प्लास्टिकमुक्तीसाठी सावर्डे-भुवडवाडी शाळेचा उपक्रम

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 3 जानेवारी 2018

सावर्डे - चार भिंतीच्या आत ज्ञानाजर्नाचे धडे गिरवता गिरवता सामाजिकतेचे भान ठेवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सावर्डे-भुवडवाडी शाळेच्या मुलांनी ३१०० कागदी पिशव्या बनवून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. 

सावर्डे - चार भिंतीच्या आत ज्ञानाजर्नाचे धडे गिरवता गिरवता सामाजिकतेचे भान ठेवून जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळा सावर्डे-भुवडवाडी शाळेच्या मुलांनी ३१०० कागदी पिशव्या बनवून प्लास्टिकमुक्तीचा संदेश दिला. 

सावर्डे-भुवडवाडी या पहिली ते चौथीमध्ये शिकणाऱ्या २८ विद्यार्थ्यांनी शाळेचे मुख्याध्यापक अमरदीप कदम आणि सहाय्यक शिक्षिका पल्लवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या सहा महिन्यांत फावेल त्यावेळी टाकाऊतून टिकाऊ ही संकल्पना राबवून रद्दीतून कागदी पिशव्या तयार करण्याची संकल्पना सुचली. शिक्षिका पाटील यांनी विद्यार्थ्यांना पिशव्या बनविण्याचे प्रशिक्षण दिले. विद्यार्थी सरावाने कागदी पिशव्या सहज बनवू लागले. तयार पिशव्या त्यांनी बाजरपेठेतील औषधांची दुकाने, किराणमाल दुकाने, वडापाव दुकाने, हॉटेल येथे जाऊन मोफत दिल्या. काही व्यावसायिकांनी शाळेच्या शिक्षिकांकडे आम्हाला पिशव्या विकत द्या असे सांगितले. 

शाळेचा उपक्रम स्तुत्य
सावर्डे-भुवडवाडी या छोट्या शाळेने प्लास्टिक निर्मूलनासाठी कागदी पिशव्या बनवून बाजारपेठेत मोफत वाटप करण्याचा उपक्रम दिशादर्शक ठरू शकतो. स्वावलंबनातून शिक्षणाचे महत्त्व समजू शकेल, असे गटशिक्षणाधिकारी सूर्यकांत पाटील यांनी सांगितले.  

विद्यार्थ्यांनी रिकाम्या वेळेत अशा पिशव्या बनविल्यास त्यांना शैक्षणिक खर्चासाठी स्वतःच्या कमाईतील पैसे खर्च करण्याचा आनंद मिळू शकत असल्याचे पाटील यांनी सांगितले. सावर्डे बाजरपेठेत मुले कागदी पिशव्या वाटप करत असताना जिल्हा परिषद सदस्य बाळकृष्ण जाधव यांनी मुलांच्या जवळ जाऊन माहिती घेतली असता शाळेच्या शिक्षिका व विद्यार्थ्यांचे कौतुक केले. असा उपक्रम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून गावागावात राबविला पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले.  ग्रामपंचायत सदस्या सौ. सानिका भुवड यांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले.  

Web Title: Ratnagiri News Savarde-Bhuvadwadi school event for no plastic