सहावीतील विद्यार्थिनींवर शिक्षकाचे लैंगिक अत्याचार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 14 मार्च 2018

रत्नागिरी - कुवारबाव येथील एका नामवंत शाळेतील शिक्षकाने गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. इंग्रजी आणि कार्यानुभव शिकविणाऱ्या शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिंनीशी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे.

रत्नागिरी - कुवारबाव येथील एका नामवंत शाळेतील शिक्षकाने गुरू-शिष्याच्या पवित्र नात्याला काळिमा फासला आहे. इंग्रजी आणि कार्यानुभव शिकविणाऱ्या शिक्षकाने सहावीत शिकणाऱ्या दोन विद्यार्थिंनीशी सेल्फी काढण्याच्या बहाण्याने लैंगिक अत्याचार केल्याचा संतापजनक प्रकार उघड झाला आहे. मुलीच्या आईने शहर पोलिस ठाण्यात यासंदर्भात तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी संशयित शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

शामसुंदर कृष्णाजी गोठणकर (रा. रत्नागिरी) असे त्या संशयित शिक्षकाचे नाव आहे. त्या शाळेत तो इंग्रजी आणि कार्यानुभव शिकवतो. संबंधित मुलगी शाळेची तयारी करण्यासाठी केस विंचरत होती. तेव्हा तिची मैत्रीण आली. दोघी या नाजूक विषयावर घाबरत-घाबरत चर्चा करीत होत्या. ती चर्चा मुलीच्या आईने ऐकली. त्यांना धक्काच बसला. त्या अस्वस्थ झाल्या. त्यांनी मुलींना विश्‍वासात घेतले. मुलींनी शिक्षकाच्या लंपट वागण्याचा पाढा आईपुढे वाचला. तेव्हा आईच्या तळपायाची आग मस्तकात गेली. 

दोन्ही मुलींशी गोठणकर जवळीक साधण्याचा वारंवार प्रयत्न करीत होता. दोन्ही विद्यार्थिनींबरोबर सेल्फी काढण्याच्या बहाण्याने गैरवर्तन केले होते. मात्र, त्याला विद्यार्थिनींनी 
नकार दिला. हायस्कूलचे डेज सुरू असताना विद्यार्थिनींचा पाठलाग करून पाचवीच्या वर्गात नेऊन सेल्फी काढताना अश्‍लील चाळे केले, असे तक्रारीत म्हटले आहे. फेब्रुवारी २०१८ मध्ये कार्यानुभवचा तास घेण्याकरिता सहावीच्या वर्गावर असताना त्यावेळी वर्गातील इतर मुलांना त्याने बाहेर सोडले होते व त्या दोन विद्यार्थिनींना त्याने वर्गात थांबवून ठेवले. यानंतर शिक्षकाने त्या दोन विद्यार्थिनींना जबरदस्तीने दुसऱ्या वर्गात नेले आणि दरवाजाची कडी लावून त्यांच्याशी जवळीक करण्याचा प्रयत्न केला. यावरच न थांबता त्यांच्याशी लगट करण्याचा वारंवार प्रयत्न केला.

या प्रकारानंतर त्या दोन्ही विद्यार्थिनी चांगल्याच हबकल्या. घडला प्रकार कुणाला सांगितल्यास तुम्हाला ठार मारून टाकीन, अशी धमकीदेखील दिली होती. अखेरीस विद्यार्थिनीसह त्यांच्या पालकांनी शाळेत तक्रारी केल्या होत्या. त्यासंदर्भात एक बैठक झाली. अखेर पोलिस ठाण्यात जाण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणी एका विद्यार्थिनीच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी शामसुंदर कृष्णाजी गोठणकर या शिक्षकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्याचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक श्री. चव्हाण करीत आहेत.

Web Title: Ratnagiri News Sexual harassment of the teacher on the students