रिफायनरी विरोधासाठी प्रसंगी मंत्रिपद सोडेन - उद्योगमंत्री सुभाष देसाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 मार्च 2018

रत्नागिरी - वेळ आली तर मंत्रिपद सोडेन, मात्र रत्नागिरी-सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नाणार परिसरातील रिफायनरीला शिवसेना विरोधच करील. स्थानिक जनतेचा प्रकल्पाला विरोध आहे. प्रकल्पाला विरोध करणाऱ्या कोकणातल्या जनतेच्या पाठीशी उभा राहीन. त्यासाठी वेळ आलीच तर मंत्रिपदही सोडून देईन, असे प्रतिपादन उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी विधान परिषदेत केले.

नाणार रिफायनरी प्रकल्पावरून भाजप आणि शिवसेनेमधील यानिमित्ताने मतभेद आज पुन्हा चव्हाट्यावर आले. नाणार रिफायनरीबाबत काँग्रेसच्या हुस्नबानू खलिफे यांनी मांडलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. देसाई म्हणाले की, स्थानिकांचा विरोध लक्षात घेता या प्रकल्पासाठी भूसंपादन करणे शक्‍य नाही. लोकांचा विरोध झुगारून हा प्रकल्प लादला जाणार नाही, अशी उद्योग विभागाची स्पष्ट भूमिका आहे. राजापूर तालुक्‍यातील आठ आणि देवगड तालुक्‍यातल्या दोन ग्रामपंचायतींनी या प्रकल्पाविरोधात मंजूर केलेले ठराव सरकारला पाठवले आहेत. हा प्रकल्प केंद्र सरकारचा असल्यामुळे याबद्दल मुख्यमंत्री केंद्राशी चर्चा करून याबद्दल निर्णय जाहीर करतील.

ही लक्षवेधी सूचना मांडताना खलिफे यांनी या प्रकल्पामुळे सागरी संपत्तीवर नकारात्मक परिणाम होणार आहे , ९७ टक्के लोकांचा विरोध आहे त्यामुळे हा प्रकल्प रद्द तातडीने करावा अशी मागणी केली. यावेळी भाई जगताप यांनी काही अधिकारी मुजोरी करत असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्यावर उत्तर देताना देसाई म्हणाले की, अधिकाऱ्यांची मुजोरी चालू देणार नाही. अशा अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल. लक्षवेधी सूचनेवरील चर्चेदरम्यान या प्रकल्पासंदर्भात मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्र्यांची भूमिका विसंगत आहे असे शेकापचे जयंत पाटील यांनी सांगितले. त्यावर सरकार म्हणून या प्रकल्पाबाबत एकच भूमिका असेल, असे सुभाष देसाई 
यांनी सांगितले.

Web Title: Ratnagiri News Subhash Desai comment