खैराचे झाड लाखाचे, जमा १३ हजार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 26 एप्रिल 2018

चिपळूण - कळंबस्ते येथील पशुसंवर्धन कार्यालय आवारातील झालेल्या खैरतोड प्रकरणी वन विभागाने गुन्हा दाखल केला आहे. संबंधितांना नोटिसा देत डॉ. निमुणकर यांच्यासह  कर्मचाऱ्यांचे जबाब घेण्यास सुरुवात केली आहे. खैरतोड प्रकरणात वरिष्ठ अधिकारी कारवाईस टाळाटाळ करीत असल्याचे मत नोंदून सभापती पूजा निकम यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले की, १३ हजार २०० रुपये जमा करून घेतले, पण तोडलेल्या खैराची किंमत लाखाच्या घरात आहे.

शहरालगतच्या कळबंस्ते पशुसंवर्धन कार्यालयाच्या आवारातील शासकीय खैराची झाडे धोकादायक दाखवून ती सफाईच्या नावाखाली तोडण्यात आली. या प्रकरणी पशुसंवर्धनचे डॉ. संतोष निमुणकर यांच्या विरोधात पंचायत समिती सभेत जोरदार चर्चा झाली होती. चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा ठराव झाला होता. मात्र, अद्यापही चौकशीच्या फेऱ्या सुरू आहेत.

पंचायत समिती सदस्य राकेश शिंदे यांनी खैरतोड प्रकरणी वन विभागाकडे तक्रार केली होती. कोणतीही निविदा प्रक्रिया न राबवता व झाडांचे मूल्यांकन न करता ती तोडण्यात आली. डॉ. निमुणकर यांच्याविरोधी शिंदे यांनी रीतसर तक्रार दिली होती. याची दखल घेत वन विभागाने खैराची विनापरवाना वाहतूक केल्यप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. खैराची बेकायदा तोड, विक्रीबाबत पशुसंवर्धन, पंचायत समितीला फौजदारी 
दाखल करण्याचे अधिकार आहेत.

खैरतोड प्रकरणात वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून केवळ दोघांचे जबाब बाकी आहेत. येत्या चार-पाच दिवसांत संबंधितांवर कारवाई होणार असल्याचे परिक्षेत्र वनअधिकारी सचिन निलख यांनी सांगितले. खैरतोड प्रकरणात डॉ. निमुणकर यांनी संबंधितांकडून १३ हजार २०० रुपये जमा करून घेतले. 

याबाबत सभापती निकम म्हणाल्या, तोडलेल्या खैराची किंमत लाखाच्या घरात आहे. पैसे भरण्यासाठी कोणी मूल्यांकन केलेले नाही, तसे आदेशही देण्यात आलेले नाही. जिल्हा पशुसंवर्धन अधिकाऱ्यांना घटनास्थळाची पाहणी केली, झाडांची तोड झाली असताना त्यांनी कारवाई केलेली नाही. पारदर्शक चौकशी करण्याची सूचना प्रशासनाला केली होती. 

वरिष्ठ अधिकारी खैरतोड प्रकरणात चालढकल करीत असल्याचे निदर्शनास येत आहे. चौकशी अहवालात गौडबंगाल झाल्यास पंचायत समितीचे सर्व सदस्य अधिक आक्रमक होतील. अधिकाऱ्यांनी त्वरित कारवाई करावी, अशी त्यांनी मागणी केली.

Web Title: Ratnagiri News Puja Nikam comment