होळीच्या सोंगातून समृद्ध खेड्यांचा संदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 मार्च 2018

मंडणगड - धुलिवंदनाच्या दिवशी रात्री ग्रामीण भागात गावात घरोघरी सोंग काढण्याची प्रथा जोपासली जाते. त्याबदल्यात मुलांना पैसे दिले जातात. तालुक्‍यातून विरार, नालासोपारा, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. शेती, स्वतःच घर सोडून गावाकडे पाठ फिरवली जात आहे.

मंडणगड - धुलिवंदनाच्या दिवशी रात्री ग्रामीण भागात गावात घरोघरी सोंग काढण्याची प्रथा जोपासली जाते. त्याबदल्यात मुलांना पैसे दिले जातात. तालुक्‍यातून विरार, नालासोपारा, मुंबईत मोठ्या प्रमाणात स्थलांतर होत आहे. शेती, स्वतःच घर सोडून गावाकडे पाठ फिरवली जात आहे. या परिस्थितीवर भाष्य करीत मुलांनी घरोघरी जाऊन मुलगा, सून, सासू अशी पात्र रंगवून गावाच्या समृद्धीवर भाष्य करीत खेड्याकडे वळण्याचा संदेश दिला.

तालुक्‍यात शुक्रवारी (ता. २) ग्रामदेवतेच्या साना भरण्यात आल्या. दिवसभर धार्मिक कार्यक्रम झाले. संध्याकाळी गावांत विविध वेशभूषा करून अनेक प्रकारची सोंग काढून मुलांनी गावकऱ्यांचे मनोरंजन केले. यामध्ये पालेकोंड येथील श्रेयस माळी, श्रद्धा जाधव, तृषा माळी यांनी घरोघरी जात सादर केलेले खेड्याकडे चला हे संवाद नाट्य सर्वार्थाने वेगळे ठरले. यात मुंबईत जाण्यासाठी सुनेने केलेला हट्ट, मुलाची अगतिकता आणि सासूचे अनुभवी बोल कलाकारांनी उत्तम साकारले.

मुलांमध्ये वैचारिक प्रगल्भता वाढत आहे. समृद्ध गाव यावर आधारित सादर केलेले सोंग आताच्या पिढीच्या डोळ्यांत अंजन घालणारे आहे. विविध समाजपूरक उपक्रम राबविणाऱ्या या मुलांचे कौतुक वाटते.
- भिकू माळी,

अध्यक्ष, पालेकोंड

आपले घर, शेती आणि भरघोस उत्पन्न देणारी आंबा काजूची झाडे अशीच वाऱ्यावर सोडून प्रदूषणाच्या विळख्यात सापडलेल्या मायानगरीत जीव धोक्‍यात घालवण्यासाठी जावू नका, जन्म भूमीलाच कर्म भूमी करून प्रगती साधा, चमकणाऱ्या मुंबईपेक्षा निसर्गच आपला मित्र असणाऱ्या आपल्या गावात सुखाने राहा, असे संदेश या नाट्यातून मुलांनी दिले. माणसाच्या आरोग्य, आर्थिक बाबींवर प्रकाशझोत टाकताना स्थलांतरामुळे समृद्ध गावे ओस पडत असल्याने हा वारसा टिकवून ठेवण्यासाठी तरुण वर्गाने पुढे येण्याचे आवाहन यावेळी केले.

Web Title: Ratnagiri News Message from the villages prosperity in Holi event