नाणारच्या वोट बँकेवर राजकीय पक्षांचा डोळा

राजेश शेळके
सोमवार, 16 एप्रिल 2018

रत्नागिरी - नाणारवासीयांच्या भेटीसाठी विविध पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत. भाजप वगळता इतर बहुतेक पक्षाच्या नेत्यांचे दौरे निश्‍चित झाल्याने नेत्यांची जणू रिघच लागणार असल्याचे चित्र आहे.

रत्नागिरी - नाणारवासीयांच्या भेटीसाठी विविध पक्षाचे नेते पुढे सरसावले आहेत. भाजप वगळता इतर बहुतेक पक्षाच्या नेत्यांचे दौरे निश्‍चित झाल्याने नेत्यांची जणू रिघच लागणार असल्याचे चित्र आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आणि शिष्टमंडळ, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे दौरे निश्‍चित आहेत. मनसेचे राज ठाकरे यांचा दौरा होणार असाही आवाज देण्यात आला आहे. आगामी लोकसभा, विधानसभा निवडणुकीची सार्‍या पक्षांची ही बेगमीची तयारी केली जात आहे. 

देशातील सर्वांत मोठी ग्रीन रिफायनरी नाणार (ता. राजापूर) येथे प्रस्तावित करण्यात आली आहे.  स्थानिकांच्या भूमिकेला आमचा पाठिंबा राहिल, असे शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले. स्थानिकांच्या अनेक आंदोलना मध्ये सेना सहभागी झाली. आता शिवसेनेला स्वतःच्या भूमिकेपासून युु टर्न घेणे शक्य नाही. हा विषय प्रतिष्ठेचा बनला आहे. त्यामुळेच भाजपने सौदी अरेबिया येथील कंपनीशी केलेल्या कराराबाबत शिवसेनेला साधी कुणकुणही लागू दिली नाही. भाजपने सेनेला डिवचल्याने सेना आक्रमक बनली आहे. नाणार प्रकल्प जाणार, असे सेना नेते म्हणत आहेत. त्या पार्श्‍वभूमीवर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे सोमवारी (ता. 23) नाणार प्रकल्प स्थळाला भेट देणार आहेत. शिवसेना सचिव विनायक राऊत यांनी याला दुजोरा दिला. स्थानिक आमदार राजन साळवी आणि रत्नागिरीचे आमदार उदय सामत यांनी जागेची पाहणी करून गर्दी जमविण्याच्या दृष्टीने आराखडा तयार केला जात आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यात ग्रामस्थ, सरपंच, शेतकरी, मच्छीमार प्रतिनिधी आणि प्रकल्पविरोधी संघर्ष समिती आदींशी संवाद साधणार आहेत. स्थानिकांच्या भूमिकेबरोबर राहण्याचा शब्द दिल्याने प्रकल्पाविरोधातील सेनेची भूमिका आणखी कडक होण्याची शक्यता आहे.  

उद्धव ठाकरे यांच्या दौर्‍यापूर्वीच काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण व त्यांचे शिष्टमंडळ नाणार प्रकल्प भेटीसाठी 18,19 एप्रिलला दौर्‍यावर आहेत. त्यामध्ये खासदार हुसेन दलवाई, आमदार भाई जगताप, अन्य मंडळी प्रकल्पग्रस्त जनतेच्या भेटीसाठी येणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार 10 मे रोजी नाणार प्रकल्पस्थळी जाऊन स्थानिकांचे म्हणणे ऐकूण घेणार आहेत. त्यानंतर ते पक्षाची प्रकल्पाबाबतची भूमिका स्पष्ट करणार आहेत. 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे 1 मे पासून महाराष्ट्राच्या दौर्‍यावर आहेत. नाणार होऊ नाही देणार, अशी भूमिका नुकतीच एका जाहीर सभेत त्यांनी मांडली. त्यामुळे ते देखील स्थानिकांचे मत ऐकून घेण्यासाठी नाणार दौर्‍यावर येण्याची शक्यता आहे. मात्र त्यांची तारीख अजून निश्‍चित झालेली नाही. संघर्ष समितीच्या प्रतिनिधींची राज ठाकरे यांनी भेट घेतली असून एकत्र येऊन आंदोलन करण्याची शक्यता आहे. राजकीय पक्षांच्या भूमिकेवरच तेथील वोट बँक तयार होणार असल्याने नाणार प्रकल्पाच्या भेटीसाठी वेगवेगळ्या पक्षांच्या नेते मंडळींची रिघ लागणार आहे. 

Web Title: Ratnagiri News Nanar Project and Politics special