धाची शिकार करण्याचा प्रयत्न केला, मात्र यातून ते सहिसलामत बचावले असले तरी या घटनेत तो वृद्ध गंभीर जखमी झाला आहे. 

बिबटे सापडणे, माणसांवर हल्ले करणे याचबरोबर बिबट्यांचे वारंवार होणारे दर्शन हे सुद्धा चिंतेचे ठरले आहे. तालुक्‍यातील माभळे गावात दिवसाढवळ्या बिबट्या आणि डुक्‍करामध्ये रंगलेली झुंज त्यानंतर देवळेगावात डुकराला मारून बिबट्याने झाडावर टांगण्याची घटना. याचप्रमाणे मयूरबागमध्ये बिबट्याने अडवलेली रिक्षाचालकाची वाट, मुचरी येथे बिबट्याने अंगणातून पळवून नेलेल्या बकऱ्या, बुरंबी येथे दुचाकीस्वाराचा केलेला पाठलाग या घटनांनी बिबट्याच्या वास्तव्याच्या भयग्रस्त करणाऱ्या खुणा आहेत. 

Web Title: Ratnagiri News Leopard found in district this year