गड जिंकण्यासाठी सेना नेत्यांनी घेतले जुळवून

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 20 मार्च 2018

चिपळूण - शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानिमित्त केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम एकत्र आले. त्यामुळे या दोघांमधील राजकीय वैर संपत असल्याचे चित्र आहे. यापुढे आम्ही दोघे एकत्र फिरू, असे अनंत गीतेंनी जाहीर केले. 

चिपळूण - शिवसेनेच्या निर्धार मेळाव्यानिमित्त केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि पर्यावरण मंत्री रामदास कदम एकत्र आले. त्यामुळे या दोघांमधील राजकीय वैर संपत असल्याचे चित्र आहे. यापुढे आम्ही दोघे एकत्र फिरू, असे अनंत गीतेंनी जाहीर केले. 

गीतेंनी मार्ग दाखविल्यामुळे मी आता कोकणात येत राहणार, असे रामदास कदम यांनी सांगितले. आगामी निवडणुकांमध्ये आपापले गड जिंकण्यासाठी सेनेच्या या दोन नेत्यांनी जुळवाजुळव केल्याची चर्चा राजकीय क्षेत्रात सुरू आहे. 
केंद्रीयमंत्री अनंत गीते आणि पर्यावरणमंत्री रामदास कदम यांच्यात अंतर्गत शीतयुद्ध असल्याचे अनेकवेळा समोर आले आहे.

अनंत गीते यांनी लोकसभेची २०१४ मधील निवडणूक रायगड लोकसभा मतदारसंघातून लढवली. तत्पूर्वी २००९ मध्ये रामदास कदम यांनी गुहागर मतदारसंघातून निवडणूक लढवली होती. त्यावेळी अनंत गीते यांनी माझा प्रचार केला नाही. त्यामुळे २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत मी गीतेंच्या प्रचाराला जाणार नाही, असे रामदास कदम यांनी जाहीर केले होते. रामदास कदमांवर रायगड लोकसभा मतदारसंघाची कसलीही जबाबदारी देण्यात आलेली नाही, असे गीतेंनी स्पष्ट केले होते. यातून गीते आणि कदम यांच्यातील वाद चव्हाट्यावर आला होता. 

मातोश्रीचे विश्‍वासू आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या जवळचे म्हणून अनंत गीते यांची ओळख आहे. त्यामुळे कोकणातील संघटनेवर नेहमी त्यांचेच वर्चस्व राहिले. जिल्ह्याचे पदाधिकारी निवडताना तसेच एखाद्याचा पक्षप्रवेश करायचा असेल तर गीतेंचे मत प्रथम विचारले जाते.

भाजपने शिवसेनेला सत्तेत सहभागी करून घेतल्यानंतर रामदास कदमांकडे जिल्ह्याची जबाबदारी देण्याऐवजी त्यांना विदर्भात पाठविण्यात आले. रवींद्र वायकर यांच्याकडे पालकमंत्रीपद देण्यात आले. रामदास कदमांचा जिल्ह्यात हस्तक्षेप होणार नाही, याची पुरेपूर खबरदारी घेण्यात आली. कदमही दापोली मतदारसंघ वगळता जिल्ह्यात कुठेही फिरताना दिसले नाहीत. आता लोकसभा निवडणुकीसाठी रायगड लोकसभा मतदारसंघातून अनंत गीते पुन्हा इच्छूक आहेत. मागील निवडणुकीत पक्षातील काही लोकांनी त्यांच्याविरोधी काम केले. त्यामुळे गीतेंना काठावर विजय मिळाला होता. यावेळी तसे होऊ नये म्हणूनच त्यांनी रामदास कदमांशी जुळवून घेतल्याचे सांगितले जात आहे. 

रामदास कदम यांनी निवडणूक लढविणार नसल्याचे जाहीर केले आहे. परंतु दापोलीतून त्यांचे पुत्र योगेश कदम यांची उमेदवारी निश्‍चित आहे. योगेशच्या विजयासाठी गीतेंचे सहकार्य गरजेचे आहे. त्यामुळे कदमांनीही गीतेंशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे. त्यामुळेच निर्धार मेळाव्याच्या निमित्ताने दोघे मंत्री एकत्र आले.

रामदास कदम आणि माझ्यात काही वैर नाही. आम्ही दोघेही एकत्र आहोत. त्यामुळे रायगड लोकसभा मतदारसंघावर आणि मतदारसंघातील विधानसभेच्या जागांवर शिवसेना वर्चस्व मिळवेल. माझ्याविरोधी आता कुणी निवडणूक लढविण्याची हिंमत करणार नाही. 
- अनंत गीते,
खासदार

कोकण हा पूर्वीपासूनच शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. यापुढेही राहील. माझ्याकडे विदर्भाची जबाबदारी आहे. तेथून शिवसेनेच्या जास्त जागा जिंकण्यासाठी मी कंबर कसली आहे. मात्र कोकणातील संघटनेसाठी लागेल त्यावेळी मी जिल्ह्यात येणार आहे.
- रामदास कदम,
पर्यावरणमंत्री

Web Title: Ratnagiri News Shivseva leader Nirdhar rally