कुवारबावला अंध, अपंगांसाठी शाळा - मिश्रा

कुवारबावला अंध, अपंगांसाठी शाळा - मिश्रा

रत्नागिरी - अंध व अपंग विद्यार्थ्यांसाठीची जिल्हा परिषदेची पहिली शाळा कुवारबाव येथे उभारण्यात येत आहे. त्याचे काम अंतिम टप्प्यात असून तेथे शिकविण्यासाठी शिक्षकही तयार आहेत. त्याचा फक्‍त आरंभ करण्याचे काम शिल्लक आहे, अशी माहिती वाशीम येथे बदली झालेले मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी पत्रकारांना दिली.

रत्नागिरी जिल्हा परिषदेत रुजू होताना संकल्प अंतिम टप्प्यापर्यंत पोचविण्यात यश आल्याचे समाधान आहे, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्‍त केली. जिल्ह्यात किती अपंग आहेत, त्यांना योजनांचा लाभ मिळतो हे पाहण्यासाठी अपंगांचे मॅपिंग केले आहे. त्या अहवालानुसार जिल्ह्यात ९ ते १० हजार अपंग आहेत. त्यातील ६० टक्‍के लोकांची ऑनलाईन नोंदणी झाली आहे. योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी या यादीचा वापर होणार आहे.

दृष्टिक्षेपात...

  •  जिल्ह्यात ९ ते १० हजार अपंग
  •  शिक्षकांच्या गुणवत्तावाढीसाठी प्रयत्न
  •  टपाल, कार्यवाहीचा लेखाजोखा एका क्‍लिकवर
  •  कडकनाथ कोंबडी प्लॅंटसाठी प्रयत्न

शिक्षकांची गुणवत्ता वाढविण्यासाठी परीक्षा घेतली. शिक्षक बदल्यांमुळे पदे रिक्‍त राहिल्यास गुणवत्तेवर परिणाम होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन सचिवांशी संवाद साधला आणि ती थांबविली. राज्यातील पहिली ई-ऑफिस जिल्हा परिषद बनविण्याचे स्वप्न अपूर्ण राहिल्याची खंत श्री. मिश्रा यांनी व्यक्‍त केली; मात्र सामान्य प्रशासनमध्ये प्रायोगिक तत्त्वावर दहा संगणक लॅन केले. टपालाची नोंद आणि त्यावरील कार्यवाही याचा लेखाजोखा क्‍लिकवर आला आहे. 

जिल्ह्यात २००५ पासून अपूर्ण राहिलेल्या २५० योजना मार्गी लावण्यात यश आले आहे. त्यामुळे पाच कोटींचा निधी राष्ट्रीय पेयजल योजनांसाठी मिळाला आहे. यासाठी आमदार उदय सामंत, जिल्हाधिकारी यांची साथ मिळाली. अंध मुलांसाठी मंडणगड घराडी येथे शाळा आहे. अपंगांसाठी वेगळी शाळा नाही. रत्नागिरीत अशी शाळा सुरू करण्याचे स्वप्न होते. ते पूर्णत्वास येत आहे. इमारतीचे काम अंतिम टप्प्यात असून त्याचा नारळ नवीन अधिकाऱ्यांकडून नक्‍कीच फुटेल. जात वैधता नसतानाही प्रशासनात कार्यरत दोन जणांना आफ्रोटच्या तक्रारीवरून निलंबित केले आहे. उर्वरित दहा जणांची चौकशी सुरू असून त्यांच्यातील काही जणांवर लवकरच कारवाई करण्यात येणार आहे, असे श्री. मिश्रा यांनी सांगितले.

पशुसंवर्धन कार्यक्रमांतर्गत कडकनाथ कोंबडीचे प्लॅंट सुरू व्हावेत, असा प्रयोग करण्यात आला होता. त्याचा प्रचार व प्रसारही केला गेला. सरसच्या प्रदर्शनात एक अंडे ५० रुपयांना विकले गेले. यासाठी निधी मिळाला तर योजना राबविता येईल असेही त्यांनी सांगितले.

९९ कोटी खर्ची पडतील
जिल्हा नियोजनमधून जिल्हा परिषदेला ९९ कोटींचा निधी प्राप्त झाला आहे. त्यातील २४ कोटी रुपये जनसुविधेसाठी आहेत. पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या सूचनेनुसार त्यातील कामे घ्यावयाची आहेत. प्राप्त निधी अखेरपर्यंत खर्ची पडेल, असा विश्‍वासन श्री. मिश्रा यांनी व्यक्‍त केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com