चौपदरीकरण भरपाईपैकी 425 कोटींचे वाटप 

राजेश कळंबटे
शुक्रवार, 23 जून 2017

रत्नागिरी - मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाला आवश्‍यक भूसंपादनासाठी रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्याला प्राप्त 1900 कोटी रुपये निधीपैकी सव्वाचारशे कोटीचे वाटप आतापर्यंत झाले आहे. त्यात राजापूर, कुडाळमध्ये अद्याप वाटपाची सुरवातही झालेली नाही. मोबदला वाटप करताना न्यायालयीन प्रकरणे, मालकांमधील वाद, बॅंकांकडून शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग करण्यातील दिरंगाई अशा अडचणींचा सामना प्रशासनाला करावा लागत आहे. त्यामुळे पावसाळ्याच्या तीन महिन्यांत मोबदला वाटप करण्याचे आव्हान जिल्हा प्रशासनासमोर आहे. 

चौपदरीकरणाचे काम वेगाने करण्यासाठी शासनाकडून पावले उचलली जात आहेत. त्यासाठी जागतिक दर्जाच्या आयआरपी कंपनीच्या पंक्तीत बसणाऱ्या "एमईपी' आणि चेतक ऍण्ड इगल इन्फ्रास्ट्रक्‍चर या कंपनींना हे काम दिले आहे. रत्नागिरीतील परशुराम घाट ते आरवली टप्प्यासह सिंधुदुर्गमधील चार टप्प्यांमधील 154 किलोमीटर रस्त्याच्या चौपदरीकरणाचे भूमिपूजन कुडाळला उद्या (ता. 23) होत आहे. दोन हजार 444 कोटींचे हे काम आहे. मोबदल्यासाठी शासनाने पहिल्या टप्प्यात 1900 कोटी रुपये दिले आहेत. त्यातील अवघ्या 425 कोटींचेच वाटप करता आले. संगमेश्‍वर तालुक्‍यातील 7 हजार 600 पैकी 3 हजार 767 शेतकऱ्यांना मोबदला वाटप केला. 

मंत्रालयात 8 मार्चला झालेल्या बैठकीत मेअखेरपर्यंत मोबदला वाटप पूर्ण करण्याचे आदेश रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्हाधिकाऱ्यांना दिले होते. 80 टक्‍के मोबदला वाटप झालेल्या भागातील भूसंपादन करून काम तत्काळ सुरू केले जाईल. गणेशोत्सवानंतर चौपदरीकरणाला सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मोबदला वाटपाची आकडेवारी लक्षात घेता, प्रत्यक्ष कामाला चार महिन्यांत सुरवात होणे कठीण आहे. आतापर्यंत 25 टक्‍केच मोबदला वाटप झाले. राजापूर तालुक्‍यात उशिरा निधी मिळाला. बायपासचा निर्णय प्रलंबित ठेवल्याने हा गोंधळ झाला होता. कुडाळसाठी 219 कोटी रुपये मिळाले आहेत.

Web Title: ratnagiri news Mumbai-Goa highway