सागरमाला ठरू शकेल विकासमाला

संदेश सप्रे
शुक्रवार, 22 डिसेंबर 2017

देवरूख - केंद्र सरकारच्या बहुचर्चित सागरमाला योजनेत कोकणचा समावेश करून कोकणातील जलवाहतुकीला सुगीचे दिवस आणण्याचा सुरू झालेला प्रयत्न कोकणातील बंदरे आणि व्यापारासाठी ऊर्जितावस्था देणारा ठरणार आहे. सागरमालाचे उद्दिष्ट पूर्ण झाले तर ती कोकणसाठी विकासमाला ठरू शकते.

देवरूख - केंद्र सरकारच्या बहुचर्चित सागरमाला योजनेत कोकणचा समावेश करून कोकणातील जलवाहतुकीला सुगीचे दिवस आणण्याचा सुरू झालेला प्रयत्न कोकणातील बंदरे आणि व्यापारासाठी ऊर्जितावस्था देणारा ठरणार आहे. सागरमालाचे उद्दिष्ट पूर्ण झाले तर ती कोकणसाठी विकासमाला ठरू शकते.

देशाच्या पूर्व आणि पश्‍चिम किनाऱ्यावरील सर्व बंदरे जोडून समुद्रमार्गे होणारी वाहतूक आणि व्यापाराला तसेच जलमार्गांना ऊर्जितावस्था आणण्यासाठी तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी सरकारने सागरमाला प्रकल्पाचा निर्णय घेतला होता. काही कारणास्तव रखडलेला हा प्रकल्प पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुन्हा सुरू केला. त्यासाठी केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरींचा पुढाकार आहे. २५ मार्च २०१५ ला विद्यमान केंद्रीय मंत्रिमंडळाने प्रमुख १२ बंदरे व १२०८ बेटे विकसित करण्यासाठी सागरमाला योजनेला मंजुरी दिली. १४ हजार ५०० किमी लांबीच्या समुद्र किनारपट्टीचा वापर यासाठी होणार आहे.

नव्या योजनेतून सध्या अस्तित्वात असलेल्या बंदरांचे आधुनिकीकरण, जागतिक दर्जाच्या नवीन बंदरांची निर्मिती, रस्ता आणि रेल्वेद्वारे बंदर जोडणी, आंतरदेशीय जलमार्ग विकास करण्यात येणार आहे. गडकरी यांच्याकडे नदीविकास खात्याचा अतिरिक्‍त कार्यभार आल्यानंतर त्यांनी या योजनेत कोकणचा समावेश केला. यातून सिंधुदुर्गसह रत्नागिरी आणि
रायगडमधील किनारपट्टीला तसेच खाडीविभागातील बंदरांना सुगीचे दिवस येण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे.

रस्त्याच्या तुलनेत वाहतूक खर्च जलमार्गामुळे कित्येकपटीने कमी होणार आहे. केंद्र सरकारच्या योजनेत जलमार्गातून मालवाहतुकीमुळे वर्षाला किमान ४४ हजार कोटी रुपयांची बचत होणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. यामुळेच मोठ्या बंदरांच्या विकासाबरोबरच खाडीभागातील बंदरे विकसित करून येथे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतुकूली नवे साधन निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू करण्यात आला आहे. बंदर विकास विभागातर्फे संपूर्ण कोकणात सध्या खाडीभाग आणि किनारी बंदरांची पाहणी सुरू आहे.

जयगड-डिंगणी रेल्वेमार्गही फायद्याचाच
बंदरे, रस्ते तसेच रेल्वेमार्गाला जोडण्याची कामे सुरू आहेत. कोकणात बंदर विकासाच्या आधीच जयगड-डिंगणी या बहुचर्चित रेल्वेमार्गाचे काम सुरू करण्यात आले. हा प्रकल्पही सागरमालाचाच एक भाग आहे. परिणामी मोठे उद्दिष्ट डोळ्यांसमोर ठेवत सुरू केलेले प्रकल्प कोकणी किनारपट्टीसाठी भाग्यरेखा ठरण्याची चिन्हे आहेत.

Web Title: Ratnagiri News Sagarmala for develoment