रिफायनरी विरोधात मुंबईत रेटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 ऑक्टोबर 2017

राजापूर -  तालुक्‍यातील प्रस्तावित नाणार ग्रीन रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा रण पेटले आहे. नाणार व आजूबाजूच्या गाव परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिक जनतेचा विरोध आहे. विरोधकांमध्येही दोन मतप्रवाह आहेत. 

राजापूर -  तालुक्‍यातील प्रस्तावित नाणार ग्रीन रिफायनरीविरोधात पुन्हा एकदा रण पेटले आहे. नाणार व आजूबाजूच्या गाव परिसरात ग्रीन रिफायनरी प्रकल्प प्रस्तावित आहे. त्याला स्थानिक जनतेचा विरोध आहे. विरोधकांमध्येही दोन मतप्रवाह आहेत. 

शासन मात्र हा प्रकल्प होण्यासाठी प्रयत्नशील आहे. या परिस्थितीत चाकरमान्यांनी प्रकल्पाविरोधाला आता मुंबईतून रेटा दिला आहे.
स्थानिक जनतेचा रिफायनरीला असलेला विरोध तीव्र करण्यासाठी रविवारी (ता.२२) ग्रामीण भागातील स्थानिक तसेच मुंबईस्थित कोकणवासीयांची दिवाळी मेळावा आयोजित करण्यात आला.

हा मेळावा कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीतर्फे मुंबई-परेल येथील दामोदर हॉल येथे पार पडला. यात एकमुखाने तीव्र विरोध दर्शविण्यात आला. त्यामुळे पुन्हा एकदा नाणार येथील ग्रीन रिफायनरीचा वाद पेटण्याची चिन्हे आहेत.

कोकण रिफायनरीविरोधी संघर्ष समितीने काही दिवसांपूर्वीच राज्य व केंद्रात सत्तेत सहभागी असलेल्या शिवसेनेला म्हणजेच शिवसेना पक्षप्रमुख उद्‌धव ठाकरे यांना निवेदन देऊन हा प्रकल्प रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानंतर काही दिवसांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या समितीच्यावतीने एक निवेदन देण्यात आले. या निवेदनात हा प्रकल्प रद्द करण्यात यावा, तसेच घोषित झालेले औद्योगिक क्षेत्र रद्द करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र, शासनाकडून याबाबत अद्याप कोणतेही उत्तर आलेले नाही.

मेळाव्याच्या सुरुवातीला जैतापूरविरोधी जनहक्क समितीचे अध्यक्ष सत्यजित चव्हाण यांनी रिफाईनरी संदर्भात झालेल्या घटना व आंदोलन यांचा आढावा घेतला. सचिन चव्हाण आणि डॉ. मंगेश सावंत यांनी रिफाईनरीचे स्वरूप व गंभीर परिणामांवर प्रेझेन्टेशन केले. सर्वहारा आंदोलन व दिल्ली-मुंबई इंडस्ट्रीयल कॉरिडॉरविरोधी लढणाऱ्या उल्का महाजन यांनी प्रकल्पग्रस्तांनी विरोधावर ठाम राहण्याचे आवाहन केले. शासनाचा संपूर्ण कोकणपट्टी उद्‌ध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडण्यासाठी एकजुटीने लढा, असेही त्यांनी सांगितले. गिरीश राऊत यांनी वातावरण बदलामुळे पृथ्वीवरील येणाऱ्या संकटाचे विवेचन केले.

संघटनेचे अध्यक्ष अशोक वालम यांनी सरकार व शिवसेनेला इशारा देत, प्राण जाईपर्यंत लढा देणार असल्याचे या वेळी ठणकावून सांगितले. तशी सर्व उपस्थितांकडून शपथही घेतली. या मेळाव्याला कोकणवासीयांची चांगली उपस्थिती होती.

Web Title: Ratnagiri News Opposition against refinery in Mumbai