रत्नागिरी बाजारपेठेत मंदी, रिक्षावाल्यांची दिवाळी 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 17 ऑक्टोबर 2017

रत्नागिरी - महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि अन्य संघटनांनी पुकारलेला एसटी बंद 100 टक्के यशस्वी झाला. याचा सर्वाधिक फटका बाजारपेठांना बसला. सुटी पडल्यामुळे शाळकरी मुले बचावली. येणाऱ्या चाकरमान्यांचे आणि स्थानिकांचे मात्र अतोनात हाल झाले. काही पर्यटक लटकलेच. संपाचा सर्वाधिक फायदा अवैध प्रवासी वाहतूकदारांना झाला व रिक्षावाल्यांची दिवाळी झाली. 

रत्नागिरी - महाराष्ट्र एसटी कामगार संघटना आणि अन्य संघटनांनी पुकारलेला एसटी बंद 100 टक्के यशस्वी झाला. याचा सर्वाधिक फटका बाजारपेठांना बसला. सुटी पडल्यामुळे शाळकरी मुले बचावली. येणाऱ्या चाकरमान्यांचे आणि स्थानिकांचे मात्र अतोनात हाल झाले. काही पर्यटक लटकलेच. संपाचा सर्वाधिक फायदा अवैध प्रवासी वाहतूकदारांना झाला व रिक्षावाल्यांची दिवाळी झाली. 

दीपावलीच्या पूर्वसंध्येला झालेल्या बंदमुळे लाखो प्रवाशांचे हाल झाले. चालक, वाहकांसह लिपिक आदींसह सुमारे पाच हजार कर्मचारी संपात सहभागी झाले. दिवसभरात जिल्ह्यातील 7500 फेऱ्या सुटल्या नाहीत. महामंडळाचे सुमारे 60 लाखांचे नुकसान झाले आहे. मध्यवर्ती आणि रहाटागर येथील बस स्थानकात शुकशुकाट होता. बंद शांततेत पार पडला.

माळनाका येथील एसटी विभागीय कार्यालयाबाहेर सर्व कर्मचारी हजर होते. 
काल मध्यरात्रीपासून बंदला सुरवात झाली. रात्रवस्तीला गेलेल्या एसटी बसेस सकाळी एसटी स्थानकात आल्या नाहीत. त्या आगारामध्ये पाठवण्यात आल्या. पहाटेपासून स्थानकातून एकही एसटी बस सुटली नाही. दर वेळेला संपामध्ये चालक, वाहकांचा 100 टक्के सहभाग असतो. यावेळी प्रथमच सर्व आस्थापनांमधील कर्मचारी संपामध्ये सहभागी झाले. संपामुळे प्रवाशांची दैना उडाली. शहरासह ग्रामीण बाजारपेठांमध्ये शुकशुकाट होता. 

लांब पल्ल्याच्या बसेसचे आरक्षण कमी होते. आरक्षित प्रवाशांना तिकिटाचा परतावा देण्यात आला, अशी माहिती विभाग नियंत्रक अनघा बारटक्के यांनी दिली. सर्व आगार व्यवस्थापकांना परतावा देण्याच्या सूचना देण्यात आल्या. रत्नागिरी आगारातील सर्व बसेस माळनाका येथे आणि एसटी बॅंकेच्या आवारात लावून ठेवण्यात आल्या. जिल्ह्यातील परिस्थितीची सर्व माहिती मुंबई प्रादेशिक कार्यालयात वरिष्ठांना पाठवण्यात आली. शहरी फेऱ्याही बंद असल्याने आज रिक्षाचालकांची "दिवाळी' झाली. सकाळपासूनच सर्वच रिक्षास्टॅंडवर भरपूर गर्दी पाहायला मिळाली. काही ठिकाणी जाण्यासाठी जादा पैसेसुद्धा प्रवाशांना द्यावे लागले. 

आम्ही चौघंजण कोकण पर्यटनासाठी आलो होतो. सकाळी दोन-तीस तास स्थानकावर बसून काढले. आज गणपतीपुळे व पावसला जायचे होते. खासगी वाहतूकदार जादा पैसे मागतात. उद्या कोल्हापूरला जायचे असून तिथून गुजरातला जाणार होतो; पण संपामुळे खूप चिंता वाटते आहे, मोठे नुकसान झाले. 
- विजय यावलकर, गुजरात 
 

Web Title: Ratnagiri news ST worker on strike