सौंदर्यपूर्ण देवरूखसाठी कला महाविद्यालयाचा पुढाकार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 17 सप्टेंबर 2017

देवरूख शहराला ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. तो जतन करून देवरूख शहर सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी देवरूख डी-कॅड कला महाविद्यालयाने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी शहराचा एक भाग दत्तक घेऊन तो विकसित केला जाणार आहे. हे करताना कलात्मकताही राखली जाईल. 

साडवली - देवरूख शहराला ऐतिहासिक, शैक्षणिक, सांस्कृतिक परंपरेचा वारसा लाभला आहे. तो जतन करून देवरूख शहर सौंदर्यपूर्ण बनविण्यासाठी देवरूख डी-कॅड कलामहाविद्यालयाने आता पुढाकार घेतला आहे. यासाठी शहराचा एक भाग दत्तक घेऊन तो विकसित केला जाणार आहे. हे करताना कलात्मकताही राखली जाईल. 

ज्येष्ठ उद्योगपती बाळासाहेब पित्रे यांच्या पुढाकाराने तसेच देवरूख नगरपंचायतीच्या सहकार्याने ही सुंदर देवरूखची कल्पना प्राचार्य रणजित मराठे प्रत्यक्षात आणणार आहेत. संगमेश्वर तालुक्‍यातील अनेक लोककला सादर केल्या जातात. या परंपरा जतन करण्यासाठी भावी पिढीला मदत व्हावी, यासाठी या कला प्रतीकरूपाने भिंतींवर रेखाटण्यात येणार आहेत. स्वच्छ सुंदर देवरूख शहरासाठी डी-कॅडचे विद्यार्थी ही चित्रे रेखाटणार आहेत. शहराच्या एका भागावर यासाठी आधी काम करण्यात येणार आहे.

हा भाग सुंदर झाला की तो रोल मॉडेल ठरेल. या परिसरातील नागरिकांचेही साह्य मिळवून नगरपंचायतीच्या मदतीने हा नवा अभिनव प्रयोग केला जाणार आहे. भिंतीवर चित्रे रेखाटणे, विविध स्लोगनच्या माध्यमातून जनजागृती करणे, स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणे, परिसरातील सौंदर्य टिकवणे, एकजुटीने काम करून सलोखा शांती प्रस्थापित करणे व गावचा विकास साधणे असे उद्देश घेऊन हा प्रयोग राबवला जाणार आहे. बाळासाहेब पित्रे यांनी या उपक्रमासाठी योगदान देण्याचे ठरवले आहे.

नगरपंचायत व नागरिकांनी सहभाग दिल्यास देवरूखचे वेगळे चित्र पाहावयास मिळेल. डी-कॅडचे विद्यार्थी लोककला व देवरूखच्या संस्कृतीशी निगडित चित्रे रेखाटणार असल्याने मुलांची कलाही शहरवासीयांसमोर येणार आहे.

लवकरच शहरातल्या भागाची पाहणी करून या नव्या उपक्रमाची सुरवात होणार आहे. याबाबतचा आराखडा प्राचार्य रणजित मराठे यांनी तयार केला आहे. हा उपक्रम शहरवासीयांच्या सहकार्यानेच यशस्वी होऊ शकतो, हे ध्यानी घेऊन याबाबत नुकतीच बैठक घेण्यात आली. यावेळी बाळासाहेब पित्रे, प्राचार्य मराठे, सीईओ वेदा प्रभुदेसाई व विद्यार्थी उपस्थित होते.

Web Title: ratnagiri news students come forward for beautiful devrukh