कोकण कृषी विद्यापीठातील शोकसभेत अनेकांना अश्रू अनावर 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 30 जुलै 2018

दाभोळ  - आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले. काहीजण तर बोलूही शकले नाहीत. विद्यापीठात आज सन्नाटा पसरला होता. विद्यापीठ परिवारातर्फे आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

दाभोळ  - आंबेनळी घाटात झालेल्या अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या सहकार्‍यांना श्रद्धांजली वाहताना अनेकांना अश्रू अनावर झाले. काहीजण तर बोलूही शकले नाहीत. विद्यापीठात आज सन्नाटा पसरला होता. विद्यापीठ परिवारातर्फे आज शोकसभा आयोजित करण्यात आली होती.

सभेत श्रद्धांजली वाहताना संजय केळकर म्हणाले की, आपल्या विद्यापीठातील 30 कर्मचार्‍यांचा झालेला मृत्यू हा विद्यापीठ इतिहासातील काळा दिवस म्हणावा लागेल. या कर्मचार्‍यांचा मृत्यू हा काळजाला चटका लावणारा आहे. ही जखम कधीही बुजणारी आहे. या सर्वांचे चेहरे आजही डोळ्यासमोर येतात. मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचार्‍याच्या कुटुंबीयांना परमेश्वर दु:ख सहन करण्याची शक्ती देओ अशी परमेश्‍वरचरणी प्रार्थना करतो.

विद्यापीठाच्या परिवारातील 30 सदस्यांचे निधन झाले. रविवारी संध्याकाळपर्यंत हर्णै, गिम्हवणे, दापोली, मंडणगड, तुळसणी (देवरुख), कासार्डे (सिंधुदुर्ग), वेंगुर्ले (सिंधुदुर्ग) येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. आज विद्यापीठ परिवारातर्फे सकाळी 11 वाजता शोकसभा झाली.

कुलगुरू डॉ. तपस भट्टाचार्य, डॉ. पराग हळदणकर, डॉ. सतीश नारखेडे, डॉ. संजय भावे, डॉ. केतन चौधरी, अनिल पवार उपस्थित होते. यावेळी आपल्या भावना व्यक्त करताना डॉ. सतीश नारखेडे यांना अश्रू अनावर झाले. ते पुढे बोलूच शकले नाहीत. कुलगुरू डॉ. भट्टाचार्य यांनी विद्यापीठ परिवारातर्फे श्रद्धांजली अर्पण केली. प्रभारी कुलसचिव डॉ. केतन चौधरी यांनी शोकसंदेश वाचून दाखविला. 

Web Title: Ratnagiri News Mournfulness in Konkan Agriculture University