दक्षिण रत्नागिरी भक्कम करण्यावर शिवसेनेचा भर 

संदेश सप्रे
शुक्रवार, 20 जुलै 2018

देवरूख - जिल्हा परिषदेची सभापती निवड आणि त्यानंतर झालेला संघटनात्मक फेरबदल पाहता शिवसेनेने आपले लक्ष दक्षिण रत्नागिरीवरच केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भक्‍कम करण्यात रत्नागिरी-रायगड मतदारसंघाकडे सेनेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

देवरूख - जिल्हा परिषदेची सभापती निवड आणि त्यानंतर झालेला संघटनात्मक फेरबदल पाहता शिवसेनेने आपले लक्ष दक्षिण रत्नागिरीवरच केंद्रित केल्याचे स्पष्ट झाले. रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघ भक्‍कम करण्यात रत्नागिरी-रायगड मतदारसंघाकडे सेनेचे दुर्लक्ष झाल्याचे दिसते. 

जिल्ह्यातील पाचपैकी तीन आमदार शिवसेनेचे आहेत. हे सर्व आमदार दक्षिण रत्नागिरीत आहेत. उत्तरेतील दोन्ही आमदार राष्ट्रवादीचे असून हे मतदारसंघ सेना परत मिळवील अशी आजची स्थिती नाही. त्यामुळे असलेला किल्ला आणखी मजबूत करण्याकडे सेनेने लक्ष दिले आहे. 2009 ला गेलेला लोकसभा मतदारसंघ सेनेने 2014 ला परत मिळवला. आता 2019 साठी याच मतदारसंघावर सेनेचा जोर आहे.

नुकतीच जिल्हा परिषद अध्यक्षांसह विषय समिती सभापतींची निवड झाली. यात राजापूर, रत्नागिरी आणि चिपळूणला विधानसभा मतदारसंघांना झुकते माप मिळाले. गेल्याच आठवड्यात दक्षिण रत्नागिरी जिल्हाप्रमुख बदलण्यात आले.

सलग 11 वर्षे कमान सांभाळणाऱ्या राजेंद्र महाडिकांऐवजी विलास चाळकेंची वर्णी लागली. चाळकेंचा मतदारसंघही राजापूरमध्ये आहे. दक्षिण रत्नागिरीतले तीनही विधानसभा आणि त्या अखत्यारितील लोकसभा मतदारसंघ भक्‍कम करण्यावर पदाधिकारी निवडीत भर देण्यात आला. 2014 ला असलेली मोदी लाट ओसरली. भाजपचा नारा स्वबळाचा आहे. स्वाभिमानच्या रूपाने सिंधुदुर्गात राणेंसारखा कडवा विरोधक समोर आहे. राजकीय अस्तित्व टिकवणे सेनेसाठी महत्त्वाचे आहे. यामुळे सेनेने ही रणनीती आखल्याची चर्चा आहे. 

साठमारीत पडून राहायला नको 

रत्नागिरी-सिंधुदुर्गला भक्‍कम करताना विद्यमान केंद्रीय मंत्री अनंत गीते यांच्या रत्नागिरी-रायगड मतदारसंघाकडे सेनेने लक्ष दिलेले नाही. उत्तर रत्नागिरीत संघटनेंतर्गत धुसफूस आहे. राजकीय साठमारीत पडून राहण्यापेक्षा असलेली जागा टिकवणे हीच सेनेची नीती यातून दिसते. 

Web Title: Ratnagiri News political Newsletter