साखरपा-केतकर आळीत बिबट्याचा मुक्त संचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 ऑक्टोबर 2017

देवरूख - संगमेश्वर तालुक्‍यात एका पाठोपाठ एक बिबटे पकडले जात असताना बिबट्यांची दहशत कमी झालेली नाही. साखरपा-केतकर आळीत बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत आहेत. ​

देवरूख - संगमेश्वर तालुक्‍यात एका पाठोपाठ एक बिबटे पकडले जात असताना बिबट्यांची दहशत कमी झालेली नाही. साखरपा-केतकर आळीत बिबट्याच्या मुक्त संचाराने ग्रामस्थ भयभीत आहेत. येथे पाळीव जनावरांवर हल्ला करण्याचे प्रकार वाढू लागल्याने या बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी भाजप तालुका चिटणीस अमित केतकर यांनी केली आहे.

ऑगस्टमध्ये साखरपा-गुरववाडी येथे बिबट्या डुकराच्या फासकीत अडकला होता. त्याला फासकीतून मुक्त केले होते. त्यानंतर बिबट्याने कोंडगावातील एका घरात घुसत तिघांना गंभीर जखमी केले होते. हा बिबट्या अद्यापही मुक्तच असून सध्या तो कोंडगाव-केतकर आळीकडे वळला आहे. 

येथील धनंजय घाटे यांच्या महालक्ष्मी देवस्थान भागात गेले तीन दिवस बिबट्या फिरत असल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. या परिसरात ६० ते ७० ठिकाणी बिबट्याच्या पायाचे ठसे दिसत असून वन विभागाने खातरजमा करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. येथील ग्रामस्थ किरण सप्रे यांनीही बिबट्याला कुत्र्याची पिल्ले नेताना पाहिले आहे. हा बिबट्या दिवसाढवळ्या वस्तीतून फिरत असून, जीवितहानी होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे साखरपा-गुरववाडी येथे लावलेला पिंजरा कोंडगावात आणून लावावा, अशी मागणी होत आहे.

Web Title: ratnagiri news leopard seen in Sakharapa region