जैतापूर प्रकल्पाचा विरोध परदेशात पोचविण्याचा निर्धार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 11 मार्च 2018

राजापूर - फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर मिठगवाणे-चिरेखाण येथे झालेल्या निषेध सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही नाटे येथे प्रकल्पग्रस्तांनी सभा घेऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला.

राजापूर - फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रोन यांच्या भारत भेटीच्या पार्श्‍वभूमीवर मिठगवाणे-चिरेखाण येथे झालेल्या निषेध सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारल्यानंतरही नाटे येथे प्रकल्पग्रस्तांनी सभा घेऊन जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पाला विरोध दर्शविला.

मॅक्रोनच्या भारत भेटीदरम्यान जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी करार होण्याची शक्‍यता गृहीत धरून प्रकल्पाचा विरोध केवळ जैतापूरपुरता सीमित न ठेवता त्याची व्याप्ती भविष्यामध्ये परदेशापर्यंत करण्याचा निर्धार प्रकल्पग्रस्तांनी केला. प्रकल्पविरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली, मात्र जैतापूर प्रकल्पाविरोधातील आंदोलनात आघाडीवर असलेल्या शिवसेनेचा एकही नेता अथवा लोकप्रतिनिधी सभेला उपस्थित नव्हता.

फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन कालपासून भारत दौऱ्यावर असून या दौऱ्यामध्ये जैतापूर अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी करार होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. त्याच्या निषेधासह प्रकल्पाला असलेला विरोध साऱ्यांना दाखवून देण्यासाठी  प्रकल्पविरोधी जनहक्क समितीच्या नेतृत्वाखाली मिठगवाणे-चिरेखाण येथे निषेध सभा घेतली. या सभेला जिल्हा प्रशासनाने परवानगी नाकारली असूनही जनहक्क समितीने नाटे येथे सभा घेतली. 

ज्या तंत्रज्ञानावर आधारित जैतापूर प्रकल्पाची उभारणी केली जाणार आहे, त्या तंत्रज्ञानाच्या आधारित जगात कुठेही अणुऊर्जा प्रकल्पाची उभारणी होऊन अणुभट्ट्या कार्यान्वित नाहीत. जैतापूर प्रकल्पाचा सर्वंकष तांत्रिक अहवाल अद्यापही तयार नाही, भांडवली खर्च, विजेची किंमत, अणू अपघात दायित्व कायद्याचे पालन आदी मुद्दे अद्यापही अंधारात असूनही शासन जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीसाठी आग्रही का, असा सवाल उपस्थित करण्यात आला.

जैतापूर प्रकल्पाच्या उभारणीला ठाम विरोध असून भविष्यात प्रकल्पविरोधाची व्याप्ती परदेशापर्यंत करण्याचा निर्धार करण्यात आला. सभेत अनेक वक्‍त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष मॅक्रोन यांच्या भारत दौऱ्यामध्ये अणुऊर्जा प्रकल्पासंबंधी होणाऱ्या संभाव्य करारांचा निषेध केला.   

सभेला जनहक्क समितीचे अध्यक्ष श्री. चव्हाण, मच्छीमार नेते अमजद बोरकर, नौशाद धालवेलकर, वजूद बेबजी, तौकीर सोलकर, मलिक गडकरी, मन्सूर सोलकर आदींसह मच्छीमार बांधव, प्रकल्पग्रस्त उपस्थित होते.

योग्यवेळी समाचार
जैतापूर प्रकल्पाविरोधीतील आंदोलनात प्रकल्पग्रस्तांच्या जोडीने शिवसेना आघाडीवर होती. प्रकल्पविरोधी आंदोलनाला शिवसेनेने पाठिंबा दिला होता. मात्र, आज झालेल्या निषेध सभेला शिवसेनेच्या नेत्यांची गैरहजेरी खटकणारी होती. सेनेच्या या गैरहजेरीची चर्चा सुरू आहे. शिवसेनेच्या या कृतीवर काही वक्‍त्यांनी बोलताना तीव्र नाराजी व्यक्त केली. प्रकल्पविरोधकांना वाऱ्यावर सोडू पाहणाऱ्यांचा योग्यवेळी समाचार घेतला जाईल, असा गर्भित इशाराही दिला.

Web Title: Ratnagiri News oppose to Jaitapur Project