जखमींवर पोलिस करणार प्रथमोपचार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 11 सप्टेंबर 2017

महामार्ग किंवा अन्य ठिकाणी अपघात झाल्यास प्रथम पोलिसच घटनास्थळी पोचून मदतकार्य करतात; परंतु आता पोलिसांवर आणखी एक जबाबदारी आली आहे. जखमींना मदत करण्याबरोबर त्यांच्यावर प्रथमोपचारही पोलिसांना करावा लागणार आहे.

रत्नागिरी - महामार्ग किंवा अन्य ठिकाणी अपघात झाल्यास प्रथम पोलिसच घटनास्थळी पोचून मदतकार्य करतात; परंतु आता पोलिसांवर आणखी एक जबाबदारी आली आहे. जखमींना मदत करण्याबरोबर त्यांच्यावर प्रथमोपचारही पोलिसांना करावा लागणार आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडून जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ४० अत्याधुनिक फोल्डिंगची स्ट्रेचर्स आणि २५ प्रथमोपचार पेटी देण्यात आल्या आहेत. आपत्ती व्यवस्थापनातून सुमारे सव्वादोन लाख रुपये खर्च करून ही सुविधा पुरविली आहे. प्रभारी पोलिस अधिकारी आणि उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या गाड्यांमध्ये ही सोय असणार आहे.

जिल्हा प्रशासनाकडून नुकतेच हे साहित्य जिल्हा पोलिस दलाकडे वर्ग करण्यात आले आहे. अपघात झाल्यानंतर घटनास्थळावरील व्यक्ती सर्वप्रथम जवळच्या पोलिस ठाण्याशी संपर्क साधतात. त्यामुळे अनेक वेळा पोलिस घटनास्थळी पोचतात; परंतु त्यांच्याकडे कोणतीही उपकरणे किंवा साधणे नसल्याने त्यांनाही रुग्णवाहिकेची वाट पाहावी लागते. त्यानंतर अपघातातील जखमींना रुग्णालयात हलवून त्यांच्यावर उपचार सुरू होतो. उशिरा उपचार मिळाल्याने अनेक जखमींचा मृत्यू झाल्याच्या घटना कमी नाहीत. भविष्यात हे टाळण्यासाठी आपत्ती व्यवस्थापनाकडून पोलिसांना या सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. रस्ता सुरक्षा बैठकीत यावर अनेक वेळा चर्चा झाली होती; मात्र आता त्यावर निर्णय घेऊन साहित्यही पुरविण्यात आले आहे. 

जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना ४० फोल्डिंगचे स्ट्रेचर्स, २५ प्रथमोपचार पेट्या देण्यात आल्या आहेत. सर्व पोलिस ठाण्याच्या प्रभारी अधिकाऱ्यांच्या गाडीत स्ट्रेचर, प्रथमोपचार पेटी असणार आहे. उपविभागीय अधिकाऱ्यांच्या गाडीतही ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. अपघातस्थळी पोचल्यानंतर तत्काळ जखमींवर उपचार करता येणार आहे किंवा स्ट्रेचरच्या माध्यमातून योग्य ठिकाणी पोचविण्यास मदत होणार आहे. 

प्रशिक्षण कधी देणार...
जिल्ह्यातील सर्व पोलिस ठाण्यांना स्ट्रेचर आणि प्रथमोपचार पेटी हे साहित्य देण्यात आले आहे. या साहित्यांच्या आधारावर जखमींवर उपचार करणे सोपे होणार आहेत; परंतु पोलिस कर्मचाऱ्यांना प्रथमोपचाराचे प्रशिक्षण अद्याप देण्यात आलेले नाही. प्रथमोपचार पेटी उपलब्ध असली तरीही उपचार कसे करायचे? याचे प्रशिक्षण मिळवणे आवश्‍यक आहे.

Web Title: Ratnagiri news police do first aid on injure