आमदारांचे रिपोर्ट कार्ड - रत्नागिरी जिल्हा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 31 ऑक्टोबर 2017

राज्यातील युती सरकारला मंगळवारी (ता. ३१) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचे दोन शिलेदार आहेत. सत्तारूढ भाजपला जिल्ह्यात चेहरा नाही. त्यामुळे सरकारच्या आणि आमदारांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा घेताना युतीतील ताणेबाणेही ओघानेच आले.

राज्यातील युती सरकारला मंगळवारी (ता. ३१) तीन वर्षे पूर्ण होत आहेत. जिल्ह्यातील सत्तारूढ पक्षाचे तीन आमदार, तर राष्ट्रवादीचे दोन शिलेदार आहेत. सत्तारूढ भाजपला जिल्ह्यात चेहरा नाही. त्यामुळे सरकारच्या आणि आमदारांच्या तीन वर्षांच्या कारकिर्दीचा लेखाजोखा घेताना युतीतील ताणेबाणेही ओघानेच आले. सरकारकडून निधी कमी मिळतो, ही ओरड आहेच. भास्कर जाधव यांनी तर सरकारचे वाभाडे काढायचे हीच आमची कामगिरी नोंदवा, असे सांगितले; तर संजय कदम यांनी भोंगळ कारभाराचा पंचनामा केला असे आवर्जून नोंदले. सर्व आमदारांनी पायाभूत सुविधांची कामे होण्यावर जोर दिला आहे. विधिमंडळातील हजेरीबाबत आणि तेथे प्रश्‍न मांडण्यात भास्कर जाधव, सदानंद चव्हाण आग्रही आहेत. कोकणातील व जिल्ह्यातील प्रश्‍नावर विधिमंडळात आवाज उठवण्यात आमदार सामंत आणि साळवी यांच्यात जणू चढाओढ असते. त्याचा जिल्ह्याला फायदाच मिळतो. शिवाय एकाच पक्षाचे असल्याने श्रेयाचा वाद नाही. तीन वर्षांत सर्वच आमदारांना कामगिरीबद्दल १० पैकी ६ ते ७ गुण देण्यात प्रत्यवाय नाही, असे तटस्थ मत आहे. यापैकी राजन साळवी यांची ताकद आणि वेळ सरकारविरोधी आंदोलनातच फुकट गेल्याबद्दल शिवसैनिकांनी खंत व्यक्त केली.

मतदारसंघ - रत्नागिरी

पाणी, रस्ते, पोलिसांना घरे यासाठी कोट्यवधीचा निधी - आमदार सामंत

रत्नागिरी - डिजिटल इंडियाच्या माध्यमातून ग्रामपंचायती थेट दिल्लीशी जोडण्याच्या महत्त्वाच्या कामाचा शुभारंभ करबुडेतून केला. मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेतून दरवर्षी सुमारे २० कोटींची रस्त्याची कामे केली. २९ कोटींच्या जयगड प्रादेशिक नळपाणी योजनेचे विस्तारीकरण, कुवारबाव, भाट्ये, साखरतर जलस्वराज्यचा पायलट प्रोजेक्‍ट हाती घेतला. पोलिसांना हक्काची घरे मिळण्यासाठीचा १०० कोटींचा प्रकल्प मंजूर केला. महिला रुग्णालयाच्या दुसऱ्या टप्प्यात १४ कोटी आणले, अशी प्रभावी आणि ठोस विकासकामे गेल्या ३ वर्षांत केल्याचा दावा रत्नागिरीचे आमदार उदय सामंत यांनी केला. 

सामंत म्हणाले की, तालुक्‍यात रस्ते पाखाडीसाठी सुमारे ५४ कोटी रुपयाचा निधी आणला. शासनाच्या अंदाज समितीचा अध्यक्ष असताना रत्नागिरीतील पोलिसांच्या हक्कांच्या घरांचे काम लवकरच सुरू होईल. कोकणातील पहिल्या महिला रुग्णालयाचे रखडलेले काम मार्गी लावताना १४ कोटीचा दुसरा टप्पा मंजूर करून आणला. परचुरी पुलाचे उद्‌घाटन केले. शहरासाठीची ५४ कोटीची योजना पाणी योजना मंजूर केली. 
शैक्षणिक क्षेत्रामध्ये व्हर्च्युअल क्‍लासेस सुरू केले. कौशल्य विकासाचे पहिले केंद्र पालीला सुरू झाले. येथील शासकीय तंत्रनिकेतनची मान्यता रद्द होण्याची शक्‍यता होती. तो निर्णय रद्द करायला लावला. भविष्यातील दोन वर्षांमध्ये रत्नागिरी शहरामध्ये भुयारी गटार योजना राबविणार आहोत. शहरालगतच्या ग्रामपंचायतींचाही पाणी प्रश्‍न कायमस्वरूपी सोडविण्यासाठी रत्नागिरीप्रमाणे सुमारे ६० कोटीची पाणी योजना राबविण्याचाही संकल्प आहे. विधिमंडळातील उपस्थितीबाबत उदय सामंत म्हणाले, मी शासनाच्या अंदाज समितीचा अध्यक्ष होतो. त्यामुळे अनेक वेळा मला अधिवेशनाच्या काळात दौऱ्यावर जावे लागत होते. त्यामुळे १०० टक्के हजेरी लाऊ शकलो नाही.

मतदारसंघ - राजापूर

राजापुरात रस्ते, पाणी, पुलांसाठी संघर्ष : साळवी

राजापूर - सलग दुसऱ्यांदा आमदार म्हणून निवडून आलेले राजन साळवी यांनी राजापूर विधानसभा मतदारसंघात पायाभूत सुविधा उपलब्ध करण्याला प्राधान्य दिले आहे. रस्ते, पाण्याच्या सुविधा उपलब्ध करताना पुलांसारखे काम उभारीत अनेक गावे एकमेकांना जोडली. याचबरोबर सरकारमध्ये असूनही राजापुरातील रिफायनरी तसेच अणुऊर्जा प्रकल्पाविरोधात लोकमत संघटित करीत संघर्ष करण्यातही त्यांचा बराच काळ गेला.

आमदार निधीसह शासनाच्या विविध योजनेतून कोट्यवधी निधी आणून त्यांनी मतदारसंघाचा विकास करण्याला प्राधान्य दिले आहे. मतदारसंघातील राजापूर, लांजा, साखरपा परिसरातील अनेक गावे एकमेकांना जोडणारे रस्ते केले. राजापूर तालुक्‍यातील अर्जुना नदीवरील गोठणे-दोनिवडे पूल, लांजा-राजापूर तालुक्‍यांना जोडणारा गोळवली पूल आदी पुलांचा समावेश आहे. अनेक गावांना उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न निर्माण होतो. शासनाच्या विविध योजनेतून निधी आणून त्यांनी हा प्रश्नही सोडविण्याला प्राधान्य दिले. रखडलेल्या धरणांचे प्रश्न विधानसभेत मांडताना त्यांनी धरणांची कामे पूर्ण कशी होतील याकडे विशेष लक्ष दिले आहे. राज्याचे बजेट, नाबार्ड आदीमधूनही कोट्यवधी रुपयांचा निधी आणून त्यांनी विकास केला आहे. सर्वसामान्यांना भेडसावणारी घरबांधणी परवानगी समस्या, ऑनलाईन सातबारामुले निर्माण झालेली समस्यांबाबत शासनदरबारी वारंवार प्रश्न उपस्थित करून त्यांनी सर्वसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडली आहे. 
जैतापूर अणुऊर्जा प्रकल्प, प्रस्तावित रिफायनरी प्रकल्प आदी प्रकल्पासंबंधित लोकांचे प्रश्न त्यांनी आंदोलनाच्या माध्यमातून वेळोवेळी मांडले आहेत. आमदार साळवी यांनी भविष्यामध्ये मतदारसंघाचा चेहरामोहरा बदलण्याचे निर्धार केला आहे. त्यासाठी प्रस्तावित असलेली विविध विकासकामे, प्रकल्प मार्गी लावण्यासाठी ते प्रयत्नशील आहेत.

मतदारसंघ - दापोली-मंडणगड

खराब रस्ते मार्गावर आणण्याचे काम प्राधान्याने - आमदार संजय कदम

खेड - गेल्या तीन वर्षात दापोली-मंडणगड विधानसभा मतदारसंघात खराब रस्ते सुस्थितीत आणण्याचे काम मी केले आहे. मतदारसंघाचा विकास हेच ध्येय ठेवून काम करत आहे, असे प्रतिपादन आमदार संजय कदम यांनी केले. गेल्या तीन वर्षांतील त्यांच्या कामकाजाबद्दल ते बोलत होते. अधिवेशनात हजेरी नव्वद टक्‍क्‍यांहून अधिक असल्याचे त्यांनी सांगितले.

कदम म्हणाले की, राज्य सरकारने नवीन कोणत्याही कामासाठी निधी उपलब्ध करून दिलेला नाही. आगामी नागपूरच्या अधिवेशनात जुन्या धरणांच्या कामासाठी अनुशेष देण्यात यावा, या मागणीसाठी विधानभवनाच्या पायरीवर बसून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आंदोलन करणार आहेत. १ हजार लोकसंख्येची मर्यादा घातल्याने पेयजल योजनेचे काम रखडले आहे. दिवाळीत नागरिकांना रेशन वर धान्य न देता सरकारने दिवाळीनंतर धान्य दिल्याने गोरगरिबांची दिवाळी अंधारातच गेली. शैक्षणिक क्षेत्रात कोंकण कृषी विद्यापीठातील कर्मचारी कित्येक वर्षे अस्थापनेवर नव्हते मी पुढाकार घेऊन या कर्मचाऱ्यांना कायम स्वरूपी आस्थापनेवर आणले. अनेकांची मागणी असूनही राज्य सरकारने कोणत्याही नविन महाविद्यालयाला परवानगी दिलेली नाही. नवीन शिक्षक भरती प्रक्रिया बंद आहे. मुंबई विद्यापीठाचा निकाल उशीरा लागल्याने सर्वच विद्यार्थ्यांना मनस्ताप सहन करावा लागला. याला शिक्षण मंत्री आणि सरकारच जबाबदार आहे. या आणि अशा सरकारी भोंगळ कारभाराचा पंचनामा वेळोवेळी केला.

आगामी दोन वर्षात मतदारसंघातील विकासकामे प्रामुख्याने रस्ते चांगले करणे, त्याचबरोबर राष्ट्रीय स्तरावरील हर्णै येथील जेटी उभारण्याचे काम लवकरात लवकर करण्यासाठी मी पुढाकार घेणार आहे. मंडणगड तालुक्‍यातील लोकांना महाड तालुक्‍यातील वीर येथील रेल्वे स्थानकावरून मुंबई किंवा अन्य ठिकाणी जावे लागते यांच्यासाठी मंडणगड वरून वेळापत्रकाप्रमाणे बस गाड्या सोडण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.

मतदारसंघ - चिपळूण

मतदारसंघात समस्या नाहीत हीच पावती : चव्हाण

चिपळूण - प्रामुख्याने गाव आणि वाडी-वस्तीत भौतिक सुविधा निर्माण केल्या. कोणतेही गाव, वाडी रस्ते आणि पाखाडीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घेतली. मतदारसंघातील रस्ते, सार्वजनिक वाहतुकीचे पूल, बोअरवेल, समाज मंदिर सभागृह, नळपाणी पुरवठा योजना मंजूर करून त्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न केले. संगमेश्‍वर तालुक्‍यातील पांगरी धारे खालचीवाडीत स्वातंत्र्यानंतरही रस्ते नव्हते. तेथे रस्ते केले. मुख्यमंत्री सडक योजनेतून खेर्डी टेरव रस्ता, पाली-निरबाडे रस्त्यासाठी कोट्यवधीचा निधी आणला. गणेशखिंड, भोम, गांग्रई मार्गासाठी सव्वादोन कोटीचा निधी मंजूर केला. जिल्हा मार्गासाठी कोट्यवधीचा निधी दिला. कोट्यवधीची कामे झाल्याने मतदारसंघात मोठ्या समस्या राहिलेल्या नाहीत, असा दावा आमदार चव्हाण यांनी केला.

जिल्हा परिषद शाळांच्या भौतिक सुविधा पूर्ण केल्या. डिजिटल वर्गासाठी संगणक, वर्गखोल्यांची दुरुस्ती, विविध शैक्षणिक साहित्य, शाळेस नवीन इमारती, शालेय परिसरात मुला-मुलींसाठी स्वतंत्र स्वच्छतागृहासाठी निधी दिला. आमदारकीच्या आगामी दोन वर्षांत बेरोजगार तरुणांच्या हाताला काम देणार. येथे पायाभूत सुविधा निर्माण झाल्यावर मोठे प्रकल्प आणणार. मात्र त्यातून पर्यावरणाला धोका असणार नाही.

गेल्या तीन वर्षांत मतदारसंघात १०० कोटींची विकासकामे मार्गी लावली. विकासकामांसाठी सुमारे  ७० कोटींचा निधी मंजूर. दहिवली बुद्रुक, मांडकी पुलासाठी १ कोटी ३० लाखाचा निधी मंजूर केल्याचा दावा त्यांनी केला. विधानसभेत ९९ टक्के उपस्थिती असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले. गेल्या तीन विधिमंडळात वर्षात सुमारे ४८० तारांकित प्रश्‍न मांडले.

मतदारसंघ - गुहागर

विधिमंडळात प्रथमच कोकणाबाबत घडवली चर्चा - भास्कर जाधव

गुहागर -  तीन वर्षात भाजप-सेना सरकारने कोकणाकरिता सांगता येईल असे विशेष काम केलेले नाही. रस्त्यांच्या दुरुस्तीसाठी निधी नसल्याने ग्रामीण भागातील रस्त्यांची दैन्यावस्था आहे. गावागावांत जाणारी एस.टी. बंद पडत आहे. जलयुक्त शिवार योजनेचा बोजवारा उडाला. सत्ताधारीच एकमेकांवर भ्रष्टाचाराचे आरोप करत आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील १२ पुलांचे भूमिपूजन झाले. एकही पूल पूर्ण नाही. चार ठिकाणी चौपदरीकरणाचे कार्यक्रम. अद्याप एक इंच काम पूर्ण नाही. नवीन नळपाणी योजना व लघुपाटबंधारे प्रकल्पांना निधी नाही.

करंबवणे (ता. चिपळूण) ते बहिरवली, ता. खेड यांना जोडणाऱ्या नवीन पुलासाठी ३९ कोटी रुपये मंजूर झाले आहेत. या व्यतिरिक्त जिल्ह्याचा विकास ठप्प आहे. हा आणि असा भोंगळ कारभार सातत्याने जनतेसमोर आणण्याचे काम आम्ही केले, अशा उपहासगर्भ पद्धतीने भास्कर जाधव यांनी टीका केली. आमचे रिपोर्ट कार्ड म्हणजे सरकारचे काढलेले वाभाडेच असणार, अशी मल्लिनाथीही त्यांनी केली. 

जिल्ह्यात नवीन शाळा, वर्गखोल्या, इमारत दुरुस्ती करीता सुमारे ६५ कोटी रुपयांची आवश्‍यकता आहे. तीन वर्षात १ रुपयाही दिला नाही. कपाऊंड वॉल, स्वच्छतागृह, पाणी, संगणक आदीसाठी सर्व शिक्षा अभियानातून कोकणाला मिळत नाही. त्यामुळे अनेक विद्यार्थी सहाण, मंदिर आदी ठिकाणी बसून शिक्षण घेत आहेत. शिक्षक कमी, भरती बंद, बदल्याचे सतत बदलते धोरण अशा अनंत अडचणी आहेत. दहावीच्या निकालात कोकण बोर्ड राज्यात प्रथम येते ही आनंदाची गोष्ट आहे.

पुढील दोन वर्षांत काय करणार सांगताना ते म्हणाले की, कोकणात सत्ताधारी शिवसेनचे वर्चस्व मात्र सत्तेच्या दोऱ्या व तिजोरीच्या चाव्या हाती असलेल्या भाजपला स्थान नाही. दोघांच्या लढाईत कोकणच्या विकासाचा 
बळी जात आहे. केंद्रीय मंत्री गीते, पालकमंत्री वायकर, पर्यावरण मंत्री कदम आणि जिल्हा परिषद सेनेची असूनही घटनेच्या चौकटीत राहून, नियमांचा अभ्यास करून, कायदेशीरबाबींची पूर्तता करून विकास कसा करावा, याची माहिती नाही. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत मी मांडत असलेल्या निषेधाच्या ठरावांना पालकमंत्र्यासह सर्वजण पाठिंबा देतात, अशी स्थिती आहे. त्यामुळे संसदीय आयुधे आणि अनुभवांची शिदोरी वापरुन संघर्ष करणार. वैयक्तिक संबंधांचा उपयोग करुन मतदारसंघाचा विकास करावा लागेल.

१९३७ नंतर प्रथमच कोकणसाठी स्वतंत्र पर्यटन मंडळावर सभागृहात मी स्वतंत्र चर्चा घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनीही याची दखल घेतली. आता त्यांच्या आश्वासनांची पूर्तता करण्याकरिता प्रत्येक अधिवेशनात पाठपुरावा करत आहे. मच्छीमारांना कर्जमाफी मिळावी, ४ टक्के व्याजदराने व्यवसायासाठी तसेच अन्य कर्ज उपलब्ध व्हावीत यासाठी मी सभागृहात लढतो आहे. आंबा बागायदारांना नुकसान भरपाई, मुंबई गोवा महामार्गाचे चौपदरीकरण, रत्नागिरी व सिंधुदुर्गमध्ये विमानतळ, शामराव पेजे महामंडळाला भरीव निधीची तरतूद, आंबा काजू बोर्डाची स्थापना, रस्ते व पाणी योजना,  जल वाहतूक हे विषय सभागृहात मांडले. गंजलेले पोल बदलण्याबरोबरच कोकणात भुमिगत वीजवाहिनीची व्यवस्था उभी करणे आवश्‍यक आहे. हा विषय मांडून माझ्या मतदारसंघातील एका गावात भूमिगत वीजवाहिन्यांना मंजूरी मिळविली आहे. 

Web Title: Ratnagiri News MLA Report Card