घन घन माला नभी दाटल्या कोसळती धारा ! 

संदेश सप्रे
रविवार, 10 जून 2018

संगमेश्वर - सोसाट्याचा वाऱ्यासह आज संगमेश्वर तालुक्यात माॅन्सूनचे दमदार आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून संगमेश्वर देवरुख मार्गावर कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होवून मंदगतीने सुरु आहे.

संगमेश्वर - सोसाट्याचा वाऱ्यासह आज संगमेश्वर तालुक्यात माॅन्सूनचे दमदार आगमन झाले. शनिवारी सायंकाळपासून सलग सुरु असणाऱ्या पावसामुळे सखल भागात पाणी साचले असून संगमेश्वर देवरुख मार्गावर कोसुंब येथे रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतूक विस्कळीत होवून मंदगतीने सुरु आहे.

जवळपास सहा तास सलग झालेल्या पर्जन्यवृष्टीने सर्वत्र पाणीच पाणी झाले. यामुळे टंचाईग्रस्त भागासह शेतकरी आणि तालुकावासियांनी समाधान व्यक्त केले. शेतात सर्वत्र पाणी साठल्याने शेतकऱ्यांना शेतीची कामे करणे अशक्य झाले होते परिणामी शेतकरी वर्गाने आज आराम करणेच पसंत केले. 

शनिवारी रात्रीच्या सुमारास संगमेश्वर तालुक्याच्या साखरपा, देवरुख, संगमेश्वर, आरवली, कडवई, माखजन, करजुवे, कसबा, फणसवणे, नायरी, वाशी, पाचांबे, धामणी, तुरळ आदी गावातून प्रथम सोसाट्याचा वारा आला नंतर आभाळ भरुन येत पावसाने जोरदार वृष्टी सुरु केली. जवळपास सलग सहा तास कोसळलेल्या पावसाने शेतांसह सर्वत्र पाणीच पाणी झाले. रोहिणी नक्षत्राच्या मुहूर्तावर धुळ पेरणी केलेले शेतकरी गेले आठ दहा दिवस पावसाच्या दमदार आगमनाकडे नजर ठेवून होते, अखेर आज शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला. तालुक्यात सर्वत्र पावसाचे आगमन झाल्याने पाणी टंचाईची समस्या आता सुटली आहे. 

आजच्या पावसाने मजुरीसाठी परप्रातांतून आलेल्या कामगारांच्या झोपड्यातून पाणी गेल्याने त्यांची संसाराचे सामान सुरक्षितस्थळी हलवताना चांगलीच तारांबळ उडाली. गेले आठ महिने कोरडे पडलेले वहाळ आणि ओढे आजच्या पावसाने वाहू लागले आहेत. माॅन्सूनच्या दमदार हजेरीने शेतकरीवर्ग शेतीच्या नियोजनात मग्न झाला आहे.

Web Title: Ratnagiri News Rains in Sangmeshwar Taluka