गटशिक्षणाधिकाऱ्यांच्या चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 1 ऑगस्ट 2017

रत्नागिरी - शाळांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासणीचा ऑक्‍टोबर महिन्याचा अहवाल न देणाऱ्या दापोली व गुहागरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी पोषण आहार लेखाधिकारी रविराज शिंदे यांची नियुक्‍ती केली असून, त्याचा अहवाल दोन दिवसांत शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे.

रत्नागिरी - शाळांना पुरविल्या जाणाऱ्या पोषण आहाराचा दर्जा तपासणीचा ऑक्‍टोबर महिन्याचा अहवाल न देणाऱ्या दापोली व गुहागरच्या गटशिक्षणाधिकाऱ्यांची चौकशी करण्याचे आदेश मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिले आहेत. त्यासाठी शिक्षणाधिकारी यांनी पोषण आहार लेखाधिकारी रविराज शिंदे यांची नियुक्‍ती केली असून, त्याचा अहवाल दोन दिवसांत शिक्षण विभागाला सादर केला जाणार आहे.

शासनाच्या माध्यान्ह भोजन योजनेंतर्गत जिल्ह्यातील सर्व शाळांमधील विद्यार्थ्यांना पोषण आहार दिला जातो. आहार विद्यार्थ्यांना मिळतो का, त्याचा दर्जा, याची तपासणी करून दर महिन्याचा अहवाल जिल्हा परिषदेला सादर करावयाचा असतो. त्यासाठी प्रत्येक तालुक्‍याला पोषण आहार अधीक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्ह्यात नऊ पैकी सात अधिकाऱ्यांची पदे रिक्‍त आहेत. काहींचे पदभार तेथील विस्तार अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आले आहेत. दापोली, गुहागर या दोन तालुक्‍यांचा ऑक्‍टोबर महिन्याचा अहवाल जिल्हा परिषदेकडे प्राप्त झालेला नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांना पोषण आहार मिळाला की नाही याबाबत साशंकता व्यक्‍त केली जात आहे. तो अहवाल का आला नाही, गटशिक्षणाधिकाऱ्यांनी किती शाळांना भेटी दिल्या, याची सविस्तर माहिती सीईओंनी मागितली आहे.

ऑक्‍टोबरनंतरच्या सर्व महिन्यांचा अहवाल सादर करण्यात आला आहे. तेवढाच अहवाल का प्राप्त झाला नाही यासाठी तालुकास्तरावरील रेकॉर्डची तपासणी या चौकशीत केली जाणार आहे. त्यासाठी नेमण्यात आलेले अधिकारी श्री. शिंदे आज दापोली, गुहागर तालुक्‍यांच्या दौऱ्यावर गेले आहेत. दोन दिवसांत ही तपासणी करून अहवाल सीईओंना सादर करणार आहेत. त्यात गोलमाल आढळल्यास कारवाईचा बडगा उगारण्यात येईल, असे श्री. मिश्रा यांनी पत्रकारांना सांगितले.

बिनकाम्या शिक्षकांना बसणार चाप
शाळांचे कामकाज सोडून विनाकारण शिक्षण विभागात येणाऱ्या शिक्षकांना चाप लावण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. मिश्रा यांनी कारवाईचा इशारा दिला आहे. शिक्षकांनी कामाशिवाय जिल्हा परिषदेत येऊ नये, अशा सक्‍त सूचना शिक्षण विभागाला दिल्या आहेत. बदल्यांचा मोसम असल्यामुळे अनेक शिक्षक जिल्हा परिषदेत घुटमळत राहू नयेत, यासाठी असा निर्णय घेण्यात आल्याचे श्री. मिश्रा यांनी सांगितले.

पोषण आहार योजनेत उडणार गोंधळ
पोषण आहारासाठी लागणारे साहित्य पुरवठा करणारा ठेकेदार निश्‍चित झालेला नाही. जून, जुलै या दोन महिन्याचा तांदूळ व अन्य साहित्य शाळांमध्ये पोचविण्यात आले आहे. तो साठा जुलैपर्यंत पुरेल. त्यानंतर पोषण आहार योजनेचा बट्ट्याबोळ उडण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. ऑगस्ट महिन्यात आवश्‍यक तांदूळ आला नाही, तर मुले यापासून वंचित राहणार आहे.

Web Title: ratnagiri news school student Nutrition Diet