पारावर ते आधुनिक नाटक रत्‍नागिरीची सांस्कृतिक परंपरा

पारावर ते आधुनिक नाटक रत्‍नागिरीची सांस्कृतिक परंपरा

मनोरंजनाचे साधन म्हणून पारावरच्या नाटकातून जिल्हाभरात नाटकांची तिसरी घंटा घुमू लागली. त्यातूनच नाट्यचळवळ पुढे आली. कथानक आणि त्याचा आशय यांची गावात चर्चा घडत असे. रंगमंच चबुतऱ्यावरच तयार व्हायचा. गॅसबत्तीवर नांदी सुरू व्हायची. सामाजिक, ऐतिहासिक अशा नाटकांनी सांस्कृतिक परंपरेत भर पडत होती. सध्या नाट्यक्षेत्राला चांगले दिवस आले आहेत; मात्र बदलत्या काळाची सांगड घालून नव्या सुविधांचा वापर नाटक मंडळींनी केला पाहिजे...

नव्या पिढीने मिळवले कौशल्य 

आजच्या वेगवान जीवनपद्धतीमध्ये रंगभूमीवर सातत्याने होणाऱ्या बदलांचे कारण दडलेले आहे. नेपथ्य, प्रकाश योजना, रंगभूषा, संगीत, पार्श्‍वसंगीत, अभिनय, कथानक, वेळ, प्रायोगिकता आणि मर्यादित अर्थाने आवड या सगळ्या घटकांमध्ये बदल होत आहेत. जुनी संगीत नाटके प्रायोगिक स्वरूपात वेगळ्या संगीत रचना करून सादर करायची म्हटली, तर त्याला प्रतिसाद किती लाभेल, याबद्दल शंका असते. किंबहुना संगीत रंगभूमीच्या वैभवाचा काळ ज्यांनी पाहिला आहे, त्यांना हा प्रयोग रुचत नाही, तरीही जुने आणि नवे यांची सांगड घालून नाटकाचा वेगळा ठसा उमटवण्याचा यशस्वी प्रयत्न होत आहे. हे बदल संगीत रंगभूमीनेही काही प्रमाणात स्वीकारले आहेत. नवीन संहिता, कथानक, शास्त्रीय संगीत, उदयोन्मुख कलाकार, नवीन तंत्र, नेपथ्य, प्रकाश योजनेत प्रयोग आणि अंकाच्या मर्यादित वेळेत प्रयोग करण्याचे कौशल्य नव्या पिढीने साध्य 
केले आहेत.

‘झटपट सगळे’ जीवनशैलीपलीकडे
बदलत्या काळात नाटकांचे एकांकिकेत, एकपात्री सादरीकरण व्हायला लागले आहे. ‘झटपट सगळे’ असा नियम लागू झाला आहे. रंगमंचावरून छोट्या पडद्यावर व मोठ्या पडद्यावर अभिनय साकारण्याची संधी मिळाली आहे. मैफली, रेकॉर्डस, कॅसेट्‌स, सीडी यापलीकडे जाऊन पुन्हा एकदा रसिकांना नाटकाकडे वळविण्याची क्षमता असलेल्या कलावंतांनी जर मनात आणले, तर स्पर्धेत उतरणारे नवोदित त्यांना नक्की सहकार्य देतात. अशा नाट्यचळवळीला राज्य शासनाची जोड मिळाली आहे. जिल्ह्यातील अनेक संस्था सांस्कृतिक संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी तसेच संगीत नाटकांच्या मांदियाळीत सहभागी होतात. बालनाट्यालाही चांगले दिवस आलेत. ही नव्या पिढीची प्रगतीच म्हणावी लागेल. अनेक बालकलाकारांनी आपली चुणूक दाखवत मालिका, चित्रपटात कसदार अभिनय करून प्रेक्षकांना थक्क केले आहे.

संस्थांना सुखावणारी बाब
राज्य शासनाच्या हौशी राज्य नाट्य स्पर्धेने अनेक दिग्गज कलावंत रंगभूमीला दिले. त्या कलावंतांना आजही स्पर्धेबद्दल नितांत आदर आहे. मधल्या काळात स्पर्धेचे वलय हळूहळू कमी व्हायला लागले; मात्र गेल्या चार-पाच वर्षांपासून सहभागी होणाऱ्या कलावंतांचा उत्साह वाढला आहे. यावर्षी स्पर्धेने ५७ व्या वर्षात पदार्पण केले आहे. पुरस्काराच्या रकमेत वाढ, दैनिक भत्त्यात वाढ करून प्रोत्साहनही दिले आहे. ही संस्थांना सुखावणारी 
बाब आहे.

१९ नाटकांचा समावेश  
सांस्कृतिक संचालनालयातर्फे होणाऱ्या हौशी मराठी राज्य नाट्य स्पर्धेत गतवर्षी १५ नाटकांचा सहभाग होता. यंदा १९ नाटकांचा समावेश आहे. रत्नागिरीतून १२ नाटकांचा समावेश असून, ७ नाटके सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आहेत. राज्यभरातून ४२५ च्या वर नाट्यसंस्थांनी सहभाग नोंदवला आहे. नाट्य स्पर्धेची प्राथमिक फेरी ६ नोव्हेंबरपासून राज्यातील वेगवेगळ्या १९ केंद्रांवर होणार आहे. प्रत्येक केंद्रावरून एक याप्रमाणे अंतिम फेरीसाठी १९ नाटके निवडली जाणार आहेत. सोमवारी (ता. ६) सायंकाळी ७.३० वाजता मारुती मंदिर येथील स्वा. सावरकर नाट्यगृहात स्पर्धेचा पडदा उघडणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com