बाळ मानेंचा सेल्फी; बदलाची नांदी?

बाळ मानेंचा सेल्फी; बदलाची नांदी?

दापोली - भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने यांनी दापोलीचे माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्यासोबत काढलेला सेल्फी सोशल मीडियावर फिरत आहे. राजकीय वर्तुळात नवीन वर्षात कोणत्या घडामोडी घडणार याकडे राजकीय वर्तुळात यामुळे वेगवेगळे कयास सुरू झाले. 

शहरात एका कार्यक्रमात माने- दळवी आणि आमदार संजय कदम एकाच व्यासपीठावर आले होते. त्यावेळी हा सेल्फी माने यांनी काढला. मात्र सेल्फीतून कदम यांना वगळण्यात आले आहे, याला महत्त्व देण्यात आले आहे.

दापोली मतदारसंघात योगेश कदम यांच्या आगमनाने माजी आमदार दळवी यांच्या गटात पर्यावरण मंत्री रामदास कदम यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली जात असली तरी मातोश्रीकडून दापोली मतदारसंघाची सर्व सूत्रे कदम गटाकडे असल्याचे यापूर्वी झालेल्या नगरपंचायत आणि जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीवेळी स्पष्ट झाले आहे. जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत दळवी-कदम वादामुळे एकाच रात्री तब्बल दोन वेळा उमेदवारांची यादी बदलण्याची वेळ पक्ष नेतृत्वावर आली होती. यानंतर खेड येथे झालेल्या सभेत केंद्रीय अवजड उद्योग मंत्री अनंत गीते यांनी योगेश कदम यांच्या दापोली मतदारसंघातील उमेदवारीबाबत सूचक वक्तव्य करून चर्चेला बळ दिले. 

माजी आमदार सूर्यकांत दळवी यांच्या नाराजीला खरी सुरुवात गतवर्षी गणपती उत्सवादरम्यान तालुकाप्रमुख पदावर प्रदीप सुर्वे यांची निवड होणार हे निश्‍चित झाल्यानंतर झाली. या दरम्यान दळवी समर्थकांनी दाभोळ येथे मेळावा घेत या बदलाला विरोध दर्शवला होता. त्याची दखल पक्षप्रमुखांनी घेत अंतिम टप्यात आलेली निवड पुढे ढकलली; मात्र ही नाराजी औटघटकेची ठरली. यानंतर काही दिवसांतच प्रदीप सुर्वे यांची तालुकाप्रमुख म्हणून शिवसेनेकडून नियुक्ती करण्यात आली.

जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीत नाराज दळवी गटाने सेनेच्या अधिकृत उमेदवारांच्या विरोधात काम करून भाजप उमेदवारांना मदत केल्याचा आरोप योगेश कदम यांनी केला. मातोश्रीकडून कदम गटाला सर्व अधिकार दिल्याने दळवी यांची पाऊले भाजपकडे वळू लागल्याचे दापोलीतील राजकीय जाणकारांचे मत आहे.

नवरात्रोत्सवात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी स्वाभिमान पक्षाची स्थापना केल्यानंतर नाराज दळवी समर्थक या नवीन पक्षाची वाट धरतील, असा कयास होता, मात्र मुरब्बी दळवीनी वेट अँड वॉच ची भूमिका घेत राजकीय चाणाक्षपणा दाखवून दिला. 

भाजपचे जोरदार प्रयत्न
दापोली मतदार संघात नाराज दळवीना भाजपमध्ये खेचण्याचे प्रयत्न वरिष्ठ पातळीवरून सुरू झाले आहेत. योगेश कदम, पर्यायाने रामदास कदम यांना दापोली मतदारसंघात शह देण्यासाठी भाजप, राष्ट्रवादी आणि नाराज दळवी गटाने एकत्रित मोट बांधण्याचे संकेत दिले आहेत. पुढील निवडणुकीचे मैदान अद्याप दूर आहे. कदम यांच्या मतदारसंघावरील पकडीमुळे शत्रूचा शत्रू तो आपला मित्र या म्हणीप्रमाणे दापोलीचे राजकारण सुरू असल्याचे दिसून येत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com