नाट्य स्पर्धेत पुलंची नाटके व्हावीत - आर्ट सर्कल

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 जून 2018

रत्नागिरी - महाराष्ट्राचे लाडके व हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व पु. ल. देशपांडे यांचे यंदा जन्मशताब्दी वर्ष आहे. या निमित्त राज्य नाट्य स्पर्धेच्या रत्नागिरी केंद्रावर हौशी संस्थांनी पुलंची नाटके सादर करून आगळी आदरांजली वाहावी, असे आवाहन येथील आर्ट सर्कल संस्थेने केले आहे. संस्थेतर्फे सांस्कृतिक संचालनालय मंत्री विनोद तावडे यांनाही निवेदन पाठवण्यात येणार आहे.

पुलं हे रत्नागिरीचे जावयबापू. त्यांनी रत्नांग्रिचा अंतू बर्वा ‘फेमस’ केला. कोकणातील माणसं नाटकवेडी आहेत. त्यामुळे इथल्या हौशी संस्थांनीही राज्य नाट्य स्पर्धेत पुलंची नाटकं केल्यास पुलंना अनोखी आदरांजली वाहिली जाईल. रत्नागिरी केंद्रात रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सुमारे १५ ते २० संस्था सादरीकरण करतात. या सर्वांना पत्र पाठवले आहे. तसेच पुलंचे एखादे नाटक घेऊन त्याचे वर्षभर प्रयोग करावेत, अशी कल्पना मांडली आहे. या उपक्रमाचे नाट्यसंस्थांनी स्वागतही केले आहे.

राज्य नाट्य स्पर्धेमध्ये नवी संहिता असल्यास जादा गुण दिले जातात.त्याप्रमाणे यंदा पुलंचे नाटक केल्यास जादा गुण द्यावेत,अशी विनंती सांस्कृतिक संचालनालयाकडे करण्यात येणार आहे. आर्ट सर्कल गेली दहा वर्षे पुलोत्सव करत आहे. संगीत, नृत्य, नाट्य अशा विविध कलाप्रकारांना सामावणारा हा महोत्सव आहे. शताब्दीनिमित्त विशेष कार्यक्रम करण्यावर संस्थेचा भर राहणार आहे.

वाऱ्यावरची वरात, तुझं आहे तुझपाशी, अमलदार, सुंदर मी होणार, तीन पैशाचा तमाशा, ती फुलराणी अशी पुलंची अनेक नाटके गाजली. काही अनुवादित नाटके आहेत. काही नव्या रूपात रंगमंचावर आली. ही नाटके आजच्या जमान्याशी जोडून रंगमंचावर साकारणे हे दिग्दर्शक, कलाकारांना आव्हानात्मक आहे.’’
- अनिल दांडेकर,
लेखक/दिग्दर्शक

Web Title: Ratnagiri News need of Pu La Deshpandes drama in competition