रत्नागिरीतील गावखडीमध्येही कासवांच्या संवर्धनाचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

पावस - वनविभाग व कासवमित्रांच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पिल्ले सुखरूप ठेवण्यात कासवमित्रांचे योगदान मोलाचे ठरले.

पावस - वनविभाग व कासवमित्रांच्या सहकार्याने रत्नागिरी तालुक्‍यातील गावखडी समुद्रकिनाऱ्यावर ऑलिव्ह रिडले जातीच्या कासवांच्या ४५ पिल्लांना समुद्रात सोडण्यात यश आले आहे. सलग दुसऱ्या वर्षी पिल्ले सुखरूप ठेवण्यात कासवमित्रांचे योगदान मोलाचे ठरले.

समुद्रकिनारी नोव्हेंबर ते फेब्रुवारी अनेक कासवे रात्रीच्या वेळी अंधारात अंडी घालण्यासाठी येतात. कासवमित्र व वनखात्याच्या माध्यमातून रात्रीच्या वेळी गस्ती घालून, कासवाने घातलेली अंडी संरक्षित करण्याचे काम सुरू झाले. ही अंडी पुढील ५० दिवस समुद्रकिनारी नेटने बांधलेल्या जाळीमध्ये खड्डा काढून ठेवल्यानंतर जन्माला येणाऱ्या कासवांच्या पिल्लांना समुद्रात सोडून देण्यात येते.

विभागीय वन अधिकारी विकास जगताप, वनविभाग रत्नागिरी येथील कर्मचारी, या परिसरातील प्रसिद्ध प्राणीमित्र प्रदीप डिंगणकर, राकेश पाटील तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे रत्नागिरीतील निसर्गयात्री सुधीर रिसबुड यांच्या मार्गदर्शनाखाली कासवाच्या पिल्लांना बुधवारी (ता. १४) सकाळी गावखडी समुद्रकिनाऱ्यावर सोडण्यात आले.

मादी कासव समुद्रकिनाऱ्यावर येऊन, अंडी घालून ती वाळूने झाकून निघून जाते. त्यानंतर मादीच्या खुणांवरून अंड्यांचा शोध घेतला जातो. ही अंडी समुद्रकिनारी तयार केलेल्या उबवणीगृहात ठेवली जातात. साधारण ५० ते ५५ दिवसांनी ही पिल्ले अंड्यातून बाहेर येतात. त्यांना समुद्रकिनारी २० ते २५ फुटांवर सोडण्यात येते. त्यानंतर ही पिल्ले पाण्यात झेपावतात. दरम्यान, मच्छीमारी, समुद्री जीव, अन्य श्वापदे या सगळ्यातून कासव जगण्याचे प्रमाण अत्यल्प आहे. त्यासाठी त्यांचे संवर्धन आवश्‍यक असल्याचे विभागीय वन अधिकारी विकास जगताप यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News olive ridley sea turtle conservation