चिपळुणात एकाकी वृद्धांसाठी ‘सांजसोबती’ची सोब

मुझफ्फर खान
गुरुवार, 8 मार्च 2018

चिपळूण - आयुष्याच्या संध्याकाळी माणसे दुबळी आणि हळवी झालेली असतात. उतारवयात वृद्धांना सुश्रूषा आणि सोबतीचीही गरज असते. अशा समस्याग्रस्त वृद्धांना आर्थिक आणि भावनिक आधार देण्याचे काम चिपळुणात ‘सांजसोबती’ आणि निराधार फौंडेशन यांनी सुरू केले आहे. मात्र हे काम अधिक व्यापक झाले पाहिजे.

चिपळूण - आयुष्याच्या संध्याकाळी माणसे दुबळी आणि हळवी झालेली असतात. उतारवयात वृद्धांना सुश्रूषा आणि सोबतीचीही गरज असते. अशा समस्याग्रस्त वृद्धांना आर्थिक आणि भावनिक आधार देण्याचे काम चिपळुणात ‘सांजसोबती’ आणि निराधार फौंडेशन यांनी सुरू केले आहे. मात्र हे काम अधिक व्यापक झाले पाहिजे.

चिपळूणचे तत्कालीन पोलिस निरीक्षक प्रमोद मकेश्‍वर, वैद्यकीय अधिकारी डॉ. ज्योती यादव, नाझीम अफवारे, अमोल यादव, राजेश जाधव, इम्रान खतीब यांच्या संकल्पनेतून निराधार फौंडेशनची स्थापना झाली. या संस्थेकडून तालुक्‍यातील १०० वयोवृद्ध लोकांना दर महिना पुरेल एवढे अन्नधान्य घरपोच केले जाते. त्याशिवाय वर्षातून दोनवेळा आरोग्य शिबिरे घेतली जातात. कोणतेही सरकारी अनुदान न घेता गेली चार वर्ष हा उपक्रम सुरू आहे. 

आर्थिक सुबत्तेने एकाकीपण अधिक
‘सांजसोबती’च्या कार्यकर्त्या अपर्णा बेलोसे यांनी सांगितले की, त्यांच्या संस्थेचे काम अधिकतर ग्रामीण भागात चालते. चिपळुणात शहरी भागात सुमारे चारशेहून अधिक वृद्ध दाम्पत्य असतील, त्यांना भावनिक आधाराची गरज आहे. त्यांच्या आर्थिक गरजा अगदी कमी आहेत. माझे तर निरीक्षण असे आहे की, आर्थिक सुबत्ता असल्यामुळेच एकाकीपण अधिक आहे. ग्रामीण भागात यापेक्षा वेगळे चित्र दिसते. तेथे अजूनही माणसे एकमेकाला वेळ देतात. त्यामुळे भावबंध अधिक घट्ट आहेत. सामान्य वागण्यात मला काय त्याचे, अशी वृत्ती नसते.

चिपळुणातील ९० हून अधिक दानशूर लोकांनी एकत्र येऊन वयोवृद्धांना मदत करण्यासाठी सहा महिन्यांपूर्वी सांजसोबती संस्था सुरू केली. संस्थेचे पदाधिकारी दर महिन्याला बॅंकेच्या खात्यात वर्गणी जमा करतात. महिन्याला किती पैसे जमले याचा हिशोब बैठकीत दिला जातो. एखाद्या वयोवृद्ध दांपत्याला मदतीची गरज आहे, अशी माहिती मिळाल्यानंतर दांपत्याची माहिती घेतात. त्याची माहिती बैठकीत दिल्यावर संबंधितांना संस्थेचे स्वयंसेवक आणि पदाधिकारी महिन्याला पुरेल इतका किराणा माल घरपोच करतात. ४८ वृद्ध दांपत्यांना अशी मदत सुरू आहे.

‘‘उतारवयात माणसांना आपुलकी, माया आणि सुश्रूषेची गरज असते. मात्र सध्या धावपळीच्या युगात मुले आपल्या पालकांना हवा तेवढा वेळ देऊ शकत नाहीत. तसेच त्यांची देखभालही करता येत नाही. केवळ समाजाला नाही तर रक्ताच्या नात्यांनाही नकोशा झालेल्यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी वृद्ध सेवा केंद्र स्थापन करण्याची गरज आहे.’’
- राजेश जाधव,
निराधार फौंडेशन- चिपळूण

‘‘उतारवयात अनेकांची स्मृतिभ्रंश होऊन ते निराधारपणे भटकत असतात. अशा वृद्ध स्त्री-पुरुषांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाते. त्यांच्या नातेवाइकांचा शोध लागेपर्यंत त्यांचा सांभाळ कुणी करायचा, असा प्रश्‍न असतो. कोणाचे नातेवाईक नाहीच सापडले तर त्यांची शेवटपर्यंत सेवा करण्याची जबाबदारी कुणी घेत नाही. रस्त्यांवर बेवारस अवस्थेत आढळणाऱ्या मृतदेहांवर अंत्यसंस्कार सुद्धा पोलिसांनाच करावे लागतात. त्यासाठी ट्रस्ट स्थापन करण्यासाठी कुणीतरी पुढाकार घेण्याची गरज आहे. 
- सचिन शेळके,
पोलिस उपनिरीक्षक- चिपळूण
 

Web Title: Ratnagiri News Sanj Sobati for old agea alone citizens