नियमबाह्य कारवाई मागे न घेतल्यास पुन्हा एसटी कर्मचारी करणार आंदोलन

राजेश कळंबटे
बुधवार, 20 जून 2018

रत्नागिरी - 8 व 9 जूनला एसटी महामंडळात गैरहजर राहिलेल्या नवीन कामगारांना काम बंद आंदोलनात सहभाग घेतल्याच्या कारणास्तव कामगारांना सेवा मुक्त करण्याचे आदेश दिल्याची माहिती आहे. यामुळे शिस्त व आवेदन कार्यपद्धतीच्या तरतुदीचा भंग होत आहे. राज्यातील 1100 कामगारांना थेट सेवामुक्तीचे आदेश दिले गेले आहेत. परंतु ही नियमबाह्य कारवाई मागे न घेतल्यास पुन्हा कर्मचारी आंदोलन करण्याची शक्यता आहे.

चालक कम वाहक, सहाय्यक व अनुकंपा तत्वावर लागलेल्या कामगारांना सेवामुक्तीचे आदेश मिळाल्याची माहिती मिळत आहे. यात रत्नागिरीतील 91 कर्मचार्‍यांचा समावेश आहे. परंतु कोणत्याही कर्मचार्‍यास तडकाफडकी सेवामुक्ती करू नये म्हणून महामंडळामध्ये शिस्त व अपिल कार्यपद्धती आहे. त्यानुसार कारवाई होते. तरीही नियमबाह्य कारवाई केली जात आहे. यामुळे कामगारांमध्ये प्रशासनाच्या विरोधात असंतोष निर्माण होऊन औद्योगिक शांतता भंग होण्याची भीती मान्यताप्राप्त महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेने व्यक्त केली आहे.

कारवाई करणार नाही, असा शब्द बंद मागे घेण्याच्या वेळी परिवहन मंत्र्यांनी दिला होता. मात्र हा शब्द प्रशासन पाळत नसल्याचे दिसून येत आहे.

तातडीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय

कामगारांमध्ये तीव्र असंतोष आहे. प्रशासनाने कामगारविरोधी कारवाई त्वरीत थांबविली पाहिजे. कामगार संघटनेने तातडीची राज्य कार्यकारिणी बैठक बोलावली आहे. त्यात आंदोलनात्मक भूमिका ठरणार आहे. तसेच नियमबाह्य कृतीबाबत प्रशासनाने अनुचित प्रथेचा अवलंब केल्याबाबत संघटना न्यायालयातही दावा दाखल करणार आहे, अशी माहिती संघटनेचे अध्यक्ष संदीप शिंदे व जनरल सेक्रेटरी हनुमंत ताटे यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News ST strike action issue