लॅंडमाफियांना ‘स्वाभिमानी’ हिसका दाखवू - आचरेकर

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 13 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - नाणार (राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्पासाठी जागा खरेदी करणाऱ्या लॅंडमाफियांनी रत्नागिरी शहरात डेरा टाकला आहे. त्यांना येथे ‘स्वाभिमानी’ हिसका दाखवू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर यांनी दिला आहे. रिफायनरीत स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.

रत्नागिरी - नाणार (राजापूर) येथील रिफायनरी प्रकल्पासाठी जागा खरेदी करणाऱ्या लॅंडमाफियांनी रत्नागिरी शहरात डेरा टाकला आहे. त्यांना येथे ‘स्वाभिमानी’ हिसका दाखवू, असा इशारा महाराष्ट्र स्वाभिमानचे तालुकाध्यक्ष सचिन आचरेकर यांनी दिला आहे. रिफायनरीत स्थानिक शेतकऱ्यांची फसवणूक आम्ही होऊ देणार नाही, असे त्यांनी या वेळी सांगितले.

रिफायनरी प्रकल्पाला स्वाभिमानने विरोध करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे. या परिसरातील जमीन खरेदी-विक्री बंद करण्यात आली असली तरीही काही दलालांकडून जमीन खरेदीसाठी वेगळाच फंडा अवलंबला आहे. याबाबत पक्षाची भूमिका श्री. आचरेकर यांनी मांडली. या वेळी रत्नागिरी शहराध्यक्ष अशोक वाडेकर, श्री. नंदू आदी उपस्थित होते.

श्री. आचरेकर म्हणाले की, नाणार येथील अनेक माफियांनी रत्नागिरीकडे मोर्चा वळविला आहे. याठिकाणी येऊन जमिनीचे व्यवहार केले जात आहेत. सुरुवातीला शासकीय विश्रामगृहातही त्यांच्या चर्चा झडत होत्या. याचा सुगावा बाहेरच्या लोकांना लागल्यामुळे त्यांनी मोर्चा अन्यत्र वळविला आहे.

प्रकल्पाजवळील जागा अल्प दरात घेऊन ती कंपनीला विकण्याचा घाट घातला जात आहे. यामागे पुढाऱ्यांचा हात असून त्यांनी एका सहाशे एकर जमिनीच्या व्यवहारासंदर्भात चर्चा केल्याचे पुढे आले आहे. या व्यवहारात शेतकऱ्यांचे नुकसान होत असून ते आम्ही होऊ देणार नाही.

रत्नागिरीत व्यवहार झाले, तरीही त्यांची नोंद राजापुरात होते. तेथील व्यवहार बंद आहेत; मात्र त्यासाठी दलालांनी वेगळाच फंडा हाती घेतला आहे. जमीन मालकांशी चर्चा करून व्यवहार ठरविला जातो. जमिनीची विक्री झाल्यानंतर ठरलेली रक्‍कम देण्याचा वायदा संबंधितांकडून घेतला जातो. प्रत्यक्षात व्यवहार झाल्यानंतर मध्यस्थ दोन्हीकडून दलालीची रक्‍कम वसूल करणार आहेत. याचे कनेक्‍शन कोल्हापूरशीही जोडल्याचा दावा श्री. आचरेकर यांनी केला आहे.

माफिया कोण कोण आहेत, याचा शोध घेत आहोत. ते सापडले की त्यांची नावे आम्ही जाहीर करू असेही सांगितले. जमिनी दलालांना देऊ नका याचा प्रसार करण्यासाठी जिल्हाध्यक्ष रवींद्र नागरेकर यांच्या मार्गदर्शनाखाली राजापुरात मोहीम सुरू केली जाणार आहे.
 

Web Title: Ratnagiri News Sachin Acharekar comment