कोकणी मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ - सुरेश प्रभू

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 2 एप्रिल 2018

रत्नागिरी - ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ ‘टेकऑफ’ घेण्यास सज्ज झाले आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. विमानसेवेद्वारे कोकणातील आंबा, काजू, मासळी, करवंद, जांभूळ अशा मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बोलाविले होते. 

रत्नागिरी - ‘उडान’ योजनेअंतर्गत रत्नागिरी विमानतळ ‘टेकऑफ’ घेण्यास सज्ज झाले आहे. साडेतीनशे कोटींचा हा प्रकल्प आहे. विमानसेवेद्वारे कोकणातील आंबा, काजू, मासळी, करवंद, जांभूळ अशा मेव्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध करून दिली जाणार आहे. त्यासाठी आंतरराष्ट्रीय कंपन्यांना बोलाविले होते. 

पायाभूत सुविधा उभारण्यासाठी तयार केल्या जाणाऱ्या ‘टास्क फोर्स’मध्ये केंद्र, राज्य शासन, कोस्टगार्ड, पोलिस अधिकारी असणार आहेत. तेही कामे करून घेतील. त्यामुळे कोकणच देशाच्या विकासाची दिशा ठरेल, असा विश्‍वास नागरी हवाई वाहतूकमंत्री तथा वाणिज्य व उद्योगमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला. कोकणच्या विकासाला चालना देण्यासाठी उच्चस्तरीय अधिकारी व प्रतिनिधींच्या ‘राउंड टेबल कॉन्फरन्स’साठी रत्नागिरी दौऱ्यावर आले होते. 

या वेळी कोस्टगार्डच्या विमानतळावर पत्रकारांशी ते बोलत होते. या वेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बाळ माने, डॉ. विनय नातू आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

एमपीडी, एपीडी या आंतरराष्ट्रीय कंपन्यांच्या प्रतिनिधींना कॉन्फरन्ससाठी बोलाविले होते. देशाला ज्या १२ चॅम्पियन सेवा मिळणार आहेत. त्यामध्ये पर्यटनाचा समावेश आहे. त्यासाठी आर्थिक तरतूद केली आहे, असे श्री. प्रभू म्हणाले. 

ते म्हणाले,‘‘देशाला दिशा देण्याचे काम चार वर्षांमध्ये झाले आहे. विविध योजनांमध्ये आंतरराष्ट्रीयस्तरापासून ते गावपातळीपर्यंत सर्व घटकांना सामावून घेतले आहे. म्हणून गरिबातल्या गरिबांना गॅस योजनेचा लाभ मिळत आहे. जीएसटी हा समाजात बदल घडविणारा कार्यक्रम आहे. करदात्यांना ते सुलभ झाले आहे. कर स्वरूपात मिळणारा पैसा बंदरे, रस्ते, रेल्वे, शिक्षण अशा पायाभूत सुविधांवरच खर्च केला जात आहे. कोकणामध्ये रेल्वे, दुपदरीकरण सुरू आहे. पश्‍चिम महाराष्ट्राला जोडण्यासाठी वैभववाडी-कोल्हापूर ५०० कोटींचा रेल्वे मार्ग सुरू आहे. चिपळूण-कऱ्हाड रेल्वे मार्ग देखील होणार आहे. या सर्व योजनांसाठी अर्थसंकल्पात तरतूद केली आहे. त्याची अंमलबजावणी लवकरच होईल. 

Web Title: Ratnagiri News Suresh Prabhu comment