कासव संवर्धनाची चळवळ रुजायला हवी - भाऊ काटदरे

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 30 मार्च 2018

दाभोळ - समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थनिकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सुटला, तर समुद्र कासवाच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन आपोआप होईल. आंजर्लेसारखी ही चळवळ कोकणातील प्रत्येक समुद्रकिनारी रुजणे आवश्‍यक आहे, असे मत सह्याद्री मित्रमंडळाचे भाऊ काटदरे यांनी व्यक्‍त केले.

दाभोळ - समुद्रकिनारी राहणाऱ्या स्थनिकांचा रोजीरोटीचा प्रश्‍न सुटला, तर समुद्र कासवाच्या प्रजातींचे संरक्षण व संवर्धन आपोआप होईल. आंजर्लेसारखी ही चळवळ कोकणातील प्रत्येक समुद्रकिनारी रुजणे आवश्‍यक आहे, असे मत सह्याद्री मित्रमंडळाचे भाऊ काटदरे यांनी व्यक्‍त केले.

वन विभागातर्फे वनदिनाचे औचित्य साधून आंजर्ले येथील माधवराव खांबेटे प्रशालेच्या सभागृहात ‘सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावर कार्यशाळा झाली. अनेक वर्षांपासून कासव समुद्रकिनारी अंडी घालून निघून जात असे. मात्र सकाळी समुद्रकिनाऱ्यावर येणाऱ्या गावकऱ्यांकडून ही अंडी काढून त्यांचा उपयोग खाण्यासाठी केला जात होता. सह्याद्री मित्रमंडळाने अनेक गावांत जाऊन प्रबोधन केल्यावर हा प्रकार बंद झाला. समुद्री कासवांचे संरक्षण व संवर्धन प्रकल्पास गती मिळाली. 

कासव संवर्धन प्रकल्पांमुळे आणि कासव महोत्सवामुळे त्या गावांचा विकास झाला. गावात या निमित्ताने अनेक पर्यटक येऊ लागल्याने रोजगार मिळू लागला. त्यामुळे व्यावसायिकांचेही पाठबळ मोहिमेला मिळाल्याचे काटदरे यानी सांगितले.

आंजर्लेचे सरपंच संदेश देवकर म्हणाले की, ‘‘आम्ही ग्रामपंचायतीतर्फे आंजर्ले समुद्रकिनारी सॅंड बाईकसाठी परवानगी दिलेली नाही. कारण आम्हाला त्यापेक्षा कासवे महत्त्वाची आहेत. कासव महोत्सवामुळेच गाव प्रसिद्ध झाले असून गावातील व्यावसायिकांना रोजगार मिळाला आहे. आंजर्ले येथील किनारी सॅंड बाईकऐवजी साध्या सायकली उपलब्ध करून दिल्या तर हा व्यवसायही चांगला चालेल. त्यानिमित्ताने शहरात कायम गाडीने फिरणारे पर्यटक समुद्रकिनारी सायकलिंगचा आनंद घेतील.’’

सकाळी लवकर आणि संध्याकाळी दिवस मावळल्यावर ही पिले समुद्रात सोडली जातात. यासाठी फार कमी वेळ लागतो. उर्वरित वेळात पर्यटकांना आंजर्ले गावातील जुनी घरे, सुपारी, नारळाच्या बागा किंवा आंजर्ले येथे झालेल्या चित्रपटाच्या चित्रीकरणाचे पॉइंट, बॅकवॉटरची सफर आदी कार्यक्रम दिले तर पर्यटक दिवसभर गावात राहतील व त्याचा फायदाही व्यावसायिकांना होईल, अशी सूचनाही एका पर्यटकाने केली. 

पर्यटकांच्या सर्व सूचनांवर आंजर्ले ग्रामपंचायत, निर्मल सागरतट अभियान, आंजर्ले व कासव मित्रमंडळ, आंजर्ले यांची संयुक्‍त बैठक घेऊन चर्चा करून अंमलबजावणी करण्यात येईल, अशी माहिती देवकर यांनी दिली. 

याप्रसंगी चिपळूण वन विभागाने तयार केलेल्या ‘सागरी कासवांचे संरक्षण व संवर्धन’ या विषयावरील घडीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.

योगेश कदम यांची भेट
आंजर्ले (ता. दापोली) येथे सुरू असलेल्या कासव संवर्धन महोत्सवाला शिवसेना युवा नेते योगेश कदम यांनी भेट दिली. सागरी पर्यावरण संरक्षणासाठी महत्त्व असलेल्या या उपक्रमासाठी लागेल ती मदत करण्याची ग्वाही त्यांनी कासव संवर्धन मोहिमेतील कार्यकर्त्यांना दिली. या वेळी माजी समाजकल्याण सभापती भगवान घाडगे, जिल्हा परिषद सदस्य रेश्‍मा झगडे, राजेंद्र फणसे, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रोहिणी दळवी, सुनील दळवी, प्रकाश कालेकर, स्नेहल जंगम उपस्थित होते.

Web Title: Ratnagiri News Movement of turtle conservation