रत्नागिरी तालुका शिवसेनेतील नाराज बंडाच्या पवित्र्यात

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 8 फेब्रुवारी 2018

रत्नागिरी - तालुका शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. गोळप व पावस जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदाच्या तडकाफडकी बदलावरून हे वातावरण पेटले आहे. पायउतार झालेल्या उपतालुकाप्रमुखांनी याविरुद्ध बंड केले आहे.

रत्नागिरी - तालुका शिवसेनेमध्ये धुसफूस सुरू आहे. गोळप व पावस जिल्हा परिषद गटाच्या उपतालुकाप्रमुखपदाच्या तडकाफडकी बदलावरून हे वातावरण पेटले आहे. पायउतार झालेल्या उपतालुकाप्रमुखांनी याविरुद्ध बंड केले आहे. शाखाप्रमुखांसह अन्य पदाधिकाऱ्यांची याबाबत बैठक झाली. विश्‍वासात न घेतल्याने अनेकजण राजीनाम्याच्या पवित्र्यात आहेत. दोन दिवसांत वेगळा निर्णय घेण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे. 

शिवसेनेने दोन दिवसांपूर्वी तालुुकापातळीवर संघटनात्मक बदल केला. गोळप व पावस जिल्हा परिषद गटाचे उपतालुकाप्रमुख गुंड्या साळवी यांची तडकाफडकी उचलबांगडी केली. त्यांच्या जागी राकेश साळवी यांची नियुक्ती केली. 

पक्षांतर्गत बदलामुळे याचा काही परिणाम होणार नाही, असा नेतेमंडळींचा अंदाज होता. परंतु तो फोल ठरला आहे. गोळप व पावस जिल्हा परिषद गटामध्ये या बदलाने हलचल माजली आहे. पक्षाने विश्‍वासात न घेता हा निर्णय घेतल्याने गुंड्या साळवी व त्यांच्या समर्थकांनी बंडाचा झेंडा हातात घेतला आहे.

गुंड्या साळवी यांच्या घरी याबाबत शाखाप्रमुख आणि काही पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. या बैठकीमध्ये अनेकांनी तडकाफडकी बदलाबाबत संताप व्यक्त करीत राजीनामे देण्याचा इशारा दिला आहे. गुंड्या साळवी यांनी तर चार दिवसांत थेट वेगळा विचार करण्याचा इशारा दिला आहे. या घडामोडीमुळे शिवसेनेत जोरदार खलबते शिजू लागली आहेत.   
फणसोप ग्रामपंचायत निवडणुकीपासून या भागातील गटा-तटाचे राजकारण पुढे आले. 

राकेश साळवी विरुद्ध नंदा मुरकर, गुंड्या साळवी, तुषार साळवी असा हा वाद चव्हाट्यावर आला होता. नंदा मुरकर तेव्हा बंड करून सरपंचपदी बसले. यामुळे नाराज झालेल्या राकेश साळवी यांनी पंचायत समिती निवडणुकीत उमेदवारी न मिळाल्याने बंडखोरी केली होती. एकट्या राकेश साळवी यांनी तेथे तगडी लढत दिली. तेव्हा गुंड्या साळवी यांनी प्रतिष्ठा पणाला लावून सेनेचा उमेदवार निवडून आणला. राकेश साळवी यांच्या निवडीमुळे तेथील दोन गटांतील राजकारण ढवळून निघाले आहे. राजीनामा अस्त्र आणि वेगळा विचार करण्यापर्यंतची टोकाची भूमिका घेतली आहे. 

पक्षविरोधी बंड करणाऱ्यांना पदे
गोळप भागामध्ये शिवसेनेचे काम निःस्वार्थीपणे करत आलो. संघटना वाढविण्यासाठी प्रयत्न केला. जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत यश मिळविले. ज्यांनी पक्षाविरोधात बंड केले, खासदारकीच्या निवडणुकीत काम केले नाही, त्यांना पदे दिली. उपतालुकाप्रमुखपद काढून घेताना केलेल्या कामाचा विचार करणे आवश्‍यक होते. ही गोष्ट मनाला लागली. त्यामुळेच विरोधाचा पवित्रा घेतला आहे. चार दिवसांत योग्य तो निर्णय घेऊ, अशी प्रतिक्रिया पायउतार झालेल्या उपतालुकाप्रमुख गुंड्या साळवी यांनी दिली.

Web Title: Ratnagiri News Taluka Shivsena unwilling Issue