सोशल मीडियाच्या वापरावर सुळे मॅडमचा तास

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 नोव्हेंबर 2017

युवक आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत असताना सुळे मॅडमनी सोशल मीडियाच्या वापराबाबत जणू तासच घेतला. युवकांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‌ॲपचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय साधायचे याचा धडाच त्यांनी दिला. 

चिपळूण - सावर्डेतील विद्यार्थ्यांशी संवाद साधताना खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या व्यक्तिमत्त्वातील वेगळे पैलू समोर आले. सतत सामाजिक भान असणाऱ्या पवार कुटुंबाचा वारसा त्या समर्थपणे कसा चालवत आहेत याचा पडताळाच यानिमित्ताने साऱ्यांना मिळाला. युवक आणि विद्यार्थ्यांशी मनमोकळ्या गप्पा मारत असताना सुळे मॅडमनी सोशल मीडियाच्या वापराबाबत जणू तासच घेतला. युवकांचे म्हणून ओळखल्या जाणाऱ्या फेसबुक, ट्विटर, व्हॉटस्‌ॲपचा वापर कसा करायचा आणि त्यातून काय साधायचे याचा धडाच त्यांनी दिला. 

राष्ट्रवादी काँग्रेसला युवावर्गाची ऊर्जा मिळावी, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी राज्यभरात युवा संवाद यात्रा सुरू केली आहे. यानिमित्ताने बुधवारी सावर्डे येथील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या विद्यार्थ्यांशी त्यांनी संवाद साधला. स्त्रीभ्रूणहत्या, हुंडाबळी, व्यसनाधीनता व मुलींवरील अत्याचार या विषयांचा अत्यंत गांभीर्याने ऊहापोह करून त्यावर विद्यार्थ्यांशी चर्चा केली.

त्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांशी त्यांचा संवाद सुरू झाला. हळूहळू कार्यकर्त्यांची गर्दी वाढू लागल्याने विद्यार्थी कार्यक्रमाच्या ठिकाणावरून बाहेर जाऊ लागले. ही गोष्ट लक्षात येताच आमदार भास्कर जाधव यांनी विद्यार्थ्यांना सभागृहाबाहेर जाऊ नका अशी सूचना केली. युवक, युवतींनी सौ. सुळेंना प्रश्‍न विचारण्यास सुरवात केली. प्रश्‍न विचारण्यासाठी उभे राहणाऱ्यांचे नाव काय, तो/ती  फेसबुक वापरतो की ट्विटर, मित्र किती,  कुणाला फॉलो करतो, राष्ट्रवादी सोशल मीडियाचा पदाधिकारी किंवा कार्यकर्ता आहे का, अशी माहिती खासदार सुळे विचारत. त्यानंतर सोशल मीडियाचा वापर कसा केला पाहिजे याबाबत मार्गदर्शन करीत.  

आजची तरुणाई सोशल मीडियाच्या आहारी गेली आहे. याचा चांगल्यासाठी उपयोग झाला पाहिजे असे त्यांनी बजावले. संसदेत सर्वाधिक प्रश्‍न विचारणाऱ्या खासदारांमध्ये तुमचा पहिला क्रमांक आहे. तुम्ही आत्मविश्‍वासाने प्रश्‍न मांडताना दिसता. एवढा अभ्यास कसा करता या विद्यार्थ्याच्या प्रश्नावर खासदार सुळे म्हणाल्या की, वर्गात शिक्षक शिकवत असताना आपण नीटपणे ऐकून घेतले, नंतर त्याचा अभ्यास केला तर परीक्षेत उत्तर लिहिण्यासाठी अडचण येत नाही.

एखाद्या विषयाचे बारकाईने अभ्यास करण्याचे गुण आपण वडील पवारसाहेबांकडून घेतल्याचे त्यांनी सांगितले. ‘सेल्फी विथ खड्डे’च्या विषयावर एकाने प्रश्‍न विचारल्यावर त्या म्हणाल्या की, माझ्याकडे राज्यातून वेगवेगळ्या भागातून फोटो येतात. मी रोज केवळ तीनच फोटो फेसबुक, ट्विटरवर अपलोड करते. 

 

Web Title: Ratnagiri News Sule Madam period on use of Social Media