मांडवी जेटीला मोठे भगदाड 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

रत्नागिरी - शहराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या "गेट वे ऑफ रत्नागिरी'ची मांडवी जेटी धोक्‍यात आली आहे. अमावस्येच्या उधाणाला जेटीला मोठे भगदाड पडल्याने पर्यटकांना तेथे जाण्यास मेरीटाईम बोर्डाने बंदी घातली आहे. पर्यटक मात्र बंदी झुगारून तेथे समुद्राच्या लाटांमध्ये भिजण्याचा आनंद घेत आहेत. सुमारे साडेतीन कोटींची सुधारित, मजबूत आणि आकर्षक जेटी बांधण्याचा प्रस्ताव मंजूर आहे; परंतु पावसाळ्यानंतर काम होणार असल्याने नागरिकांनी उधाणाच्या दरम्यान जेटीवर जाऊ नये, असे आवाहन बोर्डाने केले आहे. 

शहरातील मांडवी जेटी ब्रिटिशकालीन आहे. तेव्हादेखील या जेटीवर मोठ्या प्रमाणात समुद्री व्यापार चालत होता. त्यामुळे ब्रिटिशांनी मांडवी भागात अनेक वस्तूंचा साठा करण्यासाठी गोदामे बांधली आहेत. आजही ती गोदामे सुस्थितीत आहेत. काही ठिकाणी शासकीय कार्यालयासाठी त्यांचा वापर केला जातो. काही रहिवासासाठी होत आहे. त्यामुळे आजही गेट वे ऑफ रत्नागिरीला महत्त्व आहे. रत्नागिरीची शान म्हणून या मांडवी जेटीकडे पाहिले जाते. शेकडो वर्षे समुद्राच्या लाटांचा मारा खाऊन आजही ती तग धरून आहे; मात्र आता ती जीर्ण झाली आहे. हळूहळू कोसळू लागली आहे. यापूर्वी पालिकेने त्याची दुरुस्ती आणि रोषणाई केली होती; मात्र ते काम देखील तकलादू ठरले. 

दरवर्षी जेटीचा काही भाग कोसळत आहे. गणेशोत्सव असो वा दहिकाला यावेळी मांडवी समुद्र किनारी मोठी गर्दी होते. लोक मोठ्या उत्साहाने या आल्हाददायक किनाऱ्यावर पर्यटन आणि मनोरंजनासाठी येतात. भविष्यात ते धोकादायक ठरणार आहे. यंदाच्या पावसामध्ये जेटी कधीही कोसळण्याची भीती आहे. समुद्राच्या उधाणामुळे आधीच तिला भगदाड पडले आहे. मेरीटाईम बोर्डाने याची पाहणी करून धोकादायक भागामध्ये सुरक्षेच्या दृष्टीने रिबीन बांधून ठेवली होती; परंतु ती तुटली. स्थानिक नागरिक, पर्यटक आजही या धोकादायक जेटीवर बिनधास्त लाटांचा आनंद घेण्यासाठी जातात. कोणतीही दुर्घटना घडू नये, यासाठी मेरीटाईम बोर्डाने एका कर्मचाऱ्याची नियुक्ती केली आहे; परंतु त्यालाही कोण जुमानत नाही. 

मांडवी जेटीच्या दुरुस्तीसाठी शासनाने साडेतीन कोटी रुपये मंजूर केले आहेत. पावसानंतर जेटीच्या नूतनीकरणाचे काम सुरू होईल. ते अतिशय दर्जेदार आणि आकर्षक असेल. ढाचा मात्र तसाच राहणार आहे. 
श्री. कनगुटकर, मेरीटाईम बोर्डाचे अधिकारी 

Web Title: ratnagiri news mandvi jeti