ऑलिव्ह रिडले संवर्धन मोहीम दाभोळ समुद्रकिनारी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 मार्च 2018

दाभोळ - ऑलिव्ह रिडले या समुद्र कासव प्रजातीमधील कासवांच्या ३६ पिलांनी ५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एकाचवेळी समुद्राच्या पाण्यात धाव घेत आपल्या नव्या आयुष्याला सुरवात केली. ५ मार्चला सकाळी सातच्या सुमारास या पिलांनी दाभोळ सुरुबनातून आपल्या समुद्रप्रवासास सुरवात केली. 

दाभोळ - ऑलिव्ह रिडले या समुद्र कासव प्रजातीमधील कासवांच्या ३६ पिलांनी ५५ दिवसांच्या प्रतीक्षेनंतर एकाचवेळी समुद्राच्या पाण्यात धाव घेत आपल्या नव्या आयुष्याला सुरवात केली. ५ मार्चला सकाळी सातच्या सुमारास या पिलांनी दाभोळ सुरुबनातून आपल्या समुद्रप्रवासास सुरवात केली. 

दापोली परिक्षेत्र वनाधिकारी, वन परिमंडळ अधिकारी, वनरक्षक आदींच्या मार्गदर्शनाखाली कासवमित्र दत्ताराम वानरकर यांनी ही मोहीम दाभोळ समुद्रकिनारी राबविली. दाभोळ समुद्रकिनारी कासविणींनी अंडी घातल्यावर ही अंडी सुरक्षित राहण्यासाठी वाळूत खड्डा खणून त्यात ही अंडी ठेवण्यात आली होती व या खड्ड्यांच्या सभोवती कुंपणही घालण्यात आले होते. 

कासवमित्र  दत्ताराम वानरकर हे सुरूच्या बनात दैनंदिन देखरेखही ठेवत होते. अंडी घालून ५५ दिवस झाल्यावर या अंड्यांमधून कासवाची पिल्ले बाहेर आल्यावर ती एका टोपलीत ठेवण्यात आली. या पिल्लांना समुद्रात सोडण्यात आले. यावेळी दाभोळमधील कासवप्रेमी तसेच दापोलीच्या वन विभागाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

प्रथमच दहा कासवांनी घातली अंडी 

दापोली तालुक्‍यातील आंजर्ले येथे २१ मार्च ते १५ एप्रिलदरम्यान कासव महोत्सव निर्मल सागर तट अभियान ग्रामपंचायत आंजर्ले, महाराष्ट्र शासनाचा वन विभाग, सह्याद्री निसर्गमित्र, कासव मित्रमंडळ आंजर्ले यांच्या संयुक्‍त विद्यमाने आयोजित करण्यात आला आहे.

  •  २१ मार्च ते १५ एप्रिल दरम्यान कासव महोत्सव 
  •  पर्यटकांना डॉल्फिन सफर
  •  प्रथमच बॅंक वॉटर पर्यटन 
  •  सहलीसाठी ऑनलाईन बुकिंग सुरू

ऑलिव्ह रिडले या समुद्र कासव प्रजातीचा विणीचा हंगाम नुकताच संपला असून, यंदा आंजर्ले येथे दहा वर्षांच्या इतिहासात प्रथमच सर्वाधिक दहा कासवांनी समुद्रकिनारी अंडी घातली. या अंड्यांना कोल्हे, कुत्रे, रानडुक्‍कर यांच्यापासून धोका संभवतो. त्यासाठी आंजर्ले येथे सदर अंड्यांसाठी संरक्षित घरटी करण्यात आली.

सर्वसाधारण ५० ते ५५ दिवसांच्या दरम्यान घरट्यातून पिल्ले बाहेर पडण्यास सुरवात होते. यावर्षी सुमारे १ हजार १०० अंडी संरक्षित करण्यात आली. त्यातून बाहेर येणाऱ्या कासवांच्या पिल्लांना नैसर्गिक पद्धतीने समुद्रात सोडले जाते. हा सोहळा पाहण्यासाठी हजारो पर्यटक आंजर्ले येथे दरवर्षी येत असतात. त्यांना यावर्षी मोठया प्रमाणात ही संधी उपलब्ध होणार आहे.

यावर्षी कासव महोत्सवाबरोबरच येणाऱ्या पर्यटकांना डॉल्फिन सफर, सुवर्णदुर्ग सफर माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे आंजर्ले खाडीत प्रथमच बॅक वॉटर पर्यटनाचा अनुभवही माफक दरात उपलब्ध करून दिला जाणार आहे. 
या कासव महोत्सवासाठी महानगरांमधून आताच या सहलीसाठी ऑनलाइन बुकिंग सुरू करण्यात आले आहे. महोत्सवासाठी मोठ्या संख्येने पर्यटक आंजर्लेत दाखल होणार आहेत. त्यामुळे आंजर्ले परिसरातील पर्यटन व्यवसायाला बहर येणार आहे.
 

Web Title: Ratnagiri News Olive Riddle Conservation campaign Dabhol beach