मंडणगड तालुक्यात प्रवासी वाहतूक व्यावसायिकाचा खून 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 1 नोव्हेंबर 2017

मंडणगड - तालुक्‍यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (वय 45) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी धारधार शस्त्राने खून केला. मंगळवारी (ता. 31) सकाळी 9.30 ते सायकांळी 6.15 वाजण्याच्या सुमारास हा खून झाला आहे

मंडणगड - तालुक्‍यातील वेरळ येथील वडाप व्यावसायिक राजाराम बाळकृष्ण चव्हाण (वय 45) यांचा तीन अज्ञात दुचाकीस्वारांनी धारधार शस्त्राने खून केला. मंगळवारी (ता. 31) दिवसा हा खून झाला आहे. यासंदर्भात मृत चव्हाण यांच्या पत्नी दीपेश्री राजाराम चव्हाण (वय 43) यांनी मंडणगड पोलिस ठाण्यात आज पहाटे पाचच्या सुमारास  तक्रार दाखल केली. 

प्रथमदर्शनी हा खून चोरीच्या उद्देशाने केला असल्याचे भासविले असले, तरी खून नेमका कोणत्या कारणासांठी केला याचा तपास मंडणगड पोलिस करीत आहेत. पोलिस ठाण्यातून गुन्ह्यासंदर्भात मिळालेल्या माहितीनुसार राजाराम चव्हाण यांचा प्रवासी वाहतूक करण्याचा व्यवसाय होता. तोंडली ते दापोली या मार्गावर तो अवैध अर्थात वडापचा व्यवसाय करीत असे. 31 ऑक्‍टोबरला सकाळी अज्ञात व्यक्तीने त्यांना फोन करून प्रवाशांना सोडण्यासाठी बोलावून घेतले होते. चव्हाण वेळेवर येणार नाहीत म्हणून अज्ञात दुचाकीस्वार घरी आले व त्यांना भाड्यासाठी सोबत घेऊन गेले.

भाड्यासाठी गेल्यानंतर उशिरापर्यंत ते घरी परत आले नाहीत. त्यामुळे घरच्यांनी त्यांचा शोध घेतला. उन्हवरे ते तोंडली मार्गावर पुलाजवळ त्यांची गाडी आढळून आली. यावेळी त्यांचा शोध घेत असताना या पुलाच्या मोरीच्या आत खाली त्यांचा मृतदेह आढळला. तीक्ष्ण हत्याराने त्यांच्या शरीरावर अनेक ठिकाणी जबर वार केले होते. घटनास्थळी त्यांची गाडी मिळाली. मात्र, अज्ञातांनी चव्हाण यांचे दोन मोबाईल व सोन्याची साखळी असा 48 हजार रुपये किमतीचा ऐवज लांबविला. खुनाचे कारण शोधण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे. उपविभागीय पोलिस अधिकारी शीतल जानवे यांनी आपल्या पथकासह आज मंडणगड येथे घटनास्थळी भेट दिली. अधिक तपास पोलिस निरीक्षक अनिल गंभीर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. मृताच्या फोन कॉलच्या नोंदी बघून तपास सुरू आहे. चव्हाण यांच्या मृतदेहाचे विच्छेदन दापोली येथील ग्रामीण रुग्णालयात करण्यात आले. मंडणगड पोलिस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. 

Web Title: Ratnagiri News Murder in Veral